esakal | जिल्ह्यात दहा ठिकाणी उभारणार ऑक्‍सिजन प्लांट ! हवेतून करणार ऑक्‍सिजन निर्मिती

बोलून बातमी शोधा

Oxygen
जिल्ह्यात दहा ठिकाणी उभारणार ऑक्‍सिजन प्लांट ! हवेतून करणार ऑक्‍सिजन निर्मिती
sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : जिल्ह्यातील ऍक्‍टिव्ह रुग्णांची संख्या 14 हजारांहून अधिक झाली असून, जवळपास तीन हजार रुग्णांना ऑक्‍सिजनची गरज आहे. त्यासाठी बेल्लारी, पुण्यावरून ऑक्‍सिजन आणला जात आहे. विशाखापट्टणमहून अजूनही ऑक्‍सिजन मिळालेला नाही. त्यामुळे ऑक्‍सिजनअभावी रुग्णांचा जीव जाणार नाही, यादृष्टीने आता ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयांमध्येच हवेतून ऑक्‍सिजन निर्माण करणारे दहा प्लांट उभारले जात आहेत.

कोरोनाची दुसरी लाट थोपवून लावण्यासाठी 14 एप्रिलच्या रात्री आठपासून राज्यभरात कडक लॉकडाउन करण्यात आला. काही दिवसांनी निर्बंध आणखी कडक करण्यात आले. त्या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक जिल्ह्याला कोरोनासंबंधित अत्यावश्‍यक कामे करण्यासाठी सुमारे साडेतीन हजार कोटींचा राखीव निधी देण्याची घोषणा केली. मात्र, अद्याप एक दमडाही सोलापूर जिल्हा प्रशासनाला मिळालेला नाही. त्यामुळे आता जिल्हा नियोजन समितीतून ही कामे केली जात आहेत. सहा ते सात कोटींचा खर्च करून ऑक्‍सिजन निर्मितीचे प्लांट उभारले जाणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी दिली. हे प्लांट कायमस्वरूपी त्या ठिकाणी असतील, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. आगामी काळात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने कोरोना काळात त्यावर विशेष लक्ष दिले जात असल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा: लसीसाठी सोलापूर वेटिंगवरच ! लसीअभावी 339 केंद्रे बंद

महिनाभरात सुरू होतील प्लांट

जिल्ह्यातील उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमध्ये नऊ तालुक्‍यांत ऑक्‍सिजन निर्मितीचे प्लांट उभारले जाणार आहेत. जिल्हाधिकारी व अप्पर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील महिन्यापर्यंत त्या ठिकाणी हे प्लांट कार्यान्वित होतील.

- डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा शल्यचिकित्सक, सोलापूर

जिल्ह्याची सद्य:स्थिती

  • दररोज ऑक्‍सिजनची गरज : 41 टन

  • मिळणारा दररोजचा ऑक्‍सिजन : 30 टन

  • ऑक्‍सिजनवरील रुग्ण : 2,817

  • जिल्ह्यातील ऑक्‍सिजन बेड : 1,113

हेही वाचा: मेंढरं राखणारा, ऊसतोड करणारा लोटेवाडीचा आबा "आयईएस'मध्ये देशात 21 वा

"या' ठिकाणी होणार ऑक्‍सिजनचे प्लांट

शेटफळ (ता. मोहोळ), पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय, अकलूज, बार्शी उपजिल्हा रुग्णालय, करमाळा उपजिल्हा रुग्णालय, जेऊर ग्रामीण रुग्णालय, सांगोला, मंगळवेढा, माळशिरस ग्रामीण रुग्णालयांच्या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ऑक्‍सिजन निर्मितीचे प्लांट तयार केले जाणार आहेत. या दहा ठिकाणी दररोज सुमारे एक हजार ऑक्‍सिजन सिलिंडर तयार होतील, एवढी क्षमता असणार आहे. त्यामुळे ऑक्‍सिजनसाठी करावी लागणारी धडपड थांबणार असून कोणत्याही रुग्णाला ऑक्‍सिजन कमी पडणार नाही, असा विश्‍वास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी व्यक्‍त केला. शहरातील बॉईज व कामगार विमा रुग्णालयातदेखील दररोज 125 ऑक्‍सिजन सिलिंडर तयार होतील, असे प्रकल्प उभारले जाणार आहेत.