esakal | लसीसाठी सोलापूर वेटिंगवरच ! लसीअभावी 339 केंद्रे बंद

बोलून बातमी शोधा

Vaccination
लसीसाठी सोलापूर वेटिंगवरच ! लसीअभावी 339 केंद्रे बंद
sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत असून, रुग्णसंख्या व मृत्यूदरात झालेल्या वाढीमुळे लसीची मागणी वाढत आहे. स्वतःहून नागरिक लसीकरणासाठी पुढे येत आहेत. मात्र लसीअभावी 339 केंद्रे बंद करण्याची वेळ आली आहे. तसेच आतापर्यंत जिल्ह्यातील दोन लाख 66 हजार व्यक्तींना लस मिळाली आहे. लसीसाठी सोलापूर जिल्हा वेटिंगवरच थांबला आहे. 18 वर्षांवरील सर्वांना मे महिन्यात लस मिळणार असल्याने हे वेटिंग आणखी वाढतच जाणार आहे.

कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतल्यानंतर गंभीर स्वरूपाचा आजार होत नाही आणि कोरोनामुळे मृत्यूदेखील होत नाही, असे निरीक्षण आरोग्य विभागाने नोंदविले आहे. त्यानंतर लसीकरणासाठी को-मॉर्बिड (पूर्वीचा गंभीर आजार असलेले) आणि 60 वर्षांवरील ज्येष्ठांची लस टोचण्यासाठी गर्दी वाढली आहे. जिल्ह्यातील चार लाख 37 हजार 500 व्यक्‍तींना (को-मॉर्बिड आणि 60 वर्षांवरील) लस टोचणे अपेक्षित असतानाही आतार्यंत केवळ एक लाख 97 हजार 228 व्यक्‍तींनाच लस मिळाली आहे.

हेही वाचा: जिल्ह्यातील तिघांनीच दिला आमदार निधी ! कोरोनासाठी दहा आमदारांकडून दमडाही नाही

तालुकानिहाय लसीचे टार्गेट अन्‌ लसीकरण...

तालुका - टार्गेट - पहिला डोस - दुसरा डोस

अक्‍कलकोट : 25000 - 16,539 - 1982

बार्शी : 46700 - 27,793 - 4688

करमाळा : 18,300 - 12,256 - 2003

मंगळवेढा : 21,100 - 10,602 - 1098

सांगोला : 25,400 - 13,080 - 1898

पंढरपूर : 34,100 - 19,886 - 3175

दक्षिण सोलापूर : 32,600 - 15,624 - 2952

उत्तर सोलापूर : 12,600 - 7593 - 1199

माढा : 29,000 - 19,774 - 2391

मोहोळ : 28,300 - 12,682 - 1900

माळशिरस : 47,800 - 28,797 - 3915

सोलापूर शहर : 1,16,600 - 81,778 - 16,180

हेही वाचा: करमाळ्यात रेमडेसिव्हीरचा काळाबाजार? व्हायरल ऑडिओ क्‍लिपमुळे खळबळ ! तहसीलदारांचे चौकशीचे आदेश

मागणी करूनही पुरेशी लस मिळत नाही

जिल्ह्यातील 90 हजार 603 को-मॉर्बिड रुग्णांनी तर 60 वर्षांवरील एक लाख सहा हजार 625 ज्येष्ठांनी लसीचा पहिला डोस टोचून घेतला आहे. त्यातील चार हजार 164 को-मॉर्बिड रुग्णांनी दुसरा डोस टोचून घेतला आहे. आठ हजार 301 ज्येष्ठांनी दुसरा डोस घेतला आहे. लसीची मागणी करूनही पुरेशा प्रमाणात लस मिळत नसल्याने कधी कधी केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत.

- डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा समन्वयक, लसीकरण, सोलापूर

खासगी रुग्णालयात 18 ते 44 वर्षाचे लसीकरण

सध्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांवर लसीकरण सुरू आहे. शहर- जिल्ह्यातील 339 केंद्रांवर लसीकरणाची तयारी करण्यात आली आहे. मे महिन्यात 18 ते 44 वर्षांपर्यंतच्या व्यक्‍तींना लस टोचली जाणार आहे. त्यांची गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेऊन त्यांना लसीकरणापूर्वी स्वत:हून नोंदणी करावी लागणार आहे. त्यांच्या मोबाईलवर ज्या दिवशी मेसेज येईल, त्याच दिवशी लस टोचली जाणार आहे. त्यांच्यासाठी खासगी रुग्णालयांची निवड करून त्या ठिकाणी लसीकरणाची सोय केली जाणार आहे.