पंढरपूर पोटनिवडणूक भाजपकडून प्रतिष्ठेची ! राष्ट्रवादीमध्ये मात्र संघटनात्मक बांधणीचा अभाव

NCP_BJP
NCP_BJP

मंगळवेढा (सोलापूर) : पंढरपूर - मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक ही राष्ट्रवादी कॉंग्रेस व भारतीय जनता पक्षाच्या दोन उमेदवारांतच लक्षवेधक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटनात्मक बांधणी सुरू करत आपले इरादे स्पष्ट केले; परंतु राष्ट्रवादीकडे मात्र संघटनात्मक बांधणीचा सध्या तरी अभाव दिसत आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासून मंगळवेढा हा राष्ट्रवादी कॉंग्रेसला मानणारा होता. परंतु 2009 ते 2019 या कालावधीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला पडलेल्या भेगा बुजवल्या नाहीत. मात्र, आमदार भारत भालके यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवेशानंतर राष्ट्रवादीला मंगळवेढ्यात अच्छे दिन आले. त्यामुळे दहा वर्षात 2020 मध्ये पहिल्यांदाच राष्ट्रवादीचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

परंतु स्व. आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भगीरथ भालके व जयश्री भालके यांची नावे चर्चेत असताना, स्थानिक पदाधिकाऱ्यांची मागणी भगीरथ भालके यांना आहे मात्र ही निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडीने आपली ताकद एकत्र करणे आवश्‍यक आहे. परंतु महाविकास आघाडीतील घटक पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवसेना या दोन उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. त्यामुळे महाविकास आघाडीतून एकच उमेदवार राहतो की त्यांच्यामध्ये विसंवाद राहणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख पदाधिकारी निवडले गेले. मात्र त्या पदाधिकाऱ्यांनी गट बांधणीसाठी इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या नाहीत. शिवाय गाव पातळीवर देखील शाखा अध्यक्षापर्यंतचा अभाव आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ स्व. भारत भालके यांनी केलेले काम, अपूर्ण कामांच्या पूर्तीबरोबर त्याबद्दल असलेल्या सहानुभूतीला राष्ट्रवादीला सामोरे जावे लागणार आहे. मात्र सहानुभूती मिळवताना संघटनात्मक बांधणी देखील असणे आवश्‍यक आहे. ज्येष्ठ नागरिकांचे मतदान देखील पोस्टल केल्यामुळे त्या सर्व लोकांपर्यंत राष्ट्रवादीची भूमिका व स्व. भालके यांचे काम पोचण्यासाठी गर्दी करणाऱ्यांपेक्षा दर्दी कार्यकर्त्यांची आवश्‍यकता आहे. त्यासाठी कार्यकारिणीत संधी देणे आवश्‍यक आहे. विशेषत: धनगर समाजाला संधी न दिल्याची ओरड पंढरपुरात पालकमंत्र्यांसमोरही करण्यात आली. 

सध्या राष्ट्रवादीकडे पुढाऱ्यांची भरणा वाढत आहे. त्याचे मतात रूपांतर होणे आवश्‍यक आहे. उलट भाजपचे बाळा भेगडे यांनी यापूर्वीच बूथ बांधणीची बैठक घेऊन त्यांनी त्या पद्धतीच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या. गेल्या दोन दिवसांपूर्वी तालुक्‍यातील 14 विविध सेलच्या प्रमुखपदी निवड करून त्यांना कार्यक्षम केले आहे. सध्या भारतीय जनता पक्षातून दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान अवताडे यांची उमेदवारी निश्‍चित केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असून, महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात राजकीय वातावरण तयार होत असल्याचे दाखवण्याचा दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची होणार आहे. 

तालुक्‍यातील धनगर समाजाच्या मतांसाठी आमदार गोपीचंद पडळकर तर राष्ट्रवादीच्या मतांसाठी स्वतः अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह महाविकास आघाडीच्या इतर मंत्र्यांचा तालुक्‍यात प्रचार दौरा होणार असल्यामुळे, ही निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे. 

पंढरपुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीकडे एवढी सत्तास्थाने असताना मंगळवेढ्यात पाच हजार मते कमी का पडली, याची विचारणा केली असता, या वेळी गटबाजीचे कारण पुढे आले. त्यामुळे येणाऱ्या पोटनिवडणुकीत देखील भालके कुटुंबातील उमेदवाराविरोधात गटबाजी होणार की मताधिक्‍य देणार, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com