Pandharpur News : भाविकांना गावरान मेवा बोरं, पेरूची भुरळ

मार्गशीष महिना सुरू असल्यामुळे श्री विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला भाविकांची दररोज गर्दी होत आहे.
bor fruit
bor fruitsakal

पंढरपूर - मार्गशीष महिना सुरू असल्यामुळे श्री विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला भाविकांची दररोज गर्दी होत आहे. पंढरीत आलेल्या या भाविकांना थंडीच्या हंगामात मिळणाऱ्या पेरू व विविध जातीची चविष्ट बोरे या गावरान मेव्याने भुरळ घातली आहे. प्रदक्षिणा मार्गावरील हात गाड्यांवर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून आंबट गोड अशा बोरांचा आस्वाद घेत भाविक गावरान मेवा मोठ्या प्रमाणावर खरेदी करताना दिसून येत आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील शुष्क हवामानामुळे विविध जातीच्या बोर व पेरू या फळांचे उत्पादन शेतकरी बांधवांकडून मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. सध्या या फळांचा हंगाम सुरू असल्याने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणावर या फळांची आवक सुरू आहे.

पेरू मध्ये व्हीएनआर, तैवान पिंक, सरदार, जय विलास तर बोरांमध्ये उमराण, चमेली, चेकनट, कडाका, ॲपल बोर या विविध जातींचा समावेश आहे. दररोज सकाळी होणाऱ्या लिलावामध्ये ही फळे विकत घेतल्यानंतर येथील फळ विक्रेते पंढरीतील प्रदक्षिणामार्ग, गजानन महाराज मठ परिसर, शहरातील प्रमुख चौक आदी ठिकाणी हात गाड्यावर या फळांची विक्री करताना दिसून येत आहेत.

श्री विठ्ठलाचे दर्शन झाल्यानंतर भाविक प्रासादिक वस्तूंच्या खरेदी बरोबरच हातगाड्यावर मिळणाऱ्या आंबट गोड अशा पेरू व बोरांचा आस्वाद घेत खरेदी करतानाचे दृश्य सध्या पहावयास मिळत आहे. पेरू ६० ते १०० रुपये तर बोरे ४० ते १०० रुपये प्रति किलो या भावाने विक्री होत आहेत. पंढरीत मिळणाऱ्या पेरू व बोरे या गावरान मेव्याची भाविक मोठ्या प्रमाणावर खरेदी करीत असल्यामुळे फळ विक्रेत्यांना अच्छे दिन आले आहेत.

आम्ही मुंबई येथील घाटकोपर मधील दत्तवाडी पंचायतन ग्रुपचे सुमारे साडेचारशे सदस्य पंढरीत श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी आलो आहोत. दर्शन घेतल्यानंतर मंदिर परिसरात फेरफटका मारताना आम्हाला हात गाडीवर मिळणाऱ्या बोरांची चव अत्यंत आवडली. आम्ही प्रत्येकाने किमान एक किलो तरी बोर खरेदी केली आहेत.

- निलम सुनील वायकर, भाविक, मुंबई

पेरूमध्ये व्हीएनआर, जय विलास तर बोरांमध्ये चमेली व चेकनटला भाविकांची जास्त पसंती आहे. चेकनट बोर अत्यंत चविष्ट असल्यामुळे शंभर रुपये प्रति किलो प्रमाणे विक्री होत आहे.

- सोहेल बागवान, फळ विक्रेते, पंढरपूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com