esakal | मंगळवेढ्याच्या भूमिपुत्राला तब्बल 40 वर्षांनंतर संधी
sakal

बोलून बातमी शोधा

मंगळवेढ्याच्या भूमिपुत्राला तब्बल 40 वर्षांनंतर संधी

भाजपाच्या नेत्यांनी सोशल मीडियासह वरिष्ठ पातळीवर सर्व नेते पाचारण करून मतदारसंघात ठेवून नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवली.

मंगळवेढ्याच्या भूमिपुत्राला तब्बल 40 वर्षांनंतर संधी

sakal_logo
By
हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा (सोलापूर) : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निकालातून मंगळवेढ्यातील भूमिपुत्राला आमदार होण्याची संधी तब्बल 40 वर्षांनंतर प्राप्त झाली आहे. तसेच या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या विरोधातील वातावरणाचा लाभ घेण्यात भाजपाचे नेते यशस्वी ठरत आहे. त्यामुळे राज्यातील भाजप आमदाराच्या संख्येत एका आमदाराची भर पडली.

हेही वाचा: "आमचं ठरलंय ! काय ठरलं होतं हे आता संजयमामांनीच सांगावं !'

स्व. भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून स्व. भारत भालके यांचे सुपूत्र भगीरथ भालके यांना देण्यात आली तर त्यांच्या विरोधात आमदार प्रशांत परिचारक व दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांच्यात एकी करत दोघांपैकी एक उमेदवार देताना समाधान आवताडे यांना भाजपने संधी दिली. प्रचाराच्या निमित्ताने पक्षीय पातळीवरील दोन्ही पक्षाच्या वतीने वरिष्ठ नेते मंडळींना पाचारण करण्यात आले. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांची तोडण्यात आलेली वीज कनेक्‍शन, मंगळवेढ्याच्या 35 गावांचा पाणी प्रश्न आदी मुद्दे प्रचारामध्ये भाजपाकडून प्रभावीपणे मांडण्यात आले. परंतु हे मुद्दे राष्ट्रवादीच्या नेत्यांना खोडून काढता आले नाहीत.

हेही वाचा: "आमचं ठरलंय ! काय ठरलं होतं हे आता संजयमामांनीच सांगावं !'

भाजपाच्या नेत्यांनी सोशल मीडियासह वरिष्ठ पातळीवर सर्व नेते पाचारण करून मतदारसंघात ठेवून नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवली. राष्ट्रवादीच्या प्रचारामध्ये फक्त नेते आल्यानंतरच कार्यकर्ते दिसत होते. इतर वेळी मात्र पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरले नाहीत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेल्या राजू शेट्टी यांनी दोन्ही कारखान्यातील चेअरमन उमेदवाराला एफआरपीच्या मुद्द्यावरून उमेदवाराच्या विरोधात प्रबळ रान उठवले गेले. परंतु स्वतःच्या उमेदवाराला देखील ते अपेक्षित मते घेऊ शकले नाहीत. दामाजी कारखान्याच्या 19 हजार 500 अक्रियाशील सभासदांचा मुद्दा विधानसभेच्या प्रचारामध्ये मांडत प्रभावीपणे रंगवला गेला. परंतु मतदारांनी हा मुद्दा ग्राह्य धरला नाही. आपले मत समाधान आवताडे यांना देत कौल दिला. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये समाधान आवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर यांची उमेदवारी धोकादायक ठरेल, अशी शक्‍यता होती. परंतु, त्यांना अपेक्षित मते मिळाली नाहीत.

हेही वाचा: आमदारसाहेब, आता कोरोनाला पराभूत करूयात

या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व माजी आमदार कै. सुधाकरपंत परिचारक यांचा स्व. भारत भालके यांनी केलेल्या पराभवाचा वचपा मोहिते-पाटील व आमदार प्रशांत परिचारक यांनी समाधान आवताडेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून काढला आहे. प्रचारादरम्यान आमदार प्रशांत परिचारक यांनी तुम्ही भालके यांना मंगळवेढ्यातून रोका, आम्ही पंढरपुरातच रोखतो हा मुद्दा प्रभावीपणे मांडला. त्याप्रमाणे आमदार परिचारक पहिल्यांदा पंढरपुरातून भालकेंना रोखण्यात यशस्वी ठरले आहे. परंतु, मंगळवेढ्यात झालेल्या काट्याच्या टकरीत पंढरपुरातील मिळालेले मतदान आवताडे यांच्या विजयासाठी कारणीभूत ठरले.

तालुक्‍यामध्ये धनगर समाजाचे प्राबल्य मोठे आहे, अशा परिस्थितीत या मतांचा कौल आजमावण्यासाठी भाजपने आमदार गोपीचंद पडळकर यांना पाचारण केले. तर ऊस पट्ट्यात सदाभाऊ खोत यांना पाचारण केले होते. मंगळवेढा तालुक्‍यामध्ये विविध ग्रामपंचायती, जिल्हा परिषद व पंचायत समितीवर असलेले वर्चस्व व कार्यकर्त्यांचे तगडे जाळे व भाजपच्या नेत्यांची मिळालेली साथ समाधान यांना विजयापर्यंत घेऊन गेली.

भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, पालकमंत्री, अनेक मंत्री व कॉंग्रेसचे नेते, मंत्री बच्चू कडू, शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांच्यासह अनेक नेते प्रचारात आणूनही राष्ट्रवादीला ही जागा ताब्यात ठेण्यात यश आले नाही.

लग्नाच्या वाढदिवशी आमदारकी भेट

भाजपाचे विजयी उमेदवार समाधान आवताडे यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. आणि आजच त्यांना पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळाला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने समाधान आवताडे यांना पंढरपूर व मंगळवेढा तालुक्‍यातील जनतेने आमदारकीचे भेट देण्याची चर्चा रंगली आहे.

उपमुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूर दौऱ्यामध्ये दोन्ही तालुक्‍यातील राष्ट्रवादी नेत्यांना खडे बोल सुनावले होते. दिवसा एक, रात्री एक चालणार नसल्याचा इशाराही दिला होता. त्यांच्या हा इशारा देखील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतला नसल्याचे आता निवडणूक निकालानंतर दिसून येत आहे.

मतदारांनी केला करेक्‍ट कार्यक्रम

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही इथला करेक्‍ट कार्यक्रम करा मी राज्यातला कार्यक्रम करतो, असा शब्द दिला होता. त्याप्रमाणे दोन्ही तालुक्‍यातील मतदारांनी महाविकास आघाडीचा करेक्‍ट कार्यक्रम केला आहे. त्यामुळे आता राज्यातला करेक्‍ट कार्यक्रम करण्यात फडणवीस यांना यश मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

loading image