esakal | "आमचं ठरलंय ! काय ठरलं होतं हे आता संजयमामांनीच सांगावं !'
sakal

बोलून बातमी शोधा

"आमचं ठरलंय ! काय ठरलं होतं हे आता संजयमामांनीच सांगावं !'

निवडणूक निकालानंतर भाजप आमदार प्रशांत परिचारक यांना आमदार संजय शिंदे यांनी केलेल्या "आमचं ठरलंय' या वक्तव्याविषयी विचाले असता, आमचं काय ठरलं होतं, हे आता त्यांनीच सांगावं, असा टोला लगावला.

"आमचं ठरलंय ! काय ठरलं होतं हे आता संजयमामांनीच सांगावं !'

sakal_logo
By
भारत नागणे : सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक प्रचारादरम्यान वाखरी (ता. पंढरपूर) येथील एका जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार समर्थक आमदार संजय शिंदे यांनी, माझं आणि प्रशांत मालकांचं ठरलंय, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून संभ्रम निर्माण झाला होता. निवडणूक निकालानंतर आता तो संभ्रम दूर झाला असला तरी आमदार शिंदेंच्या त्या वक्तव्याची चर्चा मात्र आज दिवसभर सुरू होती. दरम्यान, निवडणूक निकालानंतर भाजप आमदार प्रशांत परिचारक यांना आमदार संजय शिंदे यांनी केलेल्या "आमचं ठरलंय' या वक्तव्याविषयी विचाले असता, आमचं काय ठरलं होतं, हे आता त्यांनीच सांगावं, असा टोला लगावला.

हेही वाचा: कोणी काही म्हणो, जिल्ह्याचे नेतृत्व मोहिते-पाटीलच करू शकतात !

भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या विजयानंतर "आमचं ठरलंय' या आमदार शिंदेंच्या वक्तव्याची भाजप कार्यकर्त्यांनी व परिचारक समर्थकांनी चांगलीच खिल्ली उडवली. निवडणूक प्रचारादरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून आमदार प्रशांत परिचारक यांच्याविषयी संभ्रम निर्माण करणारे व अफवा पसरवणारे अनेक मेसेज सोशल मीडियावरून व्हायरल केले होते. त्यातच वाखरी येथे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रचार सभेत बोलताना आमदार संजय शिंदे यांनी प्रशांत परिचारक यांचं आणि "आमचं ठरलंय' असं वक्तव्य करून आणखीनच संभ्रम निर्माण केला होता.

आमदार संजय शिंदे व आमदार प्रशांत परिचारक यांचा दोस्ताना जगजाहीर आहे. शिंदे- परिचारकांनी मोहिते- पाटील विरोधकांना एकत्र करत समविचारी आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेवर विजय मिळवला होता. दरम्यान 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये संजय शिंदे आणि परिचारक यांची राजकीय वाट वेगळी झाली.

हेही वाचा: कांद्याचा वांदा ! बाजारपेठा बंद; उत्पादक शेतकरी अडचणीत

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून संजय शिंदे उमेदवार होते. त्या वेळी प्रशांत परिचारकांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या बाजूने प्रचार केला. तेव्हापासून शिंदे- परिचारकांमध्ये राजकीय दुरावा निर्माण झाला. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूर पोटनिवडणुकीची महत्त्वाची जबाबदारी आमदार संजय शिंदेंवर दिली होती. शिंदे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालकेंच्या विजयासाठी आपली ताकद पणाला लावली होती. या निवडणुकीच्या निमित्ताने शिंदेविरुद्ध मोहिते असा रंगही दिला गेला.

प्रचारादरम्यान आमदार संजय शिंदे यांनी परिचारकांविषयी केलेल्या वक्तव्याचे आमदार प्रशांत परिचारकांनी त्याच वेळी खंडन करून, अशा वक्तव्यावर विश्वास ठेवू नये, असे कार्यकर्त्यांना आवाहन देखील केले होते. मतमोजणी पार पडल्यानंतर परिचारकांनी पंढरपूर शहर व तालुक्‍यातील 22 गावांतून भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना चांगले मताधिक्‍य मिळवून दिले. त्यामुळे आमचं ठरलंय, हे परिचारकांनीच निकालातून दाखवून दिले आहे. भाजपचे समाधान आवताडेंच्या विजयामुळे आमदार संजय शिंदे आणि आमदार प्रशांत परिचारकांमध्ये नेमकं काय ठरलं होतं, याविषयी आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.

loading image