esakal | आमदारसाहेब, आता कोरोनाला पराभूत करूयात
sakal

बोलून बातमी शोधा

आमदारसाहेब, आता कोरोनाला पराभूत करूयात

आमदारसाहेब, आता कोरोनाला पराभूत करूयात

sakal_logo
By
श्रीकांत मेलगे

मरवडे (सोलापूर) : पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे आमदार समाधान आवताडे यांनी विजय मिळविला. विजयी आमदारांचे अभिनंदन करीत आनंदोत्सव साजरा होत असला तरी मंगळवेढा तालुक्‍यात कोरोना महामारीची परिस्थिती खूपच चिंताजनक आहे हे विसरून चालणार नाही. विजयाचा आनंद साजरा होत असताना आमदारसाहेबांनी तालुक्‍यातील वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी पाऊले उचलण्याची आवश्‍यकता आहे.

हेही वाचा: कोणी काही म्हणो, जिल्ह्याचे नेतृत्व मोहिते-पाटीलच करू शकतात !

पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर या मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया सुरुवात झाली. निवडणुकीत सर्वच पक्षांनी आपआपले उमेदवार देत तालुक्‍यात प्रचारसभांचा धुरळा उठविला. प्रचारसभेत राज्यस्तरीय नेत्यांनी हजेरी लावल्यामुळे सभांना मोठी गर्दी झाली. प्रचारसभामुळे कोरोनाच्या प्रसारास वाव मिळाला व गेल्या पंधरा दिवसापासून मंगळवेढा तालुक्‍यात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. अनेक मोठया गावातील परिस्थिती हाताबाहेर चालल्यामुळे तालुक्‍यातील भोसे, मरवडे, अंधळगाव,आरळी ही गावे प्रतिबंधित क्षेत्र घोषित करत प्रशासनाने कोरोना परिस्थितीला आळा घालण्याचा प्रयत्न केला. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच वेळीच उपचार घेण्याबाबात हलगर्जीपणा दाखविल्यामुळे कोरोना व इतर विविध आजारांनी अनेक जणांना प्राणास मुकावे लागले. कोरोनाच्या या भीषण परिस्थितीस काही अंशीतरी पंढरपूर विधानसभा मतदारसंघात झालेल्या या निवडणूकाच कारणीभूत आहेत असा सूर समाजमनातून आळवला जात आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी प्रशासन व ग्रामस्तरीय समित्या प्रयत्न करीत असताना तालुक्‍यातील नेतेमंडळी मात्र विधानसभा निवडणुकीत कोण कोणाचा वारू रोखणार यावर चर्चा करण्यात गुंतली होती. कोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्रभर चळवळी करण्यात येत असताना मंगळवेढेकर मात्र अजून शांतच राहिले आहेत. निवडणुकीचा निकाल लागला, विजयाच्या गुलालाची उधळण झाली, आता या सर्व विजयोत्सवातून बाहेर पडून तालुक्‍यातील कोरोनाच्या भीषण परिस्थितीकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे.

हेही वाचा: कांद्याचा वांदा ! बाजारपेठा बंद; उत्पादक शेतकरी अडचणीत

पंढरपूर विधानसभा मतदारसंघात विविध प्रश्न असले तरी नूतन आमदार समाधान आवताडे यांनी आता प्राधान्याने कोरोनाला आळा घालण्यासाठी वेळ देणे आवश्‍यक आहे. तालुक्‍यातील आरोग्य केंद्रांनी आपल्या कामकाजाने सोलापूर जिल्ह्यात झेंडा मिरविला असला तरी यंत्रणेला अत्यंत कमी कर्मचारी संख्येवर काम करावे लागत आहे, त्यामुळे आरोग्य केंद्रात रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी प्रयत्न करणे, कोविडची तपासणी वाढविण्याबरोबर पुरेशा लसी उपलब्ध करून लसीकरण मोहिमेला वेग देणे, वेळीच उपचार घेण्यास नागरिकांनी पुढे येण्यासाठी ग्रामीण भागात समाजप्रबोधन करणे, गोरगरिबांना मदतीचा हात पुढे करणे, संस्थात्मक विलीगीकरण करण्यात आलेल्या रुग्णांना आवश्‍यक सोयीसुविधा पुरविणे. अनेकांना तालुक्‍यात पुरेशा प्रमाणात आरोग्यसुविधा मिळत नसल्याने मोठया शहरातील दवाखान्याचा आधार घ्यावा लागत आहे हे करीत असताना वेळ जातो. त्याचबरोबर पैसाही जातो त्यामुळे शहरात व ग्रामीण भागातील मोठया गावात सर्व सोयीसुविधायुक्त कोरोना सेंटरची उभारणी करणे. कोविड सेंटर उभारणी करत असताना आमदार फंड, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या माध्यमातून फंड तसेच निधी कमी पडत असल्यास प्रसंगी लोकचळवळ उभी करणे आवश्‍यक आहे.

लोकचळवळीभिमुख मरवडेकर गप्पच...

मंगळवेढा तालुक्‍यातील मरवडे गावाने आजपर्यंत अनेक समाजाभिमुख लोकचळवळी सुरू करून महाराष्ट्रातील लोकचळवळींना दिशा देण्याचे काम केले आहे. जलसंधारण काम, लेकीचं झाड मोहिमेतून झाडांची लागवड, मरवडे फेस्टिव्हल, सामुदायिक विवाह सोहळे, गतवर्षी कोरोना साथीच्या काळात गरजूंना जीवनावश्‍यक साहित्याचे वाटप यासारख्या अनेक लोकचळवळी यशस्वीपणे राबविल्या आहेत. आता कोरोनामुळे गाव संकटात असताना सर्व सुविधायुक्त कोरोना सेंटर, गरजूंना जीवनावश्‍यक साहित्याचे वाटप यासाठी मरवडेकरांनी पुढे सरसावणे आवश्‍यक आहे.

loading image