वसंत पंचमीच्या मुहुर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pandharpur
वसंत पंचमीच्या मुहुर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा

वसंत पंचमीच्या मुहुर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा

पंढरपूर : वसंत पंचमीच्या मुहुर्तावर श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा मोठ्या थाटात, उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात झाला. सनई चौघडयांच्या आवाजात, फुलांनी सजवलेल्या मंडपात मंगलाष्टका म्हटल्या गेल्या आणि उपस्थित वर्हाडी भाविकांनी श्री विठूरायाच्या ईणि श्री रुक्मिणीमातेच्या उत्सव मूर्तींवर अक्षता टाकल्या. या पंढरपुरातं काय़ वाजतं गाजतं, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागलं असे म्हणत उपस्थितांनी टाळ्या वाजवत देवाच्या लग्न सोहळ्यात सहभागी होता आलं याचा आनंद व्यक्त केला.

हेही वाचा: सातारा-पंढरपूर मार्गावर आगीत एसटी बस जळून खाक

दरवर्षी वसंतपंचमीच्या मुहुर्तावर साक्षात परब्रम्ह श्री पांडुरंग आणि जगन्माता श्री रुक्मिणीचा विवाह सोहळा संपन्न होत असतो. वसंत पंचमीला श्री विठ्ठल रुक्मिणीचा विवाह झाल्याचा उल्लेख संत एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या रुक्मिणी स्वयंवरात आहे. पूर्वी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हा सोहळा उत्पात समाजाच्या पुढाकारातून होत असे. आता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मंदिर समितीच्या वतीने तर श्री वसिष्ठ आश्रमात उत्पात समाजाच्या वतीने हा सोहळा मोठ्या थाटात साजरा करुन परंपरा जपली जात आहे. देवाचा हा शाही विवाह सोहळ्यासाठी पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते.

या सोहळ्याची येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पंधरा दिवस आधी पासून तयारी सुरु असते. यंदा देखील सोहळ्याच्या निमित्ताने विविध रंगीबेरंगी आकर्षक फुलांनी मंदिरात सजावट करण्यात आली होती. पुणे येथील श्री विठ्ठल भक्त भारत भुजबळ यांच्या वतीने ही फुलांची सजावट करण्यात आली होती.

हेही वाचा: शाळेत जाताना अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला तीन वर्षांचा कारावास

श्री विठ्ठलाच्या आणि श्री रुक्मिणीच्या उत्सव मूर्तीना विविध दागिन्यांसह आकर्षक रेशमी वस्त्रे परिधान करुन मुंडावळ्या बांधण्यात आल्या होत्या. देवाला आकर्षक पगडी घालण्यात आली होती. मंदिरातील भटजींनी आणि भाविकांनी मंगलाष्टका म्हणल्यावर मंडपात उपस्थित वर्हाडी भाविकांनी श्री विठूरायाच्या आणि श्री रुक्मिणीमातेच्या उत्सव मूर्तींवर अक्षता टाकल्या. या सोहळ्याच्या निमित्ताने मंदिरातील श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमातेच्या मुख्य मूर्तींना आकर्षक पोषाख परिधान करण्यात आला होता. या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने श्री रुक्मिणी स्वयंवर कथेचे निरुपण प्रसिध्द भागवत कथाकार व प्रवचनकार अनुराधा शेटे यांच्या सुमधुर वाणीतून झाले.

विवाह सोहळ्याचे प्रसंगी भाविकांच्या बरोबरच प्रांताधिकारी तथा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड तसेच काही सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :Solapur