esakal | "जनआरोग्य'ची "ती' अट जाचक ! 82 हजारांपैकी फक्त चार हजार रुग्णांनाच लाभ

बोलून बातमी शोधा

In Sangli Phule Janaarogya Yojana benefits only 2569 patients

"जनआरोग्य'ची "ती' अट जाचक ! 82 हजारांपैकी फक्त चार हजार रुग्णांनाच लाभ

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोना महामारीमुळे कधी कडक लॉकडाउन तर कधी कडक संचारबंदी, निर्बंध घालावे लागले. या काळात सर्वसामान्यांचे जीणे मुश्‍कील झाले आणि अशा परिस्थितीत रुग्णांना उपचाराचा खर्च परवडणारा नाही. या पार्श्‍वभूमीवर सर्वांनाच महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनेतून उपचार देण्याचा निर्णय झाला. धक्‍कादायक बाब म्हणजे, सोलापूर शहर- जिल्ह्यातील 82 हजार 92 रुग्णांपैकी केवळ चार हजार 27 रुग्णांनाच या योजनेतून मोफत उपचार मिळाले आहेत.

शहर असो वा ग्रामीण भागातील कोव्हिड हेल्थ सेंटर व कोव्हिड हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर व ऑक्‍सिजन बेडचा तुटवडा आहे. त्यामुळे अनेकांना उपचारासाठी बेड मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीत मोफत उपचारापेक्षा रुग्ण वाचविण्यासाठी नातेवाइकांची धडपड सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत शहर- जिल्ह्यातील 43 रुग्णालयांपैकी केवळ 28 रुग्णालयांमधूनच कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये उपजिल्हा रुग्णालयांसह श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचाही समावेश आहे. खासगी रुग्णालयांमधील खाटा हाउसफुल्ल असल्याने त्या ठिकाणी योजनेतून उपचार घेण्यासाठी पात्र असलेल्यांनाही बेड मिळत नसल्याची स्थिती आहे. दुसरीकडे जनआरोग्य योजनेचा लाभ हा केवळ तीव्र व अतितीव्र लक्षणे असलेल्यांनाच मिळत असून सौम्य लक्षणे असलेल्यांना योजना लागू नसल्याचे संबंधित अधिकारी सांगत आहेत.

हेही वाचा: करमाळ्याचे आमदार संजय शिंदे कोरोना पॉझिटिव्ह !

सर्वसामान्यांना योजनेचा लाभ

शहर-जिल्ह्यातील 28 रुग्णालयांमधून महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा रुग्णांना लाभ दिला जात आहे. आतापर्यंत जिल्हाभरातील चार हजार रुग्णांना या योजनेतून मोफत उपचार मिळाले आहेत. आगामी काळात त्यात आणखी वाढ होईल.

- डॉ. दीपक वाघमारे, जिल्हा समन्वयक, जनआरोग्य योजना, सोलापूर

जनआरोग्य योजनेची स्थिती

  • एकूण रुग्णालये : 43

  • कोरोनावर उपचार करणारी रुग्णालये : 28

  • एकूण रुग्ण : 82,092

  • योजनेतून उपचार घेतलेले रुग्ण : 4,027

  • "सिव्हिल'मधील 310 बेड हाउसफुल्ल

हेही वाचा: पंढरपूर, मंगळवेढ्याचीच चिंता ! जिल्ह्यात आज वाढले 1449 रुग्ण; 40 जणांचा मृत्यू

श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात सध्या कोरोनाग्रस्तांसाठी 310 बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सध्या सर्वोपचार रुग्णालयात लातूर, उस्मानाबाद, कर्नाटकातील रुग्णांवरही उपचार सुरू आहेत. मागील काही दिवसांपासून रुग्ण बरे होण्यापूर्वीच सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांची वेटिंग आहे. सद्य:स्थितीत सर्वोपचार रुग्णालयात एकही बेड शिल्लक नसल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी दिली. दुसरीकडे ते म्हणाले, सर्वोपचार रुग्णालयात वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ, रेमडेसिव्हीर, ऑक्‍सिजनसह औषध साठा पुरेशा प्रमाणात आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे.