esakal | आता आवाहन, सूचना, इशारा बंद ! थेट ग्रामपंचायत करातून होणार दंडाची वसुली
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

आता आवाहन, सूचना, इशारा बंद ! थेट ग्रामपंचायत करातून होणार दंडाची वसुली

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोना रुग्णांबरोबरच आता मृत्यूदरही वाढू लागला आहे. नागरिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने नियमांचे पालन करण्याचे आवाहन करूनही त्याचे उल्लंघनच होऊ लागले आहे. त्यामुळे आता आवाहन, सूचना, इशारा बंद करत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी बेशिस्तांवरील दंडात्मक कारवाईला ग्रामस्तरीय समितीला परवानगी दिली आहे. मात्र, हुज्जत घालणाऱ्यांनी दंड न भरल्यास ती रक्‍कम त्याच्या कर पावतीत वर्ग करून त्यातून वसूल करावी, असेही आदेश त्यांनी आज काढले.

जिल्ह्यातील 11 तालुक्‍यांत मागील 14 दिवसांत 172 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 11 हजार 637 रुग्ण वाढले आहेत. बार्शी, करमाळा, माढा, माळशिरस, पंढरपूर या पाच तालुक्‍यांतील रुग्णवाढ अन्य तालुक्‍यांच्या तुलनेत खूपच आहे. तर करमाळा, माळशिरस, पंढरपूर, बार्शी या तालुक्‍यात मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात यावी म्हणून कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, बऱ्याच गावांमध्ये त्याचे पालनच होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अशा गावांमधील बेशिस्तांवर कारवाई करण्याचे अधिकार ग्रामस्तरीय समितीला देण्यात आले आहेत. त्यांनी दंडासाठी स्वतंत्र पावती बुक तयार करून घ्यावे, अन्यथा संबंधिताच्या दंडाची रक्‍कम त्याच्या कर पावतीत जमा करून वसूल करून घ्यावी, असेही आदेश स्वामी यांनी ग्रामसेवकांना दिले आहेत.

हेही वाचा: शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी ! बाजार समितीत कांद्याला प्रतिक्‍विंटल शंभर ते बाराशेचा दर

"सकाळ' वृत्तानंतर जिल्हाधिकारी, सीईओ मंगळवेढा-पंढरपूर दौऱ्यावर

पोटनिवडणुकीनंतर पंढरपूर, मंगळवेढा तालुक्‍यातील रुग्णसंख्या व मृत्यूदर वाढू लागला आहे. मंगळवारी पंढरपूर तालुक्‍यात 174 रुग्ण आढळले असून त्यात चौघांचा मृत्यू झाला आहे. तर मंगळवेढ्यात मंगळवारी 86 रुग्ण नव्याने आढळले आहेत. या दोन्ही तालुक्‍यांतील रुग्ण व मृत्यूबद्दल "सकाळ'ने प्रकाश टाकला. त्यानंतर मंगळवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह आरोग्य विभागातील पदाधिकाऱ्यांनी या दोन्ही तालुक्‍यांना भेट देऊन त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. आगामी काळात ठोस उपाययोजना कराव्यात, संचारबंदीची कडक अंमलबजावणी करावी, जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव थांबेल, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी दिल्या.

जनतेसाठीच काम करतेय प्रशासन

कोरोनाला रोखण्यासाठी गावोगावी अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. मात्र, नागरिकांना नियमांचे पालन करण्यास सांगितले की, काहीजण तो ग्रामसेवक, तलाठ्यांशी हुज्जत घालत असल्याचा अनुभव त्यांना येत आहेत. अधिकारी हे जनतेच्या सुरक्षिततेसाठीच असून कोरोना रोखण्यासाठीच ते आवाहन करीत आहेत, हे जनतेने लक्षात ठेवायला हवे.

- दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर

loading image
go to top