esakal | "चला, तुमची टेस्ट करून तुम्हाला चौदा दिवस क्वारंटाइन करतो !'

बोलून बातमी शोधा

Police Action

"चला, तुमची टेस्ट करून तुम्हाला चौदा दिवस क्वारंटाइन करतो !'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दक्षिण सोलापूर (सोलापूर) : "संचारबंदी आहे माहीत नाही का? चला, आता तुमची टेस्ट करतो अन्‌ चौदा दिवस क्वारंटाइन करतो...' या पोलिसांच्या धमकीने मॉर्निंग वॉक करणाऱ्या ज्येष्ठांचा बीपी वाढून घाम फुटत आहे. त्यामुळे "ब्रेक द चेन'साठी अनेकांनी मॉर्निंग वॉकलाच ब्रेक दिला आहे.

कडक लॉकडाउनपूर्वी संचारबंदीचे आदेश मनावर न घेता अनेकजण फिरताना दिसत होते. कोरोना संसर्ग थांबण्यासाठी सुरू असलेल्या ब्रेक द चेन मोहिमेला त्यामुळे खीळ बसत होती. त्यामुळे पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यांच्या मुसक्‍या आवळण्यास सुरवात केली. त्याचा फटका पहाटे व्यायामासाठी फिरणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनाही बसला आहे. नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी पहाटे घराबाहेर पडलेले अनेक स्त्री-पुरुष पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात अडकत आहेत. त्यातील एका ज्येष्ठ नागरिकाने घडलेली हकिकत सांगितली...

हेही वाचा: रविवारी येणार ऑक्‍सिजन एक्‍स्प्रेस सोलापुरात ! विशाखापट्टणमशी जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा सुरू

रविवारी पहाटेची साडेसहाची वेळ... जुळे सोलापूर डी मार्ट चौकात एक पोलिस अधिकारी दोन पोलिसांसह ड्यूटीवर तैनात... रस्त्यावर नीरव शांतता... आम्ही काही ज्येष्ठ महिला व पुरुष मॉर्निंग वॉक करत निघालेलो... त्यातील अनेकांना बोलावून घेत सुरू झाले पोलिसांचे धमकावणे... "चला आता पोलिस स्टेशनला... तुमची टेस्ट करू... 14 दिवस क्वारंटाइन व्हा..!' अन्‌ मग मात्र आम्ही सगळे घाबरलो... आमच्यातील अनेकांची पोलिसांपुढे सुरू झाली विनवणी... आम्ही म्हणत होतो "पुन्हा येत नाही फिरायला... आता सोडा साहेब...' पोलिस मात्र काहीच ऐकत नव्हते...

त्यांनी पोलिस व्हॅन बोलावली. गाडी आल्यावर त्यामध्ये बसताना आम्ही घामेघूमच झालो... गाडीत बसताना चोर- दरोडेखोरांना ज्या भाषेत धमकावले जाते तीच पोलिसांची भाषा ऐकून आम्ही अधिकच घाबरलो... कसेबसे गाडीत बसलो.... ती अस्वच्छ गाडी... नासलेले फुटलेले वांगे- टोमॅटोचा गाडीत खच... ते तुडवत आत बसलो... वाटले, या अस्वच्छतेनेच कोरोना संसर्ग झाला तर..! नाइलाज होता... गाडी विजापूर नाका पोलिस स्टेशनात पोचली....

हेही वाचा: जिल्ह्यातील 74 बालविवाह रोखले ! कोरोना काळात का वाढले बालविवाह?

गाडीतून उतरताच एका पोलिसाने सगळ्यांना प्रवेशद्वारासमोरील रोडवर रांगेत बसण्याचे फर्मान सोडले... आता टेस्ट होणार, या भीतीने गर्भगळीत होऊन आम्ही शांत बसून होतो... काही वेळाने त्या पोलिसाने प्रत्येकी पाचशे रुपये दंड भरा, असा आदेश दिला... मॉर्निंग वॉकला आल्याने कोणाकडेच पैसे नव्हते... प्रत्येकाने फोनवरून घरी संपर्क करीत पैसे मागवून घेतले अन्‌ पावती केली... पोलिसांनी दिलेल्या टेस्ट व क्वारंटाइनच्या धमकीने घामेघूम झालेल्या आम्हा सर्वांची केवळ दंड आकारून सुटका झाल्याने जीव भांड्यात पडला अन्‌ आम्ही घर गाठले. आता मात्र मॉर्निंग वॉकला ब्रेक दिला...

धमकावणे ज्येष्ठांच्या जिवावर बेतू शकते

पोलिसांचे धमकावणे एखाद्या ज्येष्ठ नागरिकाच्या बाबतीत जीवघेणेही ठरू शकते. टेस्ट अन्‌ क्वारंटाइन न करता केवळ दंडच भरून घ्यायचा होता तर एवढा खटाटोप का केला, असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला. जागेवरच दंड भरून घेऊन समजावून सांगितले असते तर ज्येष्ठ नागरिक ऐकणार नव्हते का? परंतु कोणी ऐकूनच घेणार नसल्याने सांगून काय उपयोग? असा सवाल उपस्थित करत, आता मात्र घाराबाहेर पडायचेच नाही, असा निश्‍चय केल्याचे त्यांनी सांगितले.

बातमीदार : श्‍याम जोशी