लेकरांच्या कल्याणासाठी दोनीबी देशमुख एकत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लेकरांच्या कल्याणासाठी दोनीबी देशमुख एकत्र

किमान लेकरांच्या भल्यासाठी का हुईना दोगंबी एकत्र आल्याचं आमाला समाधान वाटलं..!

लेकरांच्या कल्याणासाठी दोनीबी देशमुख एकत्र

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

लगा दोन देशमुखांचं लईच सूत जुळलेलं दिसतंया की..? दोगंबी एकत्र कवाच येत नव्हतं, एकमेकांचं त्वांडंबी बगत नव्हतं, एकमेकाबद्दल चांगल काय बोलत नव्हतं...आता असं काय घडलंया की दोगंबी एकाच व्यासपीठावर अन्‌ एकमेकांबद्दल चांगलं बोलू लागल्याती... लई खोलात जावून चौकशी केली तवा येगळंच कानावर आलं की ! दोगांनीबी आपापल्या लेकरांच्या कल्याणासाठी ही भूमिका घेतल्याचं समजलं... आतापतूर लोकांसाठी इळ्याभोपळ्याचं सख्य हुतं ते संपल्यात जमा झाल्याचं कार्यकर्ते सांगत हुते..! लईच धन्य वाटलं लगा ! किमान लेकरांच्या भल्यासाठी का हुईना दोगंबी एकत्र आल्याचं आमाला समाधान वाटलं..!

राजकारण लईच वंगाळ... कार्यकर्त्यांना संधी देण्याचं नुसतं गाजरच दाखवलं जातंया... आयुष्यभर सतरंज्या उचलायचंच काम त्येंनी करायचं... नेत्यांनी मात्र आपलं उखळ पांढरं करुन घ्येयाचं... पहिलं नेता, नंतर मुलगा, नंतर नातू त्यानंतर पुन्हा पणतू असं राजकारणात आजपतूर चालत आलेलं हाय... अनेक घराण्यांची अशी वारसं राजकारणात हायती... ते आता याफुढंबी चालणारच की... सोलापूर जिल्ह्यात पूर्वीच्या काळी म्हंजी कॉंग्रेसच्या काळात शहरात सायब अन्‌ जिल्ह्यात दादा असं समीकरण हुतं... दोगंबी समजुतदार पद्धतीनं काम करत हुते... युतीची सत्ता आली अन्‌ इजूमालक पालकमंत्री झालं नंतर बापू सहकार मंत्री झालं... या दोगांमंदी इस्तू आडवा जात नव्हता... महापालिकेच्या निवडणुकीत बापूचा येक कार्यकर्ता मालकाच्या जवळ गेल्यानं त्येचं तिकीटच कापलं हुतं... आता केवळ आपला राजकीय वारसा फुढं यावा म्हनूनशान दोन्ही देशमुखांनी हातमिळवणी केल्याचं कानावर आलं हाय...!

हेही वाचा: पगारवाढीनंतर एसटी कर्मचाऱ्यांना उत्पन्नवाढीचेही टार्गेट!

हिकडं रोहनदादा दक्षिणमधून तयारी करु लागल्यात तर तिकडं उत्तरमधून डॉक्‍टर तयारीला लागले हायती... विजूमालक अन बापूंनी आता सक्रीय राजकारणातनं भायर पडायचं ठरवलं हाय...दोन्ही देशमुखांची फुढची पिढीस्नी आधीच राजकारणाचं वारं लागलेलं हाय... आता अधिक चांगल्या पदांसाठी त्यांची "समजोता एक्‍स्प्रेस' भविष्यात लईच फास्ट जाणार हे निश्‍चित ! रोहनदादानं शेजारच्या जिल्ह्यात लोकसभा निवडणूक लढवली हुती... वरिष्ठ नेताच त्येंच्या पाठीशी असल्यानं बापूंनी तवा पक्षाच्या इरोधात जावून काम केलं हुतं...दादा पडल्यानंतर नेत्यानं हळूच आपला चिरेतला हात काढून घेतला, तवा बापूची स्थिती लईच वंगाळ झाली हुती... नंतर बापू पुन्हा मुख्य परवाहात आलंया... त्यासाठी लईच काळ जावा लागला हुता... ही एक आठवण हो !

दोन्ही देशमुखांच्या एकमेकांच्या वितुष्टामुळं सोलापूरच्या इकासात तवा अडथळे आले... दोगांमदी चांगलं सौहार्दाचं वातावरण रहावं म्हनून लई परयत्न केले गेले... पन्‌ मागार घेत्याल ते देशमुख कसलं...अक्कलकोटच्या सचिनदादालाबी याचा झटका बसला हुता... त्येचं नशिब त्ये स्वबळावर निवडून आलं... आता मात्र लेकरांच्यी भवितव्याबद्दल चिंता असलेल्या दोगांनी एकत्र यायचं ठरवलं हाय...त्यासाठी थेट चंद्रकांतदादांनी मध्यस्थी केल्याचं सांगण्यात येतं... याफुढं शहरात इजूमालक अन्‌ जिल्ह्यात बापू असं ठरलंया म्हन... दोघांना दादांनी कानमंत्र दिल्याचं ऐकिवात हाय... दोघांच्या वारसांचं ठिकाय पन आमचं काय? असंबी कार्यकर्त्यांचा सूर हाय !

- थोरले आबासाहेब

loading image
go to top