esakal | सोलापूर डीसीसीच्या विरोधात, शिक्षक संघटना आंदोलनाच्या तयारीत 
sakal

बोलून बातमी शोधा

dcc solapur

रक्कम जमा करण्यास विलंब करणाऱ्या बॅंक अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा 5 ऑक्‍टोबर रोजी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या मुख्य कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा राज्याध्यक्ष महेबुब तांबोळी, राज्य कार्याध्यक्ष सुबोध सुतकर, राज्य उपाध्यक्ष रईस रामपुरे, राज्य सचिव अशपाक शेख यांनी दिला आहे.

सोलापूर डीसीसीच्या विरोधात, शिक्षक संघटना आंदोलनाच्या तयारीत 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील शिक्षकांनी स्वतःच्या भविष्य निर्वाह निधीतून काढलेली रक्कम शिक्षकांना मिळत नाही. शिक्षण विभागाच्या वेतन पथकामार्फत सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत ही रक्कम जमा होऊन आठ ते दहा दिवस झाले. बॅंकेत जमा झालेली रक्कम शिक्षकांच्या खात्यावर मात्र जमा केली जात नाही असा आरोप करत संतप्त झालेल्या शिक्षकांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेसमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. 

जनसेवा शिक्षक संघटना व अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाच्यावतीने आंदोलन करण्याचा इशारा बॅंकेला देण्यात आल्याची माहिती राज्य कार्याध्यक्ष सुबोध सुतकर व राज्य उपाध्यक्ष रईस रामपुरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. प्राथमिक शिक्षण विभागाच्या वेतन पथकाने 21 सप्टेंबर रोजी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत धनादेशाद्वारे रक्कम दिली आहे. बॅंकेच्यावतीने ही रक्कम सिध्दार्थ शाखेत जमा झालेली नाही. सिध्दार्थ शाखेतील शिक्षकांच्या खात्यावर ही रक्कम अद्यापही जमा न झाल्याने शिक्षक आक्रमक झाले आहेत. ही रक्कम अद्यापही का जमा झाली नाही? याबाबतचा बॅंकेने शिक्षक संघटना व सर्व शिक्षकांना लेखी स्वरूपात द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. 

जिल्हा बॅंकेच्यावतीने शिक्षकांना जाणून-बुजून रक्कम दिली जात नसल्याचा आरोपही संघटनांच्यावतीने करण्यात आला आहे. शिक्षकांनी घरगुती कामासाठी तसेच मुला-मुलींच्या शैक्षणिक फीसाठी, वैद्यकीय खर्चासाठी आणि लग्नासाठी स्वतःच्या भविष्य निर्वाह निधीतून ही रक्कम काढली आहे. जिल्हा बॅंकेच्या कारभाराबद्दल शिक्षकांमध्ये संतप्त भावना निर्माण झाली आहे.

loading image
go to top