पोलिसांच्या तत्परतेने माळढोक पक्ष्यास जीवनदान

पोलिसांच्या तत्परतेने माळढोक पक्ष्यास जीवनदान

महूद (सोलापूर) : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेले लॉकडाउन आणि संचारबंदीने सर्वत्र शांतता होती. या शांत वातावरणात पक्षी सर्वत्र मुक्त विहार करत आहेत. काल शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास महूद येथील मुख्य चौकात जखमी अवस्थेत माळढोक पक्षी आढळला. कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यावर तत्काळ उपचार केल्याने त्यास जीवदान मिळाले. 

लॉकडाउनमुळे पक्ष्यांचा किलबिलाट 
लॉकडाउन आणि संचारबंदीने कारखाने आणि वाहनांच्या यंत्रांची धडधड बंद होती. माणसांचा गोंगाट नव्हता. एरवी गजबजलेल्या गावांत व शहरांत या पक्ष्यांचा किलबिलाट ऐकण्यास मिळणे दुरापस्त होते. मात्र, शांतता असल्याने दृष्टीस न पडणारे पक्षी सर्वत्र मुक्त विहार करत आहे. नेहमी गजबजलेल्या भागात ऐकू न येणाऱ्या पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येऊ लागला. पक्षीसुद्धा या निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहे. मानवाने निर्माण केलेल्या कोलाहलात तो हरवून गेला होता. याची जाणीव लॉकडाउनने मानवाला झाली. 

पक्षी अचानक तो खाली पडला 
महूद (ता. सांगोला) येथील मुख्य चौकात सायंकाळी सव्वापाच वाजता बऱ्यापैकी शांतता होती. सुरेश पाटोळे व गोरख लोखंडे हे पोलिस कर्मचारी कार्यरत होते. सायंकाळच्या वेळी घरट्याकडे जाण्याची सर्वच पक्ष्यांना गडबड झाली होती. त्यातच हा माळढोक पक्षी येथील मुख्य चौकातून उडत निघाला होता. मात्र, अचानक तो खाली पडला आणि धडपडत मुख्य रस्त्यावर आला. कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी सुरेश पाटोळे व गोरख लोखंडे तत्काळ त्याच्याकडे धावले. जवळील पाण्याच्या बाटलीतील पाणी त्यास पाजले. जखमी झालेला हा पक्षी भीतीने थरथर कापत होता. त्या दोघांनी स्वच्छ कापड ओले करून त्या पक्ष्याच्या अंगावर घातले. तत्काळ पशुवैद्यकीय दवाखान्यात त्यास घेऊन गेले. 

उजव्या पंखाच्या खाली जखम 
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल धुमाळ यांनी या पक्ष्याची पाहणी केली. त्याच्या उजव्या पंखाच्या खाली मार लागल्याने जखमेतून रक्त वाहत होते. डॉ. धुमाळ यांनी ताबडतोब ती जखम स्वच्छ केली. त्यावर औषध लावले आणि पक्ष्यास इंजेक्‍शन दिले. वेळेत उपचार मिळाल्याने थोड्याच वेळात पक्षी स्वतःच्या पायावर उभा राहिला. त्यानंतर सुरेश पाटोळे व गोरख लोखंडे यांनी हा पक्षी महूद परिसरातील वन विभागाचे कर्मचारी श्री. पारसे यांच्या ताब्यात दिला. 

खाकीतील माणुसकी जिवंत 
कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउन आणि संचारबंदी काळात अनेक कामे व भूमिका पार पाडाव्या लागत आहेत. कामाचा कितीही ताण असला तरी त्यांच्यातील माणुसकी जिवंत असल्याची अनेक उदाहरणे पहावयास मिळतात. या पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेने पक्ष्यास जीवदान मिळाले असून तो पुन्हा निसर्गात विहार करण्यासाठी तयार झाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com