esakal | जातिधर्मापलीकडील माणुसकी ! बार्शीच्या मक्का मस्जिदमध्ये कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांची सोय

बोलून बातमी शोधा

Makka Masjid
जातिधर्मापलीकडील माणुसकी ! बार्शीच्या मक्का मस्जिदमध्ये कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांची सोय
sakal_logo
By
प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच येथे इतर तालुक्‍यांतून येत असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांची होत असलेली गैरसोय पाहून, मानवसेवा हीच ईशसेवा हे ब्रीद समोर ठेवून जातिधर्माच्या पलीकडे जाऊन बागवान मक्का मस्जिदच्या विश्वस्तांनी मस्जिदमध्येच 100 बेड व किचन तयार करून जेवणासह राहण्याची सोय केली आहे. दातृत्वाचा आदर्श जिल्ह्यासमोर ठेवल्याने याबाबत शहरासह तालुक्‍यात व जिल्ह्यात कौतुक होत आहे.

मध्य वस्तीमध्ये पांडे चौक येथे असलेल्या बागवान मक्का मस्जिद विश्वस्त, बार्शी शहर शिवसेना, राजमाता इंदूताई आंधळकर अन्नछत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा निर्णय घेण्यात आला आहे. माजी मंत्री दिलीप सोपल, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, गृहनिर्माणचे माजी सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांच्या उपस्थितीत 1 मे रोजी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

हेही वाचा: Pandharpur Elections : आवताडे विजयाच्या उंबरठ्यावर ! 6632 मतांची आघाडी

मुस्लिम समाजाचे प्रार्थनास्थळ असलेल्या बागवान मक्का मस्जिदमध्ये 100 बेड, जेवण तयार करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य, ताट, वाट्या, ग्लास व तांबे यासह गॅसची व्यवस्था, फळे, भाजीपाला अद्ययावत करण्यात आला असून स्वच्छतागृहाचीही सोय करण्यात आली आहे.

याप्रसंगी बोलताना भाऊसाहेब आंधळकर म्हणाले, शहरामध्ये आरोग्य व्यवस्था मोठी, उत्तम असल्याने तालुक्‍यासह इतर भूम, परंडा, करमाळा, माढा, वाशी, मोहोळ, खर्डा, कळंब व उस्मानाबाद आदी तालुक्‍यांतील रुग्ण येथे उपचार घेत आहेत. रुग्णांसोबत आलेल्या नातेवाइकांची खूप मोठी हेळसांड होताना दिसत होती. त्यांची सोय व्हावी हा मुख्य हेतू मनामध्ये होता.

हेही वाचा: गटविकास अधिकाऱ्याची माणुसकी ! स्वत: सरण रचून केला कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार

मक्का मस्जिदचे विश्वस्त शौकत महंमद हनिफ येडशीकर, दिलावर बागवान, रतन बागवान, हाजी लियाकत बागवान यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी अशा संकटकाळी मदत करणे हीच मानवता आहे, असे सांगून शंभर बेडसह जेवण तयार करण्यास होकार दिला आणि उपक्रम राबवण्याचे ठरवले.

मस्जिदमध्ये दोन मोठे हॉल असून एक हॉल पुरुषांसाठी तर दुसरा हॉल महिलांसाठी करण्यात आला आहे. स्वतःला पाहिजे ते जेवण तयार करायचे असून तेथे सर्व व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

कोरोना महामारीच्या काळामध्ये बार्शीच्या मुस्लिम बांधवांना फुटलेला मायेचा पाझर निश्‍चितच वाखाणण्याजोगा असून, मानवधर्म सांभाळल्याचे प्रतीक आहे. संकटकाळी मदत होत असल्याने तसेच रुग्णांच्या नातेवाइकांची सोय कोठेही होत नसल्याने मस्जिद विश्वस्तांनी घेतलेला निर्णय आदर्शवत आहे.