युक्रेनमधून सुखरूप घरी पोचल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी केली विचारपूस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

returning home safely from Ukraine

युक्रेनमधून सुखरूप घरी पोचल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी केली विचारपूस

सांगोला : मेडिकल शिक्षणासाठी युक्रेनमध्ये अडकलेल्या ऋतुजा सांगोला तालुक्यातील एखतपुर या गावी सुखरूप पोचल्यावर ग्रामपंचायतीतर्फे सत्कार तर केलाच परंतु सोलापूरचे जिल्हा अपत्ती व्यवस्थापनचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकाऱ्यांनी खास विचारपूस केली. तसेच युक्रेनमध्ये बसला भारत देशाचा तिरंगा लावल्यानंतरच आम्ही त्या बोंड्रीपर्यंत सुखरुप पोहोचलो असे ऋतुजा कबाडे यांनी आवर्जून सांगितले.

सांगोला तालुक्यातील एखतपुर गावचे प्राथमिक शिक्षक बाबासाहेब कबाडे यांची सुकन्या ऋतुजा ही गेली तीन वर्षापासून 'एमबीबीएस'चे शिक्षण घेण्यासाठी युक्रेन येथील 'बुकोवीनीयन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी चेरनीवस्ती, युक्रेन' याठिकाणी शिक्षण घेत होती. स्क्रीन मधून आपल्या एखतपुर गावी सुखरूप परत आल्यानंतर ती 'सकाळ'शी बोलत होती. ऋतुजा म्हणाली की, गेली पंधरादिवसांपासून ऑनलाईन क्लासेस सुरू होते. पण 24 फेब्रुवारी रोजी मोठा हल्ला झाल्यानंतर मेडिकल प्रशासनाने सुट्टीच जाहिर केली. त्यानंतर 25 फेब्रुवारी रोजीच भारत सरकारने विमानसेवेची सुविधा उपलब्ध करून दिल्याने, मी सोमवार 28 फेब्रुवारी रोजी माझ्या घरी सुखरुप पोहचली आहे. 

भारत पाकिस्तान यादेशाचे तंटे होत आहेत. त्याप्रमाणेच युक्रेन आणि रशियाचे हे तंटे सुरू आहेत. आत्ता तर युद्धच सुरू असून, युक्रेनमध्ये भयावह अशी परिस्थिती आहे. अशा या युद्धजन्य परिस्थितीमुळे मागील 15 दिवसापासून आमचे ऑनलाईनच क्लासेस सुरू होते. पण ज्यावेळी 24 फेब्रुवारी रोजी आमच्या कॉलेजपासून जवळच असलेल्या 'क्यू' आणि 'खारक्युज' या शहरावर प्रचंड हल्ले झाले  त्यावेळी आम्ही खूपच भयभित झाली. मेडिकल प्रशासनाने सुट्टीच जाहीर केली. त्याचदरम्यान आम्हाला भारतात जावा असे, सक्त आदेश देण्यात आले. केंद्रसरकारनेही यासाठी तातडीने विमानसेवा ही उपलब्ध केली. आपल्या देशातील 250 विद्यार्थीही होते. यामध्ये मुलीही 180 इतक्या होत्या.

आमच्या कॉलेजपासून विमानतळावर जाण्यासाठी दोन ते अडीच तासांचा रस्तामार्ग होता. म्हणजेच युक्रेन देशाची सरहद्द. तेथून पुढे रोमानिया देशांमधून विमानसेवा आमच्यासाठी होती. पण ज्यावेळी आम्ही बोंड्रीपर्यंत येण्यासाठी निघालो होतो त्यावेळी येथील परिस्थिती खूपच भयावह अशीच होती. ज्या बसमधून आम्ही निघालो होतो, तेव्हा बसला भारतीय तिरंगा लावलेला होता. तेव्हाच आमची बस पुढे सोडण्यात आली. रोमानियाच्या विमानतळावर आलो, त्यावेळी चांगली सोईसुविधा येथे करण्यात आली. त्यानंतर आमचे विमान थेट मुंबईलाच आले. येथे आल्यानंतर ही भारत सरकारने आमची चांगली सोई सुविधा केली. माझे वडील बाबासाहेब कबाडे हे मला घेण्यासाठी मुंबई आले होते. मी आणि वडील आज सोमवार 28 फेब्रुवारी रोजी पहाटेच घरी सुखरूप आलेलो आहोत.