esakal | विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे 4.65 कोटी रुपये पडून !
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे 4.65 कोटी रुपये पडून !

विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे 4.65 कोटी रुपये पडून !

sakal_logo
By
प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

शासनाच्या वतीने पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मोफत गणवेशाचे चार कोटी 65 लाख वीस हजार शंभर रुपये गेल्या एक वर्षापासून जिल्हा परिषदेकडे पडून आहेत.

सोलापूर : शासनाच्या वतीने पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मोफत गणवेशाचे (School Uniform) चार कोटी 65 लाख वीस हजार शंभर रुपये गेल्या एक वर्षापासून जिल्हा परिषदेकडे (Solapur Zilla Parishad) पडून आहेत. कोरोनामुळे (Covid-19) प्रत्यक्षात शाळा भरत नसल्याने विद्यार्थ्यांना गणवेश द्यायचा की नाही?, विद्यार्थ्यांना गणवेश द्यायचा कसा? या प्रश्नाचे उत्तर मिळत नसल्याने हा निधी पडून आहे. (Rs 4.5 crore was not spent on student uniforms from Zilla Parishad-ssd73)

हेही वाचा: "एमपीएससी'ची सप्टेंबरमध्ये संयुक्‍त पूर्व परीक्षा?

यावर्षीच्या शैक्षणिक वर्षाला सुरवात झाली आहे. काही गावांमधील शाळाही सुरू झाल्या आहेत. गेल्यावर्षीच्या गणवेशाचाच निर्णय न झाल्याने या वर्षीच्या गणवेशाचा विषय अद्याप समोर आलेला नाही. या गणवेशाची रक्कमही अद्याप शासनाकडून जिल्हा परिषदेला मिळालेला नाही. शासनाच्या वतीने सर्व घटकातील मुलींसाठी, अनुसूचित जमातीतील मुले, अनुसूचित जातीमधील मुले व दारिद्य्र रेषेखालील मुले यांच्यासाठी शासनाकडून दरवर्षी दोन गणवेश दिले जातात. दोन गणवेशासासाठी प्रतिविद्यार्थी 600 रुपयांची तरतूद केली जाते. 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी जिल्ह्यातील 1 लाख 55 हजार 67 विद्यार्थ्यांना एका गणवेशाचे प्रतिविद्यार्थी 300 रुपये प्रमाणे पैसे मिळाले. परंतु, पैसे खर्च करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या मार्गदर्शक सूचना न मिळाल्याने हा निधी अद्यापही प्रलंबित राहिलेला आहे. पुस्तके आणि गणवेश कधी मिळणार? याची उत्सुकता विद्यार्थ्यांना आणि पालकांना लागली आहे.

हेही वाचा: अबब! 61 लाखांची ऑनलाइन फसवणूक; शिक्षकांसह नोकदार आमिषाला बळी

आकडे बोलतात...

  • गणवेशाच्या लाभार्थी मुली : एक लाख पाच हजार 993

  • अनुसूचित जातीमधील मुले : 19 हजार 69

  • अनुसूचित जमातीमधील मुले : 2 हजार 590

  • दारिद्य्र रेषेखालील मुले : 27 हजार 415

  • एकूण लाभार्थी : 1 लाख 55 हजार 67

विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मोफत गणवेशाची रक्कम जिल्हा परिषदेला मिळालेली आहे. परंतु या रकमेच्या खर्चाबाबत अद्याप मार्गदर्शक सूचना मिळालेल्या नाहीत. यावर्षीच्या योजनेसाठी अद्याप निधी प्राप्त झालेला नाही.

- दिलीप चव्हाण, शिक्षण सभापती तथा उपाध्यक्ष, जिल्हा परिषद सोलापूर

loading image