Water Issue : आग विझवणारे पाणी, राजकारण पेटवतय; मंगळवेढ्यात पुन्हा पेटला पाणी प्रश्न

लोकसभा निवडणुकीचा कालावधी जसजसा जवळ येत चाललाय तसतशे आग विझवणारे पाण्यामुळे मंगळवेढयात राजकारण पेटत चालले आहे.
Water Issue
Water Issuesakal

सलगर बुद्रुक - आगामी 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीची चाहूल लागायला सुरवात झाली आहे. निवडणुकीचा कालावधी जसजसा जवळ येत चाललाय तसतशे आग विझवणारे पाण्यामुळे मंगळवेढयात राजकारण पेटत चालले आहे. काही गावांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची तयारी सुरू केली आहे.

तर काही गावातील ग्रामस्थ आमची गावे कर्नाटकाला जोडा अशी मागणी करत आहेत. पाणी प्रश्नावरून विरोधकांनी विद्यमान लोकप्रतिनिधींना घेरण्याची तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे विद्यमान लोकप्रतिनिधिंनीही आगामी निवडणुकीच्या आत पाणी प्रश्नावर ठोस भूमिका घेतली जाईल अशी भीष्मप्रतिज्ञा केली आहे.

दरम्यान 2009 च्या लोकसभेच्या निवडणुकीवर तालुक्यातील 35 गावांनी बहिष्कार घातला होता. नंतर निवडणुकीचा निकाल तत्कालीन खासदार सुशीलकुमार शिंदेच्या बाजूने लागला. त्यानंतर त्यांनी भाषणात 35 गावच्या बहिष्काराची चेष्टा केली होती. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाणी प्रश्नावरून भालकेंनी मैदान मारले. सलग तीन वेळा आमदार होऊन सुद्धा व प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या दंडात पाणी आले नाही.

त्यानंतर पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या 35 गावांची संख्या 24 गावांवर आली. 2019 ला भालकेंच्या निधनानंतर मतदारांनी भावनिक साद न ऐकता आवताडेंच्या गळ्यात विजयी माळ टाकली. त्यानंतर पाणी जवळ आलंय म्हणणारी मंडळी विरोधात गेली अन पाणी कुठाय म्हणायला लागली.हेच या पाण्याचे भीषण वास्तव आहे.

राजकारणी तुपाशी अन जनता उपाशी -

पाणी प्रश्नाचे राजकीय भांडवल करून राजकारण्यांनी सरपंच, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, कारखान्याचे संचालक, मार्केट कमीट्या, खरेदी विक्री संघ, सोसायट्या, जिल्हा नियोजन सदस्य आदी विविध पदांवर सत्ता उपभोगली. पण कधीही न भरणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या झोळीत मताचे दान टाकणाऱ्या शेतकऱ्यावर अजूनही शेतात उभा राहून मृगजळाला पाणी समजण्याची वेळ आली आहे. याला सर्वपक्षीय नेते जबाबदार आहेत.खरं तर राजकीय इच्छा शक्ती अभावी मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही हे वास्तव कुणी नाकारू शकत नाही.

दरम्यान, विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्याकडे फक्त अडीच वर्षाच्या आमदारकीच्या कामाचा अनुभव आहे. या थोडक्या कालावधीतच उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मुख्यमंत्र्यांनी मंजुरीची सही केली आहे. त्यानंतर ही फाईल मंत्रिमंडळा समोर जाऊन निधी मंजूर होणार आहे. सदरच्या उपसा सिंचन योजनेला आगामी निवडणुकीपूर्वी प्रयत्नाअंती मार्गी लावू, असे मत आवाताडे यांनी व्यक्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com