समाधान आवताडेंनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Awtade

समाधान आवताडेंनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ !

मंगळवेढा (सोलापूर) : पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत (Pandharpur - Mangalvedha Assembly by-election) विजयी झालेले भाजपचे नवनिर्वाचित आमदार समाधान आवताडे (MLA Samadhan Awtade) यांनी आज (बुधवारी) सभापती नरहरी झिरवाळ (Deputy Speaker Narhari Jirwal) यांच्या दालनात विधानसभा सदस्यत्वाची शपथ ग्रहण केली. (Samadhan Avtade took oath of assembly membership)

आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक नुकतीच पार पडली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून दिवंगत भारत भालके यांचे पुत्र भगीरथ तर भाजपकडून समाधान आवताडे यांच्यामध्ये मोठी चुरशीची लढत पाहायला मिळाली. ही निवडणूक भाजप व महाविकास आघाडीकडून प्रतिष्ठेची करण्यात आली होती. दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यातील दिग्गज नेते झाडून सहभागी झाले होते. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली होती. या पोटनिवडणुकीत समाधान आवताडे यांनी भगीरथ भालके यांचा पराभव केला होता. यानंतर निवडणुकीतील भाजपच्या पंढरपूर पॅटर्नचा बोलबाला राज्यभर झाला.

आजच्या शपथविधी प्रसंगी माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे, विधान परिषद सदस्य आमदार प्रशांत परिचारक, भाजप जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण , उद्योजक संजय आवताडे आदी उपस्थित होते.