esakal | समाधान अवताडेंच्या हाती कमळ? परिचारकांनीच दिली फडणवीसांकडे संमती?
sakal

बोलून बातमी शोधा

Avtadr_BJP

पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सध्या अपक्ष उमेदवार अर्ज दाखल करत असले, तरी अधिकृत पक्षांची उमेदवारी जाहीर झाली नाही. दरम्यान, भाजपचे उमेदवार म्हणून समाधान अवताडे निश्‍चित होण्याच्या मार्गावर आहेत. अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे. 

समाधान अवताडेंच्या हाती कमळ? परिचारकांनीच दिली फडणवीसांकडे संमती?

sakal_logo
By
हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सध्या अपक्ष उमेदवार अर्ज दाखल करत असले, तरी अधिकृत पक्षांची उमेदवारी जाहीर झाली नाही. दरम्यान, भाजपचे उमेदवार म्हणून समाधान अवताडे निश्‍चित होण्याच्या मार्गावर आहेत. अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे. 

आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून भालके कुटुंबाबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे नाव प्राथमिक स्वरूपात चर्चेत आले होते. परंतु राष्ट्रवादीच्या पक्ष निरीक्षकांकडे कार्यकर्त्यांनी भगीरथ भालके यांना उमेदवारीची मागणी केली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूर दौऱ्यात, राष्ट्रवादीचा उमेदवार हा तुमच्या मनातील असणार असल्याचे सांगितले. मात्र भगीरथ भालके की जयश्री भालके यांच्या नावांची घोषणाही अद्याप झालेली नाही. पण कार्यकर्त्यांची मागणी भगीरथ भालके यांना आहे. 

दुसऱ्या बाजूला गत निवडणुकीत दिवंगत भारत भालके यांच्या बरोबरीने सुधाकरपंत परिचारक व दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान अवताडे हे तिघे होते. परंतु भाजपने ही जागा जिंकण्याचा इरादा स्पष्ट केल्यामुळे आमदार प्रशांत परिचारक व दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान अवताडे यांच्यात कोण कमळ धरणार? याची चर्चा असतानाच मुंबईत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठकीत आमदार परिचारक यांनीच अवताडे यांच्या नावाला संमती दिल्याचे समजते. 

याबाबत परिचारक गटातील मंगळवेढ्यातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली असता त्यांनी देखील दोघे लढून तिसऱ्याचा फायदा करण्यापेक्षा दोघे एकत्र येऊन लढा, असा सूर व्यक्त केला. तर सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनामुळे परिचारक गट कोणत्याही सार्वजनिक कार्यात सहभागी झाला नाही. परंतु त्यांनी निवडणुकीला सामोरे जाण्याऐवजी यंदा पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सहकार्य करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे भाजपकडून दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान अवताडे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब जवळपास झाले आहे. याबाबतची अधिकृत घोषणा होणे बाकी राहिले आहे. 

दरम्यान, अवताडे यांच्या समर्थकांनी सोशल मीडियातून अवताडे यांच्या फोटोच्या बरोबरीने भाजपच्या कमळ चिन्हाचा लोगो सोशल मीडियावर व्हायरल करून भाजपचा अधिकृत उमेदवार असल्याचे जवळपास निश्‍चित केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार कोण, हे अद्याप जाहीर नसला तरी भाजपचे उमेदवार अवताडे, हे निश्‍चित समजून समर्थकांनी देखील आपल्या राजकीय हालचाली गतिमान केल्या आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image