esakal | विधानसभा पोटनिवडणूक लढण्यावर समाधान आवताडे ठाम ! पक्ष की अपक्ष? गुलदस्तातच 

बोलून बातमी शोधा

Samadhan_Awtade.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक अजून जाहीर झाली नसली, तरी दामाजी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे हे मात्र निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. 

विधानसभा पोटनिवडणूक लढण्यावर समाधान आवताडे ठाम ! पक्ष की अपक्ष? गुलदस्तातच 
sakal_logo
By
हुकूम मुलाणी

सोलापूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक अजून जाहीर झाली नसली, तरी दामाजी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे हे मात्र निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. मात्र ते कोणत्या पक्षाकडून लढणार, हे देखील अद्याप अनिश्‍चित आहे. मात्र, सध्या सोशल मीडिया व जनतेमध्ये ते पूर्वीपेक्षा जास्त सक्रिय झाल्याचे दिसत आहेत. 

2014 व 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राजकीय पातळीवर लक्षवेधी ठरलेले दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे हे गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने मतदारांशी नव्या कामांची उद्‌घाटने, सांत्वन व तालुक्‍याच्या प्रश्नांबाबत सतत संपर्कात आहेत. 

दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी सध्या अनेकजण उमेरवारीचा दावा करत आहेत. त्यात आवताडे यांनी देखील या विधानसभा निवडणुकीत दावेदार असल्याचे गृहीत धरून, यापूर्वीच्या दोन निवडणुकांत अपेक्षित मतदान झाले नसलेल्या पंढरपुरातील 22 गावांवर जोर दिला आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या गटाला काही ग्रामपंचायत सदस्य हाताशी लागले आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विविध विकासकामांच्या उद्‌घाटनासाठी ते सातत्याने हजेरी लावून मतदारांशी संपर्क ठेवून आहेत. 

मंगळवेढा तालुक्‍यातील दामाजी कारखान्यासह प्रमुख सहकारी संस्था त्यांच्या ताब्यात आहेत. शिवाय चुलते बबनराव आवताडे यांचे राजकीय पाठबळ असल्यामुळे त्यांचे समर्थक त्यांनी निवडणूक लढवावी, या मुद्द्यावर ठाम आहेत. दामाजी कारखान्याच्या कार्यक्रमादरम्यान त्यांनी आपल्याशी राष्ट्रवादी व भाजपचे वरिष्ठ नेते संपर्कात असल्याचे सांगत राजकीय पातळीवर खळबळ उडवून दिली आहे. परंतु त्यांच्याशी कोण संपर्कात होते, यावर व संबंधित राजकीय पक्षाच्या कोणत्या प्रवक्‍त्यांनी संपर्क साधला हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही. राजकारणात कधीही काहीही घडू शकते, याचा नेम नसल्याचे चित्र सध्या मतदारसंघात दिसत आहे. महाविकास आघाडीत असताना शैला गोडसे यांचे समर्थक जागा आपलीच आहे म्हणून उमेदवारी द्यावी, अशी भूमिका मांडू लागले आहेत. तर आमदार प्रशांत परिचारक व भगीरथ भालके यांच्यात सध्या निमार्ण होत असलेले सलोख्याचे संबंध पाहता ते कोणती भूमिका घेणार, याबाबत देखील चर्चा सुरू झाली आहे. 

विठ्ठल परिवारात वादंग 
विठ्ठल परिवारात भगीरथ भालके यांच्या उमेदवारीवरून व विठ्ठल सहकारी कारखान्यावरून सध्या वादंग निर्माण झाले आहे. त्यामुळे राजकीय हालचाली निर्णायक टप्प्यावर येऊन थांबल्या असून, आवताडे हे अधिकृत पक्षाकडून लढणार अपक्ष, ही भूमिकाही निर्णायक ठरणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल