मोबाईल व दुचाकी चोरणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

सांगोला तालुक्यातील आठवडा बाजारातून दुचाकी व मोबाईल चोरणारी टोळी सांगोला पोलिसांनी जेरबंद केली आहे. त्यात तीन पुरुष तर एका महिलेचा समावेश आहे.

Crime News : मोबाईल व दुचाकी चोरणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात

महूद - सांगोला तालुक्यातील आठवडा बाजारातून दुचाकी व मोबाईल चोरणारी टोळी सांगोला पोलिसांनी जेरबंद केली आहे. त्यात तीन पुरुष तर एका महिलेचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चार दुचाकींसह २१ मोबाईल हँडसेट असा एकूण पाच लाख १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. महूदसह सांगोला तालुक्यातील आठवडा बाजारात या चोरट्यांमुळे भीतीचे वातावरण पसरले होते.

२६ जानेवारी रोजी महूद येथील यश हनुमंत कारंडे यांची दुचाकी चोरीला गेली होती. या गुन्ह्याचा तपास मंगळवेढ्याचे पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील व सांगोला पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. चोरांचा छडा लावण्यासाठी एक स्वतंत्र तपास पथक तयार करण्यात आले होते. २२ फेब्रुवारी रोजी बागलवाडी व अचकदाणी (ता. सांगोला) येथील दोन व्यक्ती त्यांच्याकडील कागदपत्रे नसलेल्या दुचाकी कमी किमतीत विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली.

त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांच्याकडील विनाक्रमांकाची दुचाकी महूद (ता. सांगोला) येथून चोरी केल्याचे समोर आले. त्यांच्याकडे अधिक तपास केल्यावर इतर दोन साथीदारांना सोबत घेऊन जत, कोल्हापूर, कर्नाटक येथून दुचाकी चोरी केल्याचे त्यांनी कबूल केले. पोलिसांनी दुचाकी चोरी करणारे संशयित आरोपी प्रवीण भाऊसाहेब चळेकर, समाधान दत्तात्रय माने (दोघेही रा. बागलवाडी, ता. सांगोला), नैशाद पैगंबर मुलाणी (रा. अचकदाणी, ता. सांगोला) व अल्पवयीन मुलाला जेरबंद केले. या गुन्ह्यात तीन संशयितांसह एक अल्पवयीन बालक देखील आहे.

३० जानेवारी २०२२ रोजी सांगोला येथील आठवडा बाजारातून शिवणे (ता. सांगोला) येथील तानाजी हरीबा घाडगे यांचा मोबाईल चोरट्याने चोरून नेला होता. मोबाईल चोरणारी महिला शाहिदा महादेव तुपे (रा. पाणवन, ता. माण, जि. सातारा) ही असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पाणवन येथे जाऊन शाहिदा तुपे हिला ताब्यात घेतले. तिच्याकडून सांगोला तालुक्यातील विविध आठवडा बाजारांतून व इतर ठिकाणाहून चोरलेले वेगवेगळ्या कंपनीचे तीन लाख ९७ हजार ५०० रुपयांचे तब्बल २१ मोबाईल हस्तगत केले. दरम्यान, मोबाईल आणि दुचाकी चोरी करणाऱ्या मोठ्या टोळीचा छडा लावण्यात सांगोला पोलिसांना यश आले आहे.

‘या’ पथकाची मोठी कामगिरी

सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र राजुलवार, पोलिस हवालदार दत्ता वजाळे, विकास क्षीरसागर, अभिजित मोहोळकर, बाबासाहेब पाटील, लक्ष्मण वाघमोडे, प्रियांका बनसोडे, अर्चना चव्हाण व सायबर पोलिस ठाण्याचे युसूफ पठाण यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.