१३ दिवसांनंतरही सरपंच ‘भाभी’ सापडल्या नाहीत! गावचा कारभार उपसरपंचांकडे?

कवठे (ता. उत्तर सोलापूर) गावच्या सरपंच भाभी जैतुनबी शेख या ७ सप्टेंबरपासून बेपत्ता आहेत. १३ दिवसांपासून त्या बेपत्ता असल्याने आता गावचा कारभार ग्रामपंचायत अधिनियमानुसार उपसरपंचांकडे दिला जाईल.
crime
crimeesakal

सोलापूर : कवठे (ता. उत्तर सोलापूर) गावच्या सरपंच भाभी जैतुनबी शेख या ७ सप्टेंबरपासून बेपत्ता आहेत. त्या स्वत:हून बेपत्ता झाल्या की कोणी घातपात केला, याचा ठावठिकाणा अद्याप शहर पोलिसांना लागलेला नाही. १३ दिवसांपासून त्या बेपत्ता असल्याने आता गावचा कारभार ग्रामपंचायत अधिनियमानुसार उपसरपंचांकडे दिला जाईल, अशी माहिती उत्तर सोलापूर पंचायत समितीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

बुधवारी (ता. ७) भरदुपारी साडेबाराच्या सुमारास पावणेपाच वर्षे गावचा कारभार हाकलेली महिला सरपंच बेपत्ता होते आणि त्यांच्या कुटुंबियांसह गावातील कोणालाच काहीही माहिती होत नाही, ही बाब पोलिसांना पण विचार करायला लावणारी आहे. सलगर वस्ती पोलिसांनी गावातील जवळपास १०० लोकांकडे सरपंच भाभीबद्दल विचारपूस केली. त्यावेळी ‘भाभी अच्छी थी, उनका किसीसे कोई झगडा नही था’ हेच उत्तर पोलिसांना सातत्याने ऐकायला मिळाले. परंतु, सर्वांसोबत चांगले संबंध असणारी भाभी गाव तथा गावचा कारभार सोडून गेली कुठे, याचा शोध पोलिसांना आव्हानात्मक झाला आहे. सरपंच भाभीच्या कुटुंबियांसह गावातील एकूण १२ जणांचे जबाब सुध्दा पोलिसांनी घेतले. पण, पोलिसांच्या हाती ठोस पुरावा लागलाच नाही. एका गावची सरपंच महिला भर दुपारी गावच्या शिवारातून बेपत्ता होते आणि १३ दिवस होऊनही पोलिसांना त्यांचा शोध लागत नाही, ही बाब चिंताजनक मानली जात आहे. दरम्यान, सरपंच भाभीचा कालावधी साधारणत: तीन-चार महिन्यांपर्यंतच आहे. गावच्या विकासासाठी धोरणात्मक निर्णय घेताना प्रशासकीय अडचणी येत असल्याने पुढील आठवड्यातील मासिक सभेत उपसरपंचाकडे गावचा कारभार येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘ती’ चप्पल भाभीच्या पतीची

ज्या दिवशी सरपंच भाभी गावातून बेपत्ता झाल्या. त्यादिवशी शेळ्या चारायला गेलेल्या भाभी स्वत:ची चप्पल तुटल्याने पतीची चप्पल घालून गेल्या होत्या, ही बाब पोलिस चौकशीत समोर आली आहे. दुसरी चप्पल देखील पोलिसांना सापडलेली नाही. कवठे गावचा अख्खा परिसर पोलिसांनी पडताळून पाहिला. गावातील लोकांकडे विचारपूस केली. तरीदेखील सरपंच भाभींचा सुगावा लागला नाही. पोलिसांनी पंढरपूर, कामती येथील पोलिस ठाण्यात चौकशी केली. गोपाळपूर येथील आश्रमात पाहिले, पण भाभी सापडल्याच नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com