पाकिस्तानने सुटका केलेले मात्र तीन महिने अमृतसरमध्ये अडकून पडलेले सत्यवान पोचले सुखरूप घरी ! 

Bhonge
Bhonge

कुर्डू (सोलापूर) : पुणे येथून हरवलेले व पाकिस्तानात पोचलेले सोलापूर जिल्ह्यातील सत्यवान भोंग यांची पाकिस्तानने सुटका केली होती. मात्र भारतात येऊनही ते अमृतसरमध्ये तीन महिने अडकून पडले होते. अखेर ते गुरुवारी (ता. 4) आपल्या गावी लऊळ (ता. माढा) सुखरूप पोचले. या वेळी "आमचे कुटुंब प्रमुख 2013 पासून पाकिस्तानात हरवले होते. सात वर्षांनी ते सुखरूप घरी पोचले,' अशा भावना व्यक्त करत त्यांची आई, भाऊ, पत्नी व मुलांच्या आनंदापुढे आकाश ठेंगणे झाले. 

सत्यवान यांना उपचारासाठी पुणे येथे नेण्यात आले होते. तेथून ते 2013 मध्ये हरवले. मात्र त्यानंतर ते पाकिस्तानात सापडले. फेब्रुवारी 2020 मध्ये कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात सत्यवान यांची विचारणा करण्यात आली. पोलिसांनी सत्यवान यांची माहिती व खात्री करण्याकामी कुटुंबीयांना बोलावले. त्यावर सत्यवानचे भाऊ दिगंबर हे पोलिस ठाण्यात आल्यावर त्यांना सत्यवान हे पाकिस्तानच्या तुरुंगात कैदेत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. 

पाकिस्तानात गेलेले सत्यवान भोंग यांना ऑक्‍टोबर 2020 मध्ये पाकिस्तान सरकारने भारताच्या ताब्यात दिल्यानंतर अमृतसर जिल्हा प्रशासनाने गुरुनानक सेवा संस्था, अमृतसर (पंजाब) येथे ठेवले होते. महाराष्ट्र सरकारची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लोटला. ही प्रक्रिया पूर्ण करून कुर्डुवाडी पोलिस पथक अमृतसरला रवाना झाले होते. 

कुर्डुवाडीहून अमृतसर येथे गेलेल्या पथकाला तेथील जनसंपर्क अधिकारी शर्मा यांनी अमृतसर आझाद पोलिस स्टेशन येथे जाण्यास सांगितले. पोलिस स्टेशनच्या जवळच असलेल्या गुरुनानक सेवा संस्थेमध्ये सकाळी हे पथक दाखल झाले. तेथे बेडवर बसलेल्या सत्यवान यांना पोलिस उपनिरीक्षक वाघमारे यांनी नाव व गाव विचारले असता त्यांनी केवळ सत्यवान भोंग व गाव लऊळ असल्याचे सांगितले. 

तेथील तहसीलदार यांच्याकडून सत्यवान भोंग यांना पथकाने ताब्यात घेतल्यानंतर मुंबईपर्यंत गोल्डन टेम्पल एक्‍स्प्रेस रेल्वेने त्यांना 4 फेब्रुवारी रोजी सकाळी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वेने आणण्यात आले व मुंबईहून बोरीवली - बार्शी या राज्य परिवहनच्या बसने पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे, पोलिस कर्मचारी समीर पठाण व विजय जगताप, पुतण्या गणेश भोंग हे सातव्या दिवशी सत्यवान यांना घेऊन कुर्डुवाडी बस स्थानकात उतरले. सत्यवान यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतरच लऊळ येथे घरात पुतण्या गणेशच्या ताब्यात देण्यात आले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com