उन्हाळा सुट्टीतही भरणार शाळा! निर्णय शिक्षकांसाठी ऐच्छिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

03School_20fb_20_20Copy_2.jpg
उन्हाळा सुट्टीतही भरणार शाळा! निर्णय शिक्षकांसाठी ऐच्छिक

उन्हाळा सुट्टीतही भरणार शाळा! निर्णय शिक्षकांसाठी ऐच्छिक

सोलापूर : कोरोनामुळे 9 मार्च 2019 रोजी बंद झालेल्या शाळा (पहिली ते पाचवी) थेट फेब्रुवारी 2022 मध्येच उघडल्या. जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील जवळपास 80 हजार विद्यार्थ्यांकडे ऍन्ड्राईड मोबाइल नसल्याने त्यांना ऑनलाइन शिक्षणदेखील घेता आले नाही. दुसरीकडे पालकांनी काही महिन्यांनी मुलांचे ऑनलाइन शिक्षण बंद केले. या पार्श्‍वभूमीवर कोरोना काळातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरुन काढण्याच्या हेतूने उन्हाळा सुट्टीतही शाळा सुरु ठेवण्यात येतील. तत्पूर्वी, शिक्षक संघटनांशी चर्चा करून ऐच्छिक स्वरुपात शिक्षकांनी सामाजिक बांधिलकीतून विद्यार्थ्यांना शिकवावे ही अपेक्षा आहे.

हेही वाचा: राष्ट्रवादीसह विरोधकांचा चक्रव्यूह! कॉंग्रेसमधील पक्षांतरामुळे आमदार प्रणिती शिंदे एकाकी

शिक्षकांना 2 मे ते 14 जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी जाहीर झाली आहे. कोरोना काळात शाळा बंद असल्याने बहुतेक दिवस त्यांना घरातूनच ऑनलाइन शिकवावे लागले. कोरोनाच्या संकटात को-मॉर्बिड रुग्णांचा घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करणे, कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग अशा विविध कामांसाठी त्यांनी मदत केली. विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास निर्बंध असतानाही शिक्षकांनी दररोज शाळेत येऊन त्यांना ऑनलाइन शिकविले. पण, कोरोनाच्या संकटामुळे दररोज एक ना एक घरात कोरोनाचा रुग्ण आढळत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना निवांतपणे शिकता आलेले नाही. दुसरीकडे अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांचे हातावरील पोट असल्याने मुलांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी ऍन्ड्राईड मोबाइल घेऊन देता आला नाही. अशा मुलांसाठी झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी 'पारावरील शाळा' हा महत्वकांक्षी उपक्रम राबविला. त्यातून अनेक विद्यार्थ्यांना ऑफलाइन शिक्षण घेता आले. तरीही, विद्यार्थ्यांना कोरोनाच्या धास्तीने व्यवस्थीत शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे सामाजिक बांधिलकीतून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षक सहकार्य करतील, अशी अपेक्षा मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी व्यक्‍त केली.

हेही वाचा: पुन्हा खोटेच आश्‍वासन! हप्ते पाडण्याचा आदेश नसल्याने शेतीपंपाचे वीज कनेक्‍शन तोडणी सुरुच

निर्णय शिक्षकांसाठी ऐच्छिक
कोरोना काळातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरुन काढण्यासाठी ज्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकलेला नाही. त्यासह सर्व शाळा उन्हाळा सुट्टीतही सुरु ठेवण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यासंबंधीचा निर्णय होईल. तो निर्णय शिक्षकांसाठी ऐच्छिक असेल.
- दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

हेही वाचा: झेडपीवर 21 मार्चपासून प्रशासक! पंचायत समित्यांची मुदत 13 मार्चपर्यंतच

कोरोना परतीच्या वाटेवर
जिल्ह्यातील सर्व शाळा आता सुरु झाल्या असून दिलासादायक बाब म्हणजे एकाही शाळेतील विद्यार्थ्याला कोरोनाची बाधा झालेली नाही. प्रत्येक शाळांमध्ये कोरोना संबंधीचे नियम तंतोतंत पाळले जात आहेत. प्रतिबंधित लसीकरणही 80 टक्‍क्‍यांहून अधिक झाले आहे. दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर हे कोरोनामुक्‍त झाले आहेत. सोलापूर शहरासह अक्‍कलकोट, माळशिरस हे तालुके कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर आहेत. बार्शी, मंगळवेढ्याचा ग्रामीण भाग कोरोनामुक्‍त झाला आहे. त्यामुळे उन्हाळा सुट्टीत काही तासांसाठी शाळा सुरु करण्याचे नियोजन सुरु झाले आहे.

Web Title: School To Be Filled Even During Summer Vacation The Decision Is Optional For

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..