सोलापूर : महापालिकेतील "वर्ग-चार' कर्मचाऱ्यांच्या बदली, रजा नोंदी, शास्ती, वार्षिक वेतनवाढ, वेतन निश्चिती, वारसपत्र नोंद व मागासवर्ग प्रवर्गातून नियुक्त सेवकांच्या वैधता प्रमाणपत्राच्या नोंदी विभागप्रमुख तथा मुख्य लेखापाल कार्यालयाकडून अपडेट होतात. मात्र, दोन हजारांपैकी सुमारे 309 कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके सेवेत रुजू झाल्यापासून तर चारशेहून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोंदी काही वर्षांपासून अपूर्णच आहेत. आयुक्तांनी आता 31 ऑगस्टची मुदत दिली असून, मुदतीत सेवापुस्तकातील नोंदी पूर्ण न करणाऱ्यांची वेतनवाढ महाराष्ट्र नागरी सेवा कायद्यानुसार कायमस्वरूपी रोखली जाणार आहे. तसे पत्र आयुक्त पी. शिवशंकर यांनी बजावले आहे.
हेही वाचा : राष्ट्रवादी बदलतेय... सत्तेतील चुका सुधारतेय
मागासवर्ग प्रवर्गातून नियुक्त तथा पदोन्नत कर्मचाऱ्यांच्या वैधता प्रमाणपत्राची व सामान्य प्रशासन विभागाकडून वैधता प्रमाणपत्रासंबंधी दिलेल्या आदेशाची नोंद सेवापुस्तकाच्या पहिल्या पानावर अपेक्षित आहे. मात्र, बहुतांश कार्यालयाकडील आस्थापना लिपिक अथवा सेवापुस्तक हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी अशाप्रकारची कार्यवाही केली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच बऱ्याच सेवकांचे नियुक्तीपासून सेवापुस्तकच भरलेले नाही. त्यामुळे एखादा कर्मचारी अचानक मृत झाल्यास त्यांच्या पेन्शन, उपदान, शिल्लक रजा तपासणीसाठी तांत्रिक अडचणींचा सामाना महापालिकेला करावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्व खातेप्रमुख तथा शाखाप्रमुख किंवा सेवापुस्तक हाताळणाऱ्यांनी त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके अद्ययावत करावीत, असे पत्र आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांना बजावले आहे.
हेही वाचा : पंढरपुरात चंद्रभागा नदीला पूर; जुना दगडी पूली पाण्याखाली
आदेशातील ठळक बाबी...
- "वर्ग-चार' आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके पूर्णपणे भरल्याची खात्री करावी
- प्रथम नियुक्ती आदेश तथा वेळोवेळी दिलेल्या मुदतवाढी अथवा सेवा नियमितच्या नोंदी अद्ययावत कराव्यात
- वर्ग-चारमधील आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची पदनिहाय स्वतंत्र यादी तयार करावी
- निलंबन आदेश अथवा शास्ती झालेल्या कर्मचाऱ्यांच्या शास्ती नोंद सेवापुस्तकात घेण्यात यावी
- कार्यरत कर्मचाऱ्यांकडून वारसपत्र भरून घेऊन ते रीतसर आवक रजिस्टरला नोंद घेऊनच सेवापुस्तकात घ्यावी
- आवक रजिस्टरला नोंद न केलेले वारसपत्र सेवापुस्तकात घेतल्यास ते वारसपत्र ग्राह्य धरले जाणार नाही
मुदतवाढ द्यायची की नाही, ऑगस्टनंतर ठरेल
याबाबत महापालिका आयुक्त पी. शिवशंकर म्हणाले, महापालिकेतील चतुर्थश्रेणी प्रवर्गातील किती कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके पूर्ण, अपूर्ण आहेत याची माहिती यातून मिळेल. त्यानंतर कोणते कर्मचारी कोरोना ड्यूटीसाठी आहेत, सेवापुस्तके अपूर्ण का राहिली, मुदतवाढ देणे गरजेचे आहे का, याचा आढावा घेतला जाईल. त्यानुसार संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.
विभागप्रमुखांच्या मनमानीला बसणार चाप
विभागप्रमुखांकडील कर्मचारी परस्पर रजेवर गेल्यानंतरही त्यांचा पगार काढणे, अर्ज न घेताच रजा देणे असे प्रकार सुरू आहेत. चार-सहा महिन्यांनंतर एकदाच सेवापुस्तकातील नोंदी पूर्ण करणे, असेही प्रकार होत असल्याची चर्चा आहे. आता सर्व कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके उपायुक्तांकडे ठेवली जाणार आहेत. त्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार असल्याने विभागप्रमुखांच्या मनमानीला चाप बसेल, असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, आयुक्तांनी सेवापुस्तकातील नोंदी पूर्ण करण्यासाठी दिलेली मुदत महिनाभर वाढवावी, अशी मागणी विभागप्रमुखांसह कामगार नेत्यांनी केली आहे. परंतु, कामचुकारपणा करणाऱ्यांना आयुक्त मुदतवाढ देणार का, जाणीवपूर्वक नोंदी अर्वधवट ठेवणाऱ्यांची वेतनवाढ रोखली जाणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
संपादन : श्रीनिवास दुध्याल |
|