शिरभावी पाणीपुरवठा योजना वरदान पण थकबाकीमुळे संकटात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणीपुरवठा

शिरभावी पाणीपुरवठा योजना वरदान पण थकबाकीमुळे संकटात

सांगोला - सांगोला तालुक्‍यातील ८२ गावांसाठी वरदान ठरलेली शिरभावी पाणीपुरवठा योजना यावर्षी एप्रिल महिना सुरु झाला तरी फक्त पाच गावांच्या मागणीनुसार पाणीपुरवठा सुरु आहे. त्यातही तीन गावांचा रेल्वेच्या खोदकामामुळे पाणीपुरवठा बंद असून फक्त मांजरी व देवळे या दोनच गावांना पाणीपुरवठा सुरू आहे. या योजनेची मार्च २०२२ अखेर विविध ग्रामपंचायत व संस्थांकडे १ कोटी ४ लाख ६६ हजार २९२ रुपयांची थकबाकी आहे तर वर्षभरात २६ लाख ४० हजार ६९ रुपयांची वसुलीही झाली आहे.

तालुक्‍यासाठी वरदान ठरलेल्या शिरभावी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेच्या पाणीपुरवठ्यासाठी ग्रामपंचायतीची मागणीच होत नाही. सध्या तालुक्‍यात टेंभू, म्हैसाळ, नीरा उजवा कालवा व राजेवाडी कॅनॉलचे पाणी मिळत असल्याने यंदाच्या उन्हाळ्यात आतापर्यंत पाणी टंचाई नसल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या फक्त पाच गावांना मागणीनुसार पाणी पुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे २०१८ च्या दुष्काळात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये म्हणून शिरभावी पाणीपुरवठा योजनेतून मंगळवेढा व पंढरपूर तालुक्‍याला पाणीपुरवठा केला होता. मात्र गेल्या चार वर्षापासून मंगळवेढा आणि पंढरपूर पंचायत समितीकडे शिरभावी पाणीपुरवठा योजनेची थकबाकी आहे तशीच आहे. ऐन उन्हाळ्यातदेखील वेळेवर पाणीपुरवठा होणारा तालुका म्हणून सांगोला तालुक्‍याची ओळख आहे. दुष्काळी सांगोला तालुक्‍याची जीवनदायिनी ठरलेली शिरभावी पाणीपुरवठा योजना थकबाकीमुळे आर्थिक संकटात सापडली आहे.

शिरभावी पाणीपुरवठा योजनेची थकबाकी

शिरभावी - २,१२,०१३, संगेवाडी - १,७२,८०३, मेथवडे - ६,६९,२५१, मेथवडे (माळीवस्ती) - १,७१,३५३, देवळे - ६०,२७३, मांजरी - ४,६४,७०६, बामणी - ४४,३६७, सावे - १,०६,३४८, धायटी - ८९,८७८, चिंचोली - १,७९,१३७, हलदहिवडी - १२,११३, वाकी शिवणे - १,३५,९०६, शिवणे - ६९,७८६, खिलारवाडी - २७,९०९, महूद बु. - १२,४७,०३२, महिम - १,५४,७३२, देवकतेवाडी - १,२१,६८३, खवासपूर - २,९७,०६५, एखतपूर - ६९,६९८, लोटेवाडी - ७१,७६०, कटफळ - २९,५८३, अचकदाणी - १,३४,१५४, लक्ष्मीनगर - ३,२०,४२४, सोनलवाडी - ४८,४३५, बागलवाडी - २७, नरळेवस्ती - ३,२२,९८७, आलेगांव - ४९,८७५, वाढेगांव - ९,५०,३२६, मानेगांव - २,१४२, लोणविरे - ५४,६४७, हणमंतगांव - ३,९६२, आगलावेवाडी - १,३८,२४४, बुरुंगेवाडी - ५९,४९०, जवळा - ५३,५४२, कारंडेवाडी - २,०६,३१२, तरंगेवाडी - ६८,१७२, भोपसेवाडी - १,७१,७०३, नाझरे - ८७,७७८, वझरे - २,७३,३६८, बलवडी - २,२७,२९१, अनकढाळ - ४१,१३७, वाटंबरे - २,८९३, य. मंगेवाडी - १,२४,१२१, गोडसेवाडी - ४६,८५५, अकोला - २,१६,७४६, कोळा - ५,२४,३३५, बुद्धेहाळ - ३८,१८२, सोमेवाडी - १,४१,९२५, राजापूर - १,०७,९६७, हबीसेवाडी - ९५,८०३, डिकसळ - ८,१४४, हंगिरगे - १,०१,१२३, जुजारपूर - २,४३,४४०, पाचेगांव खु. - २८,०९२, हायवे कोळा - २०,८९८ या गावांकडे मिळून सुमारे ९२ लाख ३० हजार ३८५ रुपयांची थकबाकी आहे. तर शेतकरी सूतगिरणीकडे - ६,२४,८२४ येणेबाकी आहे.

ग्रामपंचायतींची पाणीपुरवठ्यासाठी मागणी नाही

तालुक्‍यात टेंभू, म्हैसाळ, नीरा उजवा कालवा व राजेवाडी कॅनॉलचे पाणी मिळाले असल्याने यंदाच्या उन्हाळ्यात आतापर्यंत पाणी टंचाई जाणवली नाही. या योजनांच्या पाणीपुरवठ्यामुळे ग्रामपंचायती गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी सक्षम असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी शिरभावी पाणीपुरवठा योजनेकडे मागणी करीत नाहीत. पाण्याची मागणी नसल्यामुळे थकीत वसुलीही भरली जात नसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. एप्रिलच्या मध्यापासून किंवा मे महिन्यात विविध ग्रामपंचायती शिरभावी योजनेच्या पाण्यासाठी मागणी करतील असे चित्र आहे.

एप्रिलच्या अखेरपर्यंत थकबाकीदारांना सवलत

या योजनेतील थकबाकी असणाऱ्या ग्रामपंचायत व अन्य थकबाकीदार यांनी एप्रिल महिनाअखेरीस आपली शंभर टक्के पूर्ण रक्कम भरल्यास रकमेवर लावलेला विलंब आकार माफ केला जाणार आहे. थकबाकीदारांना या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

टॅंकरची थकबाकी

मंगळवेढा पंचायत समिती :

४,२१,२७६

पंढरपूर पंचायत समिती :

४३,२००

सांगोला तहसील :

१,४६,६७२

Web Title: Shirbhavi Water Supply Scheme Boon But Crisis Due Arrears

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top