esakal | शिवसेनेसमोर आव्हान 'कोठे पर्व' रोखण्याचे !
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेसमोर आव्हान 'कोठे पर्व' रोखण्याचे!

कॉंग्रेसमधून शिवसेनेत आलेले महेश कोठे यांनी "बाणा'ला अखेरचा "जय महाराष्ट्र' करत आपल्या "हाता'वर "घड्याळ' बांधले आहे.

शिवसेनेसमोर आव्हान 'कोठे पर्व' रोखण्याचे!

sakal_logo
By
अरविंद मोटे

सोलापूर : कॉंग्रेसमधून (Congress) शिवसेनेत (Shiv Sena) आलेले महेश कोठे (Mahesh Kothe) यांनी "बाणा'ला अखेरचा "जय महाराष्ट्र' करत आपल्या "हाता'वर "घड्याळ' बांधले आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुकीत (Municipal Corporation Election) याचा थेट परिणाम होणार आहे. सध्या महापालिकेत दोन नंबरवर असलेला शिवसेना पक्ष महाराष्ट्रात सत्ताधारी आहे. प्रत्यक्ष मुख्यमंत्री शिवसेनेचे असून "शत प्रतिशत' शिवसेना हे ध्येय ठेवून शिवसंपर्क यात्रेतून आगामी निवडणुकांसाठी पक्षाने कंबर कसली आहे. आता शिवसेनेसमोर महापालिकेत आजवर साथ मिळालेल्या महेश कोठेंचा प्रभाव रोखणे, हे महत्त्वाचे आव्हान आहे.

हेही वाचा: संभाजी तलावातील शेकडो मासे मृत्युमुखी! कारण मात्र अस्पष्ट

कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक वर्षे महापालिकेवर सत्ता गाजवलेले महेश कोठे एक विशिष्ट वळणावर शिवसेनेत दाखल झाले होते. महेश कोठे यांच्या म्हणण्यानुसार "चाळीस वर्षे कॉंग्रेसने त्यांची फसवणूक केली. मग शिवसेना पाहिली, आता राष्ट्रवादी काय करते ते पाहूया...' सोलापूर महापालिकेच्या राजकरणात महेश कोठे हे प्रभावशाली व्यक्तिमत्त्व आहे. दिवंगत विष्णुपंत कोठे यांच्यापासून त्यांनी अनेक वर्षे महापालिकेचे राजकरण स्वत:भोवती फिरवत ठेवले आहे. प्रत्येक नेत्याच्या मागे नेता जेथे जाईल तसे फिरतील, असे काही कार्यकर्ते, नगरसेवक असतात. त्यांची निष्ठा पक्षाऐवजी आपल्या नेत्यावर असते. यामुळे नेत्याने पक्ष बदलला की अशा कार्यकर्त्यांनीही पक्ष बदललाच म्हणून समजा. जसे कार्यकर्ते, पुढारी आणि नगरसेवक असतात तसे काही मतदारही असतात. त्यांनाही पक्षाशी, चिन्हाशी काहीच देणे- घेणे नसते, त्यांची निष्ठा व्यक्तिसापेक्ष असते. असा मतदार या नेत्यांच्या प्रभावाने बदलतो.

महेश कोठे जातील त्या पक्षात जाणारे सहा ते आठ नगरसेवक आहेत. देवेंद्र कोठे, प्रथमेश कोठे, विठ्ठल कोटा यापैकी काही घरातील तर काही नात्यागोत्यातील आहेत. महेश कोठे हे मागील अनेक दिवसांपासून पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष राहिले असून त्यांच्यामागील पद्मशाली समाज "आपला माणूस' माणून गुणदोष पदरात घेत मतदान करणारा आहे. या समाजाचे मतदार असलेल्या विडी घरकुल व पूर्व भागातील जागा राखणे आता शिवसेनेला कठीण जाणार आहे. महेश कोठे यांचा प्रभाव अनेक संस्था, विविध उपक्रमांच्या माध्यमातून पद्मशाली समाजासह इतर समाजावर आहे, हे नाकारता येत नाही. यासाठी शिवसेनेला नवी राजकीय समीकरणे मांडावी लागतील. याच समाजात अनेक जुने कट्टर शिवसैनिक आहेत. शिवसंपर्क मोहिमेतून अनेक कार्यकर्त्यांची जमवाजमव शिवसेनेने केली आहे. ही मोट बांधून महेश कोठे यांच्याबरोबर सेनेबाहेर जाणारा समाज व पुढारी रोखणे आवश्‍यक आहे. महेश कोठे यांच्यामुळे तुटलेल्या मतदारांची नव्याने भर घालावी लागणार आहे.

हेही वाचा: अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणाचा खून! तुळजापूर रोड येथील घटना

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष महापालिकेच्या निवडणुकीत स्वतंत्र लढण्यावर सध्या तरी ठाम आहेत. यामुळे सर्वाधिक नगरसेवक निवडून आणणे हे मोठे शिवधुनष्य शिवसेनेला पेलायचे आहे. जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, युवासेना निवडीतील हेवेदावे आणि एकाच वेळी चार-चार प्रमुख नेते, संपर्काबाहेरील संपर्क प्रमुख या साऱ्यांचा फटका शिवसेनेला सहन करावा लागणार आहे. हे रोखण्यासाठी शिवसंपर्क मोहिमेतून निर्माण झालेले चैतन्य टिकले व नवे-जुने शिवसैनिक एकत्र राहिले, अंतर्गत गटबाजीला थारा न देता लढले तर सत्ताधारी भाजपसमोर तगडे आव्हान निर्माण होईल. दोन नंबरवरील शिवसेना नक्कीच क्रमांक एकवर येईल.

आमदार सावंतांबद्दल पुन्हा खदखद

2019 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाकडे योग्य उमेदवार असतानाही इतर पक्षातून आयात केलेल्या लोकांना उमेदवारी दिल्याने संपर्कप्रमुख तथा आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात पक्षात खदखद निर्माण झाली होती. त्यानंतर आमदार सावंत हे बरेच दिवस पक्षापासून दुरावल्याचे चित्र होते. आता ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. मात्र, सक्रिय होताच त्यांच्याविरुद्ध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये पुन्हा खदखद निर्माण झाली असून, दोन दिवसांपूर्वीच जिल्हा उपप्रमुख महेश चिवटे यांनी आमदार सावंत यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठवून तक्रार केली आहे.

loading image
go to top