
सोलापूर : सोलापूर शहरातील खासगी व शासकीय दवाखान्यांमध्ये वर्षभरात साधारण १९ ते २० हजार बाळे जन्मतात. मुदतपूर्व प्रसूती आणि कमी वजन या कारणांमुळे वर्षभरात साधारण ४५० बाळांचा मृत्यू होतो. त्यामुळे बाळांच्या सुदृढ आरोग्यासाठी, आईचे दूध महत्त्वाचे आहे. बालमृत्यू कमी करण्याकरिता महापालिका दाराशा हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक माता दूध बॅंक उभारण्यात येणार आहे.
बदलती जीवनशैली, विचारांतील आधुनिकता यामुळे प्रसूतीनंतर बाळाच्या स्तनपानाऐवजी दूध पावडर, गायीचे पॅकबंद पिशवीतील दूध वापरले जाते. ही कारणे सुदृढ पिढीच्या जडणघडणीला अडथळा ठरत आहे. कृत्रिम दुधाच्या तुलनेत आईच्या दुधामुळे बाळाचा सर्वांगीण विकास होतो. बाळाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी त्याला दुधातून न्यूट्रिशन मिळत असतात. कमी वजनाची बालके जन्माला आल्यापासून त्यांना २८ दिवसांमध्ये योग्य न्यूट्रिशन न मिळाल्याने बालके दगावतात. त्यांना आवश्यक न्यूट्रिशन आईच्या दुधातूनच मिळतात.
बालमृत्यूच्या प्रमाणावर नियंत्रण आणण्यासाठी आईचे दूध महत्त्वाचे असल्याचे वैद्यकीय व वैज्ञानिक संस्थांच्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, साताऱ्याच्या धर्तीवर सोलापूर महापालिका माता दूध बॅंक सुरू करत आहे. महापालिकेने नुकतेच नूतनीकरण केलेल्या दाराशा हॉस्पिटलमध्ये या दूध बॅंकेची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी एक कोटींचा खर्च अपेक्षित असून याचे काम लवकरच सुरू होईल, असे सोलापूर महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
आकडे बोलतात...
२०२२-२३
एकूण बाळांचे जन्म : २१ हजार ८५९
अडीच किलोपेक्षा कमी वजनाची बाळे : ३ हजार ९२१
शून्य ते पाच वर्ष वयोगटातील मृत्यू : ४६०
---------------------------------------------------------------------------
२०२३-२४
एकूण बाळांचे जन्म : १९ हजार ३९३
अडीच किलोपेक्षा कमी वजनाची बाळे : ४ हजार २४१
शून्य ते पाच वर्ष वयोगटातील मृत्यू : ४५२
----------------------------------------------------------------------------
२०२४-२५
एकूण बाळांचे जन्म : १९ हजार ३३४
अडीच किलोपेक्षा कमी वजनाची बाळे : ३ हजार ३५४
शून्य ते पाच वर्ष वयोगटातील मृत्यू : ४५५
मानवी दूध बॅंक सुरू करणार आहोत
शहरातील दवाखान्यांमध्ये जन्माला येणाऱ्या बाळांपैकी १७ ते २० टक्के बाळे हे कमी वजनाची असतात. या बाळांना आईचे दूध मिळत नसल्याने मृत्यू पावणाऱ्या बाळांची संख्या अडीच टक्के आहे. हे प्रमाण कमी होण्याच्या दृष्टीने आणि बालकांना योग्य न्यूट्रिशन मिळावे, या उद्देशाने मानवी दूध बॅंक सुरू करणार आहोत. यासाठी साधारण एक कोटी रुपये लागणार असून, रोटरी क्लबच्या माध्यमातून निधी उभारला जात आहे.
- आशिष लोकरे, उपायुक्त, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.