Pandharpur News : श्री विठुरायाच्या राऊळाला येतेय नवी झळाळी; चार दरवाजांवर लवकरच चांदीचे आवरण

विठुरायाच्या मंदिरात अलीकडच्या तीस-पस्तीस वर्षांत पुरातत्त्व विभागाच्या सूचनांकडे काणाडोळा करून अनेक प्रकारची कामे केल्याने मूर्तीला आणि मंदिराला धोका निर्माण झाला होता.
Pandharpur
Pandharpur Sakal

पंढरपूर : विठुरायाच्या मंदिरात अलीकडच्या तीस-पस्तीस वर्षांत पुरातत्त्व विभागाच्या सूचनांकडे काणाडोळा करून अनेक प्रकारची कामे केल्याने मूर्तीला आणि मंदिराला धोका निर्माण झाला होता. आता पुरातत्त्व विभागाच्या सूचनेनुसार मंदिराच्या गाभाऱ्यातील ग्रॅनाईट काढण्यात आले असून चौखांबी,

सोळखांबी, बाजीराव पडसाळी येथील दगडी कामावर साचलेली धूळ स्वच्छ करण्याचे, भिंतींना पडलेल्या भेगा बुजविण्याचे काम प्रगतिपथावर आहे. या कामांमुळे विठुरायाच्या राऊळाला नवी झळाळी येऊ लागली आहे.

काम झाल्यावर सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या स्वरूपातील मंदिर भाविकांना पाहता येणार आहे. मंदिरातील चार दरवाजांवर चांदीचे आवरण बसवले जाणार आहे. याशिवाय गाभाऱ्यासमोरील चौखांबीत प्रवेशाचा दरवाजा आणि गाभाऱ्याच्या कमानीवरही चांदी बसवली जाणार आहे.

गेल्या तीस-पस्तीस वर्षांच्या काळात श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीने आणि तत्कालीन अधिकाऱ्यांनी पुरातत्त्व विभागाची कोणतीही परवानगी न घेता मंदिराच्या सुशोभीकरणासाठी अनेक प्रकारची कामे केली.

गाभाऱ्यातील जुन्या दगडांवर ग्रॅनाईट बसविण्यात आले तर अन्य भागात फरशा बसवण्यात आल्या. दुरुस्तीसाठी अनेक प्रकारची कामे केल्याने मंदिराच्या भिंतींवरील वजन वाढले होते. मंदिराच्या भिंतींना अनेक ठिकाणी भेगा पडल्या होत्या, तर काही ठिकाणी भिंतींतून झाडे उगवली होती. या सर्व गोष्टींमुळे मंदिराला आणि मूर्तीला धोका निर्माण झाला होता.

आता मंदिर समितीने पुरातत्त्व विभागाच्या सूचनेनुसार आराखडा तयार केला असून, त्याला शासनाने मंजुरी देऊन ७१ कोटी रुपये खर्चास मंजुरी दिलेली आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यातील कामे सध्या वेगाने सुरू आहेत.

विठुरायाच्या गाभाऱ्यातील ग्रॅनाईट काढताना मूर्तीस कोणताही धोका होऊ नये यासाठी मूर्तीवर बुलेटप्रूफ काचेचे आवरण बसविण्यात आले आहे. गाभाऱ्यातील कामे सुरू असल्याने पदस्पर्श दर्शन बंद करून सध्या पहाटे पाच ते सकाळी ११ या वेळेत भाविकांना केवळ मुखदर्शन घेण्यासाठी मंदिरात सोडले जात आहे.

मंदिरातील चार दरवाजांवर चांदीचे आवरण बसवले जाणार आहे. याशिवाय गाभाऱ्यासमोरील चौखांबीत प्रवेशाच्या दरवाजावर आणि गाभाऱ्याच्या कमानीवरही चांदी बसवली जाणार आहे. याशिवाय पुरातत्त्व विभागाने परवानगी दिल्यास पूर्वी ज्या दरवाजांवर व कमानींवर चांदी बसवली होती, त्यावरही चांदी बसवण्याची तयारी समितीने केली आहे.

मंदिरातील बाजीराव पडसाळी भागावर आरसीसी स्ट्रक्चर उभारण्यात आले होते. त्यामुळे मूळ मंदिरावरील बोजा वाढला होता. ते आणि बाजीराव पडसाळी, श्री महालक्ष्मी मंदिर येथे बसवण्यात आलेल्या टाइल्स काढून टाकण्यात आल्या आहेत. तिथे दगडी फ्लोअरिंग बसविण्यात येत आहे. संपूर्ण बाजीराव पडसाळीतील कमानींवरील आणि श्री महालक्ष्मी मंदिराच्या भिंतीवरील पेंट काढून टाकण्यात आला असून, दगडी भिंतींना झळाळी प्राप्त झाल्याने मूळ प्राचीन स्वरूप दिसू लागले आहे.

अस्पष्ट झालेली प्राचीन शिल्पे दिसताहेत स्पष्ट

पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरातील सोळखांबीमधील गरुडखांबावरील अन्य काही दरवाजांवरील चांदी काढण्यात आली आहे. त्यामुळे गरुडखांबाचे मूळ स्वरूप दिसू लागले आहे. विविध दगडी खांबांवर कोरण्यात आलेली रामायण आणि महाभारतातील चित्रे स्पष्ट दिसू लागली आहेत.

हनुमान गेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी दगडी मंडपावर विठुराया विश्रांती घेत असतानाचे शिल्प कोरण्यात आले आहे. तथापि, इतके दिवस ते स्पष्ट दिसत नव्हते, तेही आता स्पष्ट दिसू लागले आहे.

सुशोभीकरणासह मजबुतीकरणाचे काम

सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांना विचारले असता ‘सकाळ’शी बोलताना ते म्हणाले, कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विठुरायाच्या मंदिराचे संवर्धन आणि मजबुतीकरणाचे काम उत्तम दर्जाचे व्हावे यासाठी आम्ही दक्ष आहोत.

सुशोभीकरणा बरोबरच मंदिर पुढील अनेक वर्षे भक्कम राहावे यादृष्टीनेही विचार करून आवश्यक कामे जाणीवपूर्वक केली जात आहेत. मंदिराचे पहिल्या टप्प्याचे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी सातत्याने कामाचा आढावा घेण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com