esakal | जिल्ह्याला मिळाले 25400 डोस ! आतापर्यंत पाच लाख लोकांनी टोचली लस
sakal

बोलून बातमी शोधा

vaccine.jpg

शहरातील 39 केंद्रांवर लसीकरण सुरू असून ग्रामीण भागात लसीकरणासाठी 91 केंद्रे आहेत.

जिल्ह्याला मिळाले 25400 डोस ! आतापर्यंत पाच लाख लोकांनी टोचली लस

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहर-जिल्ह्यातील पाच लाख सात हजार 23 व्यक्‍तींना आतापर्यंत लस (Corona Vaccine) टोचण्यात आली आहे. मंगळवारी (ता. 25) एकाच दिवशी दहा हजार 956 जणांना पहिला तर 223 जणांना दुसरा डोस टोचण्यात आला. आता जिल्ह्यासाठी आणखी 25 हजार 400 डोस मिळाले असून त्यातील दहा हजार डोस शहरासाठी तर उर्वरित डोस ग्रामीणसाठी दिले जाणार आहेत. आज (बुधवारी) एकूण 130 केंद्रांवर लस टोचली जाणार आहे. (So far, five lakh people in Solapur district have been vaccinated against corona)

हेही वाचा: म्युकरमायकोसिसच्या 16 रुग्णांनाच "जनआरोग्य योजने'चा लाभ !

ग्रामीण भागातील कोरोना (Covid-19) रुग्णांची संख्या दिवसेंदिंवस वाढू लागली आहे. कोरोनाचे दोन डोस घेतल्यानंतर कोरोनामुळे मृत्यू होत नसल्याचे निरीक्षण आरोग्य विभागाने नोंदविले. त्यानंतर लस टोचून घेण्यासाठी नागरिक पुढे येऊ लागले आहेत. तर शहरातील नागरिकही भीतीने लस टोचायला येत आहेत. त्यासाठी नगरसेवकांनी पुढाकार घेतला आहे. शहरातील 39 केंद्रांवर लसीकरण सुरू असून ग्रामीण भागात लसीकरणासाठी 91 केंद्रे आहेत. लसीचा कोटा वाढवून मिळावा म्हणून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार आता जिल्ह्यासाठी लस वाढवून मिळू लागली आहे. काल जिल्ह्यासाठी 25 हजार 400 डोस मिळाले आहेत. मागील काही दिवसांतील ही लस सर्वाधिक आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील चार लाख दोन हजार 706 नागरिकांनी पहिला डोस तर एक लाख चार हजार 317 जणांनी दुसरा डोस टोचून घेतला आहे.

हेही वाचा: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! अवकाळीच्या नुकसानीची मिळणार मदत

जिल्ह्यासाठी आता लस मिळू लागली असून सध्याची लस संपण्यापूर्वीच मंगळवारी 25 हजार 400 डोस मिळाले आहेत. त्यातील दहा हजार शहरासाठी तर 15 हजार 400 डोस ग्रामीणसाठी वितरीत केले जाणार असून 130 केंद्रांवर लसीकरण केले जाईल.

- डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा समन्वयक, लसीकरण, सोलापूर

25 लाख जणांना लस टोचली जाणार

जिल्ह्यात 18 वर्षांवरील व्यक्‍तींची संख्या 30 लाखांपर्यंत आहे. त्यात शहरातील तीन लाख तर ग्रामीणमधील 27 लाख व्यक्‍तींचा समावेश आहे. या सर्वांना लस टोचली जाणार असून, सद्य:स्थितीत 18 ते 44 वयोगटातील 16 हजार 177 व्यक्‍तींना लस टोचण्यात आली आहे. एका व्यक्‍तीला दुसरा डोस दिला आहे. पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध झाल्यानंतर शहर- जिल्ह्यातील 339 केंद्रांवर लसीकरण करण्याचे नियोजन यापूर्वीच करून ठेवण्यात आले आहे.