सोशल मीडियामुळे हरवलेल्या मुलाचा लागला शोध; आई वडिलांचा जिव पडला भांड्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shriram vaykar

सोशल मीडियाचा जर सदुपयोग केला तर आपण एका हरवलेल्या मुलाचा काही तासात शोध लावू शकतो हे या घटनेने दाखवून दिले आहे.

सोशल मीडियामुळे हरवलेल्या मुलाचा लागला शोध

मळेगाव (सोलापूर) : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजने आठ तासातच लहान मुलाचा शोध लागल्याने आई- वडिलांचा जिव भांड्यात पडला. घटना अशी घडली की, बुधवार (ता.17) रोजी पिंपरी (सा) (ता.बार्शी) येथील शेतकरी सुनील भाऊराव वायकर यांचा मुलगा श्रीराम सुनिल वायकर (वय-15) हा सकाळी घरातून कोणतीही कल्पना नदेता अचानकपणे निघून गेला.

आपला मुलगा नत्यनियमाप्रमाणे मित्रांसोबत खेळायला गेला असेल इथेच कुठेतरी असेल या हेतूने आई वडिलांनी तास ते दोन तास दुर्लक्ष केले. दोन तास झाले तरीही मुलगा घरी आला नाही, म्हणून वायकर कुटूंबीयांनी श्रीरामची शोधाशोध सुरू केली. पिंपरी येथे सुनील वायकर यांची द्राक्ष बाग व इतर बागायती शेती आहे. लॉकडाऊन काळात मुलांना शेतीचा लळा लागल्याने श्रीराम हा शेतातच गेला असेल म्हणून वडील सुनील वायकर व चुलते सतीश वायकर यांनी शेतामध्ये धाव घेतली. मात्र तिथेही तो आढळला नाही. त्यानंतर चार वस्त्या असणाऱ्या पिंपरी गावामध्ये मित्राच्या घरी व इतर ठिकाणी देखील श्रीरामची चौकशी केली असता तेथेही त्याचा ठावठिकाणा लागला नाही. काळजाचा तुकडा आपल्यापासून दूर झाल्याचे पाहून आई संगीता वायकर यांच्या अश्रूंचा बांध फुटला.

हेही वाचा: मळेगाव : सेवानिवृत्त जवानाची बैलगाडीतून मिरवणूक

सर्व वायकर कुटुंबीयांच्या जीवाची घालमेल सुरू झाली. आणि मग शोध सुरू झाला श्रीराम च्या तपासाचा. पिंपरी (सा) येथील सागर वायकर यांनी सोशल मीडियावरती श्रीराम वायकर हा सकाळपासून घरातून निघून गेला आहे. अंगात लाल टी शर्ट परिधान केला आहे. कोणाच्या दृष्टीक्षेपास पडल्यास दिलेल्या नंबर वरती संपर्क करा, असा सोशल मीडिया वरती मेसेज व्हायरल केला. क्षणातच सर्व ग्रुप वरती हा मेसेज व्हायरल झाला. तसेच वैराग पोलिस स्टेशन व ग्रामसुरक्षा समितीच्या वतीने पिंपरी गावचे सरपंच चेतन काशीद यांनी फोनद्वारे देखील वरील मेसेज वायरल केला. वैराग पोलिस स्टेशन, पत्रकार बांधव, समाजातील सर्व घटकांनी आपला मुलगाच हरवला आहे, असे समजून श्रीरामच्या शोध मोहिमेमध्ये सहभाग घेतला.

हेही वाचा: अवकाळीसोबतच्या लढाईत बळिराजा हतबल ! मळेगाव परिसरात द्राक्ष, ज्वारी, हरभरा, गहू, कांद्याचे प्रचंड नुकसान 

श्रीराम हा बार्शीमध्ये कुर्डुवाडी रोडवरती, डॉ. यादव हॉस्पिटलच्या समोर असलेल्या एका केळी विक्रेत्याला मला काम देता का, मला भूक लागली आहे असे म्हणत असताना हा आवाज एक जागरूक पालक व शिक्षक असणारे प्रदीप करडे (रा.कांदलगाव) यांच्या कानावर पडला. आवाज एकताच त्या मुलाकडे करडे यांनी धाव घेतली. पाहिले तर सोशल मिडियावर व्हायरल झालेला फोटो समोर आला अन् विचारपूस सुरू केली. तुझं गाव कोणतं? तू कोठून आला आहे? तेव्हा श्रीरामने उत्तर दिले मी पिंपरी (सा) येथील असून मी सकाळी घरातून बाहेर पडलो आहे, मला भूक लागली आहे मला घरी जायचं आहे असे सांगितले. प्रदीप करडे यांनी क्षणाचाही विलंब न लावता पिंपरी येथील शिक्षक संदीप काशीद यांना फोनद्वारे संपर्क केला व तुमच्या गावातील श्रीराम वायकर हा मुलगा बार्शी येथे आहे असे सांगितले.

हेही वाचा: मळेगाव येथे बंधारा पाडून नुकसान

संदीप काशीद, शिक्षक ज्ञानेश्वर माने, ग्रामपंचायत सदस्य बळवंत वायकर यांनी तात्काळ तिथे धाव घेत मुलाशी संपर्क साधला व सोशल मीडिया वरती सुरू असलेल्या शोध मोहिमेला अखेर पूर्ण विराम मिळाला. श्रीरामचा शोध लागला आहे हे शब्द कानी पडताच वडील सुनील वायकर, आई संगीता वायकर व संपूर्ण कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला व शंकेचा निश्वास सोडला. सुनील वायकर यांनी या शोध मोहिमेत सहकार्य केलेल्या वैराग पोलिस स्टेशन व सर्वांचे आभार मानले. सोशल मीडियाचा जर सदुपयोग केला तर आपण एका हरवलेल्या मुलाचा काही तासात शोध लावू शकतो हे या घटनेने दाखवून दिले आहे.

loading image
go to top