संभाजी तलावावर पुन्हा होणार बोटिंगची धमाल | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापूर : संभाजी तलावावर पुन्हा होणार बोटिंगची धमाल

सोलापूर : संभाजी तलावावर पुन्हा होणार बोटिंगची धमाल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : विजयपूर रोडवरील धर्मवीर संभाजी तलावात तब्बल दहा वर्षांनंतर विविध पाच प्रकारच्या बोटिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामध्ये यांत्रिकी बोट, काश्‍मिर पध्दतीची सितारा बोट, जेट स्की, बीचवरील टोओबल बोट आणि पेडल बोटचा समावेश आहे. दहा वर्षांच्या करारावर बोटिंगची निविदा प्रकिया महापालिकेच्या भूमी व मालमत्ता विभागाने काढली आहे.

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेंतर्गत धर्मवीर संभाजी तलाव सुशोभिकरण करण्यात येत आहे. यासाठी १२ कोटी २१ लाख रुपये मंजूर झाले आहेत. तलावातील स्थापत्य, तलाव शुध्दीकरण, एसटीपी प्रकल्प व परिसर सुशोभिकरण आदी कामांचा समावेश आहे. केंद्र शासन ६० तर महापालिकेचा ४० टक्‍के निधी हिस्सा आहे. तलाव सुशोभिकरणासाठी ३ कोटी ६० लाख केंद्राकडून तर महापालिकेकडून २ कोटी ६० लाख रुपये उपलब्ध झाले आहेत.

हेही वाचा: कोल्हापूर : आंबोली घाटाला जाळीचे संरक्षण

तलावातील जलपर्णी काढण्यासाठी २७ लाख रुपयांचा मक्‍ता वर्षापूर्वी देण्यात आले. मात्र या जलपर्णीला पूरक असा गाळ तलावात असल्याने त्याची पुनरावृत्ती सतत होत आहे. या सुशोभिकरण प्रकल्पाला निधीची समस्या दूर करण्यासाठी आयुक्‍तांनी आता बोटींग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दहा वर्षांसाठी या करारातून प्रतिवर्षी १० लाख रुपये उत्पन्न महापालिकेला अपेक्षित आहे. यापूर्वी तलावात बोटिंगची सुविधा सुरू होती. परंतु असुरक्षितेमुळे एकाचा बळी गेल्यानंतर ही सुविधा बंद पडली. त्यानंतर तब्बल आठ वर्षांनी महापालिकेने महाराष्ट्र जलक्रीडा धोरण २०१५ नुसार सुरक्षिततेच्या सर्व अटी व नियमावली लागू करून बोटिंगसाठी शनिवारी निविदा काढली आहे. निविदा भरण्यासाठीचा कालावधी १ डिसेंबरपर्यंत आहे. प्री-बीड बैठक सोमवार, ता.२२ नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता आयुक्त कार्यालय येथे आयोजित करण्यात आली असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.

'महापालिकेतर्फे तलावामध्ये यांत्रिक बोटी, पेडल बोटी आणि जेट स्की आदी प्रकारच्या बोटिंगच्या सुविधा देण्यात येणार आहेत. या बोटिंगसाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने प्रकाशित केलेल्या महाराष्ट्र जलक्रीडा धोरण २०१५ नुसार सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करण्यात येणार आहेत. बोटिंगसाठी आवश्‍यक जीवरक्षक प्रणाली, वाटर जॉकेट, रेक्‍सू टीम, स्टोअर रुम, प्रथमोपचार मेडिकल किट आदींची उपलब्धताही मक्‍तेदारावर बंधनकारक आहे.'

- विक्रम पाटील, उपायुक्‍त, सोलापूर महापालिका

loading image
go to top