
Solapur : तीस वर्षानंतर डफरीन हॉस्पिटलमध्ये ‘सिझेरियन’ ची सोय
सोलापूर : ब्रिटिश काळातील ऐतिहासिक वास्तू असलेली अनेकांचे सुख-दु:ख पचविणारे महापालिकेचे डफरीन हॉस्पिटल पुन्हा नव्या रूपात, नव्या उमेदीने सुरू झाले आहे. मागील वीस दिवसात ६८ प्रसूती झाल्या असून त्यातील १२ सिझेरियन प्रसूती होत्या. तब्बल ३० वर्षापासून बंद पडलेल्या हॉस्पिटलमध्ये चांगल्या दर्जाची रुग्णसेवा मिळत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळण्याबरोबरच ऑपरेशनवर होणाऱ्या खर्चाचा ताणही कमी झाला आहे.
डफरीन चौकातील महापालिकेच्या राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रसूती रुग्णालयाची उभारणी १८ व्या शतकातील आहे. गेल्या दीडशे वर्षामध्ये सोलापूरकरांच्या सेवेत असलेले हे रुग्णालय अनेकांच्या सुख-दु:खांचे साक्षीदार आहे. सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांचे जीवन वाहिनी ठरलेले हे हॉस्पिटल अलीकडच्या चाळीस वर्षांपासून दुर्लक्षित झाले होते.
लोकप्रतिनिधींची अनास्था आणि प्रशासनाची हतबलता यामुळे हे हॉस्पिटल अस्वच्छता, दुर्गंधी, अंधार अशा गैरसोयीच्या विळख्यात सापडले होते. रात्रीच्यावेळी तर तळीरामांचा अड्डा बनले होते. इतकी वाईट परिस्थिती होती. ऑपरेशन, सिझेरियन करण्यासाठी अत्याधुनिक तर सोडाच किमान साधनसामग्रीदेखील हॉस्पिटलमध्ये नव्हती.
त्यामुळे गेल्या ३० वर्षांपासून सिझेरियन ऑपरेशन बंदच होते. तर नॉर्मल प्रसूतीदेखील गेल्या अनेक वर्षांपासून बंद करण्यात आल्या होत्या. महापालिकेत आलेल्या प्रत्येक गरोदर मातांना सिव्हिल हॉस्पिटलचा रस्ता दाखविण्यात येत असे.
दरम्यान महापालिकेने बालाजी अमाइन्स या कंपनीकडून या डफरीन हॉस्पिटलला नवसंजिवनी देण्यासाठी मागील वर्षभरापासून धडपड केली. अखेर २५ फेब्रुवारी २०२३ मध्ये हे प्रयत्न यशस्वी झाले. अहिल्यादेवी होळकर प्रसूतिगृह अत्याधुनिक करण्यात आले आहे. याठिकाणी आवश्यक तेवढे डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
फाइव्ह स्टार ऑपरेशन थिएटर अन् स्मार्ट आयसीयू सेंटर, अद्ययावत प्रसूतिगृह, लेबररूम, नवीन साहित्य व मशिन, गरोदर महिलांना पायरी चढताना त्रास होऊ नये म्हणून लिफ्टची सोय अन् एकाच दिवसात सुमारे ५० महिलांच्या प्रसूती होतील, अशी सुविधा उपलब्ध करून दिली. खासगी हॉस्पिटलमध्ये होणारा सर्वसामान्यांचा खर्च आता वाचणार असल्याने प्रशासकीय कारकिर्दीतील हे कार्य सोलापूरकरांना दिलासा देणारे आहे.
आवश्यक साधनसामुग्री नसल्याने सिझेरियनसह इतर प्रसूतीही बंद होत्या. मात्र, आता हॉस्पिटलला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अत्याधुनिक मशिनरीसह नूतनीकरण केलेल्या इमारतीमध्ये काम करताना कर्मचाऱ्यांचाही उत्साह वाढतो. अनेक नागरिक फोन करून अपाइमेंट मागतात. पण इथे येण्यासाठी कोणाचीही अपाइमेंट घेण्याची गरज नाही. सोलापूरकरांनी महापालिकेच्या दवाखान्यांतील सुविधांचा लाभ घ्यावा.
- डॉ. बसवराज लोहारे, आरोग्याधिकारी महापालिका