सोलापूर : शहरात पेट्रोल-डिझेलसाठी वणवण!

पंपावरच इंधनाचा तुटवडा; वाहनधारकांची कसरत
पेट्रोल
पेट्रोल सकाळ

सोलापूर : मागील आठवडाभरापासून डेपोमध्ये पेट्रोल व डिझेल कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे. ॲडव्हान्स पैसे भरल्यानंतरही पेट्रोलचा टॅंकर पंपावर उपलब्ध होत नसल्याने शहरात पेट्रोलचा तुटवडा जाणवत आहे. शहरातील काही मोजक्याच पंपांवर पेट्रोल उपलब्ध असल्याने तेथे पेट्रोलसाठी वाहनधारकांच्या रांगा लागत आहेत. वाहनधारकांना एका पंपावरून दुसऱ्या पंपावर चकरा माराव्या लागत आहेत. इंधनासाठी त्यांना वणवण भटकंती करावी लागत आहे.

पेट्रोलियम कंपन्यांनी पुरवठ्यात कृत्रिम कपात निर्माण केली आहे. तसेच पेट्रोलपंप चालकांना पेट्रोल-डिझेल देण्यापूर्वीच आगाऊ रक्कम देणे बंधनकारक केल्याने सोलापूर शहरासह जिल्ह्यात इंधन टंचाई जाणवू लागली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील ३६० पंपांपैकी शहरातील मोजक्याच तसेच ग्रामीण भागातील व महामार्गावरील काही ठराविक पंपांवरच पेट्रोल-डिझेल उपलब्ध आहे. शहर परिसरातील पंपांवर डिझेल उपलब्ध नसल्याने वाहन चालकांना व शेतकऱ्यांना तालुक्यातील पंपावरून डिझेल आणावे लागत आहे. केंद्र शासनाने इंधनावरील एक्साइज ड्यूटी कमी केल्याने पेट्रोल व डिझेलचे दर काहीसे कमी झाले. यानंतर एचपीसीएल व बीपीसीएल या प्रमुख ऑइल कंपन्यांनी पूर्वीची नियमावली बदलली आहे. डिझेल व पेट्रोल खरेदीपूर्वी डीलर म्हणजे पंप चालकांना अॅडव्हान्स रक्कम भरावी लागते. यादरम्यान ऑइल कंपन्यांनी वितरणाचा कोटा देखील कमी केला आहे. यामुळे सोलापूर शहरासह तालुक्यात इंधन टंचाई निर्माण झाली आहे.

दरम्यान, पेरणीपूर्वी मे महिना व जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शेतीच्या कामाला वेग आला आहे. नांगरणी व इतर कामे ट्रेलर व ट्रॅक्टरने केली जातात. त्यामुळे डिझेलची मागणी वाढली आहे. नेमकी याच कालावधीत इंधनाची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे वाहनधारकांसह शेतकऱ्यांना देखील इंधनासाठी भटकंती करावी लागत आहे. पेट्रोलियम कंपन्यांकडून १२ हजार लिटर क्षमतेच्या टँकरमधून पुरवठा होत नाही तर २० हजार लिटरच्या टॅंकरमधून इंधन पुरवठा होत असल्याने ते डीलर्सना घेणे शक्य नाही.

जेवढी मागणी आहे तेवढा पुरवठा कंपनीकडून होत नाही. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. आधी क्रेडिटवर इंधनाचा पुरवठा होत होता, मात्र मागील काही दिवसांपासून ॲडव्हान्स रक्कम देऊनही अनियमित पुरवठा होत आहे.

- महेंद्र लोकरे, सचिव, पेट्रोल पंप असोसिएशन, सोलापूर

कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. पेट्रोल-डिझेलचा पुरवठा पंप चालकांना व्यवस्थित होत नाही. पेट्रोलियम कंपन्यांकडून साठा करून ठेवला जात असल्याने पंप एक-दोन दिवस बंद ठेवावे लागत आहेत.

- राजशेखर चडचणकर, एस. आर. कंपनी, नायरा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com