लॉकडाउनमध्ये वाढला "ती'च्या जन्माचा टक्‍का ! गर्भवतींवर अंगणवाडीसेविकांचा वॉच | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur : ‘ती’च्या जन्माचा वाढला टक्‍का
लॉकडाउनमध्ये वाढला "ती'च्या जन्माचा टक्‍का ! गर्भवतींवर अंगणवाडीसेविकांचा वॉच

लॉकडाउनमध्ये वाढला 'ती'च्या जन्माचा टक्‍का!

सोलापूर : ‘मुलगा हाच वंशाचा दिवा’ ही मानसिकता आता मागे पडली आहे. मुलांच्या बरोबरीने मुलगीदेखील नाव कमवू शकते हा आत्मविश्‍वास पालकांमध्ये बळावला आहे. एक मुलगी असलेल्या गर्भवती महिलांवर अंगवाडी सेविकांच्या माध्यमातून नियमित वॉच ठेवला जात आहे. कोरोना काळातील निर्बंधांमुळे मुलींच्या जन्माचा टक्‍का वाढला आहे. एप्रिल ते ऑक्‍टोबर २०२१ या काळात अक्‍कलकोट, सांगोला आणि कुर्डूवाडी-टेंभुर्णीत मुलांपेक्षा मुलींची संख्या ३० ते १५१ ने वाढली आहे.

हेही वाचा: गद्दारी सहन करणार नाही,पाडापाडीला थारा नाही : नारायण राणे

जिल्ह्यात एप्रिल ते ऑक्‍टोबर २०२१ या काळात ११ हजार ६३३ मुलांचा जन्म झाला. तर त्यांच्या बरोबरच दहा हजार ९३० मुलीही जन्मल्या. मुला-मुलींच्या जन्मातील फरक केवळ ७०३ एवढाच असून सात महिन्यांतील हा जन्मदार आतापर्यंतचा सर्वाधिक राहिला आहे. मुलींच्या जन्मानंतर तिचा सांभाळ, शिक्षण, विवाह आणि समाजातील लोकांची मानसिकता, यातून मुलींपेक्षा मुलगाच बरा, असा समज नागरिकांमध्ये होता. आता तो दृष्टीकोन बदलला असून मुलांप्रमाणे मुलींचीही संख्या वाढू लागल्याने मुलांच्या विवाहाची चिंता दूर होऊ लागली आहे. शासकीय पातळीवर मुलींचा जन्मदर वाढावा म्हणून विविध उपक्रम, योजना राबविल्या जात आहेत. ‘माझी कन्या भाग्यश्री व सुकन्या समृध्दी’ योजनेतून पालकांवरील मुलींचा भार कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून त्या रकमेत आता वाढ करण्याचा प्रस्ताव पाठविला जाणार आहे. शिक्षणातील मुलींचा टक्‍का वाढावा म्हणून ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’ हा उपक्रम राबविला जात आहे. मुलीच्या जन्मानंतर मातेला बेबी केअर किट मोफत दिले जाते. त्यामुळे मुलींच्या जन्मवाढीला मदत झाली असून जिल्ह्यातील १८९ मुलींच्या नावे शासनाच्या माध्यमातून २५ ते ५० हजारांची ठेव ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा: सत्ताधीशांनी दररोज आत्मपरीक्षण करावे: सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा

मुलींच्या जन्मदरात बार्शी, करमाळा पछाडीवर

बार्शी तालुक्‍यात सहा वर्षांपर्यंच्या एक हजार मुलांमागे ८६४ तर करमाळ्यात ८६६ मुली आहेत. माढा तालुकाही मुलींच्या जन्मदरात पिछाडीवर असल्याची बाब समोर आली आहे. अकलूज परिसरातील मुलींचे प्रमाणही मुलांपेक्षा कमीच आहे. मुलींचा जन्मदर वाढ व्हावा, म्हणून जिल्हा पातळीवर विशेष जनजागृतीची गरज आहे. एक मुलीवर शस्त्रक्रिया केल्यानंतर मुलीच्या नावे ५० हजारांची तर दोन मुलीवर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या मुलीच्या नावे २५ हजारांची ठेव ठेवली जाते. १८ वर्षे पूर्ण झाल्यांनतर व्याजासह ती रक्‍कम मुलीच्या शिक्षण व विवाहासाठी वापरता येईल, अशी ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना सुरु आहे.

मुलींचा जन्मदर वाढीची कारणे...

  • अंगणवाडी सेविकांवर प्रत्येकी १०० घरांचे टार्गेट; घरोघरी जाऊन गर्भवतींवर ठेवला जातोय वॉच

  • अवैध गर्भपात केलेल्यांवर कठोर कारवाई; लॉकडाउन काळात विनाकारण घराबाहेर पडण्यावर होते निर्बंध

  • ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’तून जनजागृती; ‘माझी कन्या भाग्यश्री’मधून मुलीच्या नावे ठेवली जो २५ ते ५० हजारांची ठेव

  • सुकन्या समृध्दी योजनेतून पालकांना मुलीचे १८ वर्षे झाल्यानंतर शिक्षण व विवाहासाठी मदत मिळते.

जन्मदराची सद्यस्थिती (० ते ६ वयोगट)

अक्‍लकोट तालुक्‍यात दर हजारी मुलांमागे एक हजार ३०, बार्शीत ८९१, वैराग भागात ९२२, माढ्यात ९०९, कुर्डुवाडी-टेंभुर्णीत एक हजार १२१, माळशिरसमध्ये ९२३, अकलूजमध्ये ९११, मंगळवेढा तालुक्‍यात ९८१, मोहोळ तालुक्‍यात ९०४, उत्तर सोलापूर तालुक्‍यात ९०२, पंढरपूर तालुक्‍यात ८९०, सांगोल्यात एक हजार १५१, कोळा भागात ९६८ आणि दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील मुलींचे प्रमाण ८९३ पर्यंत आहे. यंदा अक्‍कलकोट, कुर्डुवाडी-टेंभुर्णी, सांगोला हे विभाग मुलींच्या जन्मदारात अव्वल आहेत. त्याठिकाणी मुलांपेक्षा मुलीच सर्वाधिक आहेत. शहरात मुलींचे प्रमाण दर हजारी मुलांमागे ९३८ पर्यंत आहे.

loading image
go to top