Solapur News : ‘हिरवळ-चळवळ’ योजनेसाठी करूया ‘ॲक्शन प्लॅन’

माळरानाचा सोलापूर जिल्हा अशी ओळख असलेल्या आपल्या सोलापुरात २२ ते २५ लाख वृक्षांची गरज असताना केवळ सात ते आठ लाख वृक्षराजींची हजेरी आहे.
Trees
Treessakal
Summary

माळरानाचा सोलापूर जिल्हा अशी ओळख असलेल्या आपल्या सोलापुरात २२ ते २५ लाख वृक्षांची गरज असताना केवळ सात ते आठ लाख वृक्षराजींची हजेरी आहे.

माळरानाचा सोलापूर जिल्हा अशी ओळख असलेल्या आपल्या सोलापुरात २२ ते २५ लाख वृक्षांची गरज असताना केवळ सात ते आठ लाख वृक्षराजींची हजेरी आहे. त्यातही देशी झाडांची संख्या कमी असल्याने ऑक्सिजनची गरज वाढत आहे. शहराचे हरितक्षेत्र वाढविण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे असले तरी नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊन वृक्षलागवड केली तर शहराची फुफ्फुसे सक्षम होतील. यासाठी एकत्रित असा ‘ॲक्शन प्लॅन' तयार करावा लागणार आहे.

अलीकडील काळात सोलापुरात वृक्ष लागवडीबद्दल मोठे प्रबोधन झाले असले तरी, अजूनही मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाची गरज आहे. त्यादृष्टीने नियोजनाची गरज आहे. शाळा, महाविद्यालये, गृहनिर्माण सोसायट्या, सामाजिक संस्था, एनजीओ, व्यावसायिक, उद्योजक, आस्थापनांच्या माध्यमातून लोकजागर करावा लागणार आहे. मध्यंतरी महापालिका प्रशासनाने वृक्ष गणना केली. त्यानुसार शहरातील उपलब्ध वृक्षांमध्ये देशीपेक्षा विदेशीच वृक्षांची संख्या जादा निघाली. सोलापुरात सध्या १५४ प्रकारची देशी तर ११८ प्रकारची विदेशी झाडे आहेत. यामध्ये सुबाभूळ, नीम, नारळ, विलायती बाभूळ, सीताफळ, दामास ट्री, हिवर, आंबा, अशोका, सप्तपर्णीची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत.

भविष्यात सोलापूरकरांनी देशी झाडांची लागवड करण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे. देशी झाडांवर पक्षी वास्तव्य करतात, तर विदेशी झाडांमुळे जैवविविधतेला धोका निर्माण होतो. अलीकडील काळात पक्ष्यांचा किलबिलाटही कमी झाल्याचे जाणवत आहे. त्यामुळे शहर कोरडे पडून धुळीचे साम्राज्य वाढले आहे. अलीकडील काळात शासनानेच काही विदेशी झाडांवर बंदी आणल्याने देशी झाडांच्या लागवडीत वाढ होत आहे. वृक्ष लागवडीबाबत जनजागरही चांगला झाल्याने नागरिक स्वतःहून पुढे येत वृक्षारोपण करत आहेत. वृक्ष जोपासनेची मानसिकता वाढीस लागल्याचे सकारात्मक चित्र आहे. सध्या सोलापुरात वेगवेगळ्या संस्थांच्या वतीने ही चळवळ सुरू आहे. यासाठी एकत्र प्रयत्न तसेच उद्दिष्ट गाठण्याची व पर्यावरणाच्या दृष्टीने आणखी हरितक्षेत्र वाढविण्याची गरज आहे.

माळरानाचा जिल्हा अशी सोलापूरची ओळख आहे. आपल्या जिल्ह्यात माळरानावरील जैवविविधता मोठ्या प्रमाणावर असल्याने हजारो मैलांवरून पक्षी सोलापूरकडे येत असतात. हे पक्षी पाहण्यासाठी दरवर्षी देशी-विदेशी पर्यटकांची मांदियाळीही हजेरी लावत असते. सोलापूर जिल्ह्यातही वृक्ष लागवडीबाबत विदारक चित्र आहे. ज्या भागात पक्ष्यांचे वास्तव्य असते, तो भाग सोडून उर्वरित भागात वृक्षारोपणात वाढ करावीच लागणार आहे.

महापालिका-विद्यापीठाचा पुढाकार हवा

सोलापूर महापालिका आणि पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरातील वृक्ष लागवडीसाठी विशेष ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करून विविध संस्थांच्या सहभागाची योजना आखावी. यामध्ये सोलापुरातील खुल्या जागांचा सर्व्हे करून त्या जागा हरित करण्याची ‘हिरवळ चळवळ’ योजना राबवावी. महाविद्यालयीन शिक्षणाच्या अभ्यासक्रमातही याचा समावेश करून एनसीसी, एनएसएसच्या सहभागातून ही चळवळ आणखी गतिमान करता येईल.

लक्ष्यवेध...

- प्रत्येक कुटुंबातील सदस्य संख्येइतकी वृक्षलागवड

- दरवर्षी प्रत्येकी एकतरी झाड लावून त्याची जोपासना

- झाड जगवणाऱ्या मिळकतदारास करात सूट देण्याची योजना

- महापालिकेकडून व्हावी जागेची उपलब्धता

- अपेक्षित ठिकाणे - सोरेगाव, हिप्परगा तलाव, आयटीआय, शासकीय तंत्रनिकेतन, महाविद्यालये, शासकीय वसाहती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com