
सोलापूरकरांना अद्यापही चार ‘एक्स्प्रेस’ची प्रतीक्षाच
सोलापूर: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर संसर्गाचा परिणाम जवळपास शून्य झाला आहे. परंतु. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने अद्याप सोलापूर- मनमाड- नागपूर द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस, सोलापूर- मिरज, सोलापूर- कोल्हापूर, सोलापूर- पुणे- मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस गाड्या कोरोनानंतरही सुरू न केल्याने प्रवाशांना उन्हाळा सुटीत नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
कोरोनामुळे सर्व वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेतील संक्रमण कमी होत असताना, प्रशासनाने कोरोनापूर्वी रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना उपलब्ध असलेल्या सुविधा एकामागून एक सुरू केल्या आहेत. तिसऱ्या लाटेपूर्वी रेल्वेच्या बंद झालेल्या गाड्या पुन्हा चालविण्यास रेल्वे बोर्डाने परवानगी दिली आहे. यासोबतच रेल्वेमध्ये पॅन्ट्री कार (खानपान) आणि लिनेन (बेडरोल) यांसारख्या सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या शाळांना उन्हाळी सुट्या सुरू झाल्या आहेत. असे असतानाही मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने चार एक्स्प्रेस गाड्या अद्यापही सुरू केल्या नसल्याने प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सोलापूर, पुणे, मुंबई, नागपूर दरम्यान धावणाऱ्या चार एक्स्प्रेस गाड्या सोलापूर विभागाने अद्याप सुरू केल्या नाहीत. यामध्ये सोलापूर- मनमाड- नागपूर द्विसाप्ताहिक तर सोलापूर-मिरज सकाळी मिरजकडे रवाना होत असे. तर सोलापूर- कोल्हापूर एक्स्प्रेस रात्री कोल्हापूरकडे जात असे व सोलापूरकरांना सोयीची असलेली सोलापूर- पुणे- मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस दुपारी दोन वाजता पुण्याकडे जात असल्याने प्रवाशांची चांगली सोय होत होती. गाड्या बंद असल्याने शेतकरी, विद्यार्थी, चाकरमानी यांना दुसऱ्या वाहतुकीचा पर्याय शोधावा लागत आहे. उन्हाळी सुट्या सुरू झाल्याने गाड्यांमधील गर्दीत वाढ झाली असून, पूर्वीच्या गाड्या सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून आणि प्रवासी संघटनांकडून होत आहे. कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या, सोलापूर स्थानकावरून धावणाऱ्या गाड्या सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी देखील होत आहे. याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.
कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या गाड्या त्वरित सुरू कराव्यात. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्याने रेल्वे प्रशासनाने यावर त्वरित निर्णय घेण्याची गरज आहे.
- संजय पाटील, अध्यक्ष, प्रवासी सेवा संघ, सोलापूर
Web Title: Solapur Division Central Railway Four Express Trains
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..