सोलापूर : ‘महानेट’, ‘गॅसलाइन’ कामांना स्थगिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

solapur

सोलापूर : ‘महानेट’, ‘गॅसलाइन’ कामांना स्थगिती

सोलापूर : शहरात दमदार नव्हे तर आठ दिवसांच्या रिमझिम पावसानेच रस्त्यांची दर्जाहीन कामे उघडी पडली आहेत. ‘सरी आल्या धावून अन्‌ रस्ता गेला वाहून’ अशीच परिस्थिती शहरातील रस्त्यांची झाली आहे. महानेट अन्‌ गॅसलाइनच्या कामामुळे शहरातील मुख्य महामार्गांसह हद्दवाढ भागातील रस्त्यांची स्थिती अत्यंत वाईट बनली असल्याने महापालिका प्रशासनाने या कामांना तात्पुरती स्थगिती दिली आहे.

शहर हद्दवाढ भाग विशेष करून जुळे सोलापूर परिसरात गॅसलाइनसाठीची खोदाई मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याचबरोबर शहरात बहुतांश ठिकाणी महानेट टाकण्यासाठी रस्ते खोदले गेले आहेत. या दोन्ही शासनाच्या योजना असल्या तरी नियमांचे पालन होते की नाही, यावर नियंत्रण ठेवण्याचे काम हे महापालिकेचे आहे. शहरातल्या विविध भागात गॅस व महानेटसाठी साधारण ५५० किलोमीटर अंतर खोदाई करण्यासाठी कंपनीने परवानगी मागितली. महापालिकेने पहिल्या दोन टप्प्यात १८० किलोमीटर अंतराला मान्यता दिली आहे.

यापूर्वी हद्दवाढ भागातील सर्व रस्ते ड्रेनेजलाइनच्या खोदाईमुळे खराब झाल्याने नागरिक वैतागले होते. त्यानंतर आता कुठे हद्दवाढ भागातील छोटे-मोठे रस्ते विकसित होत असताना पुन्हा गॅसलाइन व महानेटमुळे चांगल्या रस्त्यांची खोदाई सुरू आहे. खोदाई झाल्यानंतर रस्ते पूर्ववत करण्याची जबाबदारी महापालिकेची आणि मक्तेदाराची आहे. परंतु रस्ते पूर्ववत तर सोडाच, योग्य पद्धतीने खोदलेले खड्डेदेखील बुजविण्यात येत नाहीत.

जुलै महिन्याच्या सुरवातीला सलग आठ दिवस झालेल्या रिमझिम पावसात शहरातील रस्त्यांची पुरती वाट लागली. अनेक अपघात झाले, महापालिका आयुक्तांकडे महानेट व गॅसलाइनमुळे खोदलेल्या रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत तक्रारी वाढल्या. अखरे आयुक्तांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महानेट आणि रस्ते खोदाईला स्थगिती दिली आहे.