सोलापूर : त्यांचे जगणे बनले सन्मानाचे!

असहाय्य स्थितीतून, गुन्हेगारीतून बाहेर पडणाऱ्यांना मदतीचा हात
Solapur
Solapursakal

सोलापूर : मुळेगाव तांडा येथील हातभट्टी गाळणाऱ्यांचे मनपरिवर्तन होऊन त्यांचे इतर कायदेशीर व्यवसायात झालेले पुनर्वसन परिवर्तनाचे पाऊल ठरले आहे. यानिमित्ताने सन्मानजनक जगण्याच्या नव्या वाटा सामाजिक सेवेच्या कॅनव्हासवर उमटू लागल्या आहेत. सोलापूरजवळील मुळेगाव तांडा हे हातभट्टी निर्मिती केंद्र होते. अनेक कुटुंबे हातभट्टी तयार करण्याच्या कामात गुंतलेली होती. प्रत्येकवेळी पोलिस व उत्पादन शुल्क विभागाचे छापे, पोलिसांची मारहाण व पुन्हा हातभट्टीचा व्यवसाय... या दृष्टचक्रात ही कुटुंबे सापडली होती. ग्रामीण पोलिस दलाच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ‘ऑपरेशन परिवर्तन’च्या माध्यमातून सन्मानजनक व्यवसायात या कुटुंबांचे पुनर्वसन केले आहे.

आकडे परिवर्तनाचे

हातभट्टीच्या व्यवसायातून सन्मानजनक व्यवसायात आलेल्या व्यक्ती : शेती - ७६, मजुरी - ७७ , खासगी नोकरी - १५३, व्यवसाय - ८३, वीणकाम - २१५

सन्मानाच्या जगण्याच्या वाटा

- वैधव्यानंतर स्वावलंबी बनणे

- वृद्धांना सन्मानपूर्वक जगण्यासाठी मदत करणे

- भिक्षेचा मार्ग सोडून परिश्रमाची कमाई

- अवैध व्यवसाय सोडून स्वकष्टार्जित उत्पन्न

- कचरा, भंगार गोळा करण्याच्या व्यवसायातून सन्मानजनक व्यवसायात रूपांतर

...आता करतोय उजळ माथ्याने व्यवसाय’

हॉटेल व्यावसायिक सुनील सोलापूरकर (इथे नाव बदलले आहे) म्हणतात, की मी ड्रायव्हिंग व्यवसाय थांबविल्यानंतर हॉटेल चालू केले. हॉटेलमध्ये हातभट्टी ठेवत होतो. पोलिस अधिकाऱ्यांनी संपर्क साधत गैरव्यवसाय बंद करून नवे काही करा, असे सुचवले. मुलांनी देखील आग्रह केला. मग मी खवा तयार करण्याचे मशिन घेत उत्पादन सुरू केले. आता जादा क्षमतेच्या खवा मशिनसाठी कर्ज प्रकरण केले आहे. आता व्यवसाय उजळ माथ्याने करताना कुटुंबही आनंदी झाले आहे.

पानटपरी ते ऑटोरिक्षा...

लाल बावटा रिक्षाचालक संघटनेचे जनरल सेक्रेटरी सलीम मुल्ला यांच्या मते, नाइलाजाने पानटपरीच्या व्यवसायात गेलेल्या काही लोकांना व्यसन वाढवणारी गोष्ट विकणे हे बेकायदेशीर आहे, असे वाटत असे. पानटपरीवरील साहित्य कधी ना कधी कायदेशीर अडचणीत येणार, याची जाणीव त्यांना होत असे. काहीजण जवळपास असणाऱ्या ऑटोरिक्षा चालकांशी मैत्री करून पानटपरीचा व्यवसाय सोडला अन्‌ ऑटोरिक्षा व्यवसायात उतरले. हे एक परिवर्तनच आम्ही अनुभवले.

असहाय्य वृद्ध रमले प्रार्थना फाउंडेशनमध्ये

प्रार्थना फाउंडेशनचे प्रमुख, स्वयंसेवी कार्यकर्ते प्रसाद मोहिते म्हणतात, आम्ही कुठेही असहाय्य सापडलेल्या मुलांसह वृद्धांनाही आश्रय दिला आहे. सध्या आमच्या संस्थेत एकूण १० वृद्ध आहेत. बालकांचा सांभाळ करत असताना हे वृद्ध असहाय्य स्थितीत सापडल्याने त्यांनाही संस्थेत आणले. संस्थेतील बालकांसोबत त्यांनाही चांगले जीवन जगता येते, याचा अनुभव आम्हाला घेता आला. त्यानंतर आता ते जगण्याच्या संकटातून बाहेर आल्यानंतर आनंदाने संस्थेच्या कुटुंबात रममाण झाले आहेत.

सजग नागरिकांचे कर्तव्य

भारती विद्यापीठ अभिजित कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट समाजकार्य विभागाच्या संचालिका डॉ. जयश्री मेहता म्हणतात, बालगुन्हेगार, वेश्याव्यवसायातील महिलांची मुले, निराधार वृद्ध यांसारख्या अनेक वंचितांशी संवाद साधून व समुपदेशनाने त्यांना कोणत्या मदतीची गरज आहे, हे निश्चित करायला हवे. नंतर योग्य त्या संस्थांमध्ये त्यांना पोचवण्यासाठी प्रत्येक जागरूक नागरिकाने काम करायला हवे. सजग नागरिकांचे हे कर्तव्यच ठरते.

अशी करावी गरजूंना मदत

आपल्या परिसरात निराधार, असहाय्य स्थितीतील महिला, वृद्ध किंवा बालके आढळली तर त्यांची सहानुभूतीने विचारपूस करा. त्यांना सुरक्षित आश्रय देण्यासाठी पुढील संस्थांशी संपर्क साधता येईल.

गरजूंना अन्न मिळवून देण्यासाठी : आस्था रोटी बॅंक - आनंद तालिकोटी (मो. नं. ९४२२६४४५५५) व सुहास छंचुरे (मो. नं. ९०२८०७५१५१)

वंचितांना आश्रय मिळवून देण्यासाठी : महापालिकेचे आपुलकी बेघर निवारा केंद्र - वसीम शेख (मो. नं. ९९७०३५०९०४)

अनाथ, असहाय्य बालकांना आश्रय देण्यासाठी : स्नेहालय - विकास वाघमोडे (मो. नं. ९१३०९४००९९)

असहाय्य बालके, वृद्ध, महिलांना आश्रय देण्यासाठी : प्रार्थना फाउंडेशन - प्रसाद मोहिते (मो. नं. ९५४५९९२०२६)

पुण्य ते परोपकार...

‘पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा’ या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगात परोपकारालाच पुण्य म्हटले आहे. सत्य हाच धर्म, असत्य हेच अधर्म याशिवाय दुसरे वर्म नाही. परोपकार म्हणजे जो कोणी अडचणीत असेल त्याला यथाशक्ती मदत करणे. भुकेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी हे सहज शक्य आहे. सदैव सजग राहून सत्कर्म करणे, दुष्कर्मापासून दूर राहणे, सत्याचे पालन करणे, असत्यापासून दूर राहणे, परोपकार करणे, परपीडा व परनिंदा न करणे, स्वकष्टाने अर्थार्जन करून प्रामाणिकपणे जगणे व इतरांनाही मदत करणे हेच खरे धर्माचरण होय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com