

सोलापूर महापालिका निवडणूक
तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघांतर्गत प्रभाग १२ ते १८ आणि प्रभाग २१ सह प्रभाग २२, प्रभाग नऊ, ११ मधील बराच भाग येतो. प्रभाग दहामधील काहीसा भाग याच मतदारसंघात येतो. या मतदारसंघात एकूण ३५ नगरसेवक येतात. शहर मध्यमधील प्रभागांमध्ये माजी महापौर श्रीकांचना यन्नम, यू. एन. बेरिया, आरिफ शेख, संजय हेमगड्डी आणि माजी उपमहापौर दिलीप कोल्हे निवडणूक लढवीत आहेत. याशिवाय माजी आमदार प्रकाश यलगुलवार, आडम मास्तर यांच्या सूनबाई देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तौफिक शेख यांच्या पक्षांतरामुळे ‘एमआयएम’ला येथून किती यश मिळणार, याची उत्सुकता आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांची लढत लक्षवेधी ठरणार आहे.
वाचा प्रभागातील लक्षवेधी ठळक बाबी...
१) प्रभाग ११ : हा प्रभाग माजी महापौर स्व. महेश कोठे यांचा, मागच्यावेळी येथून राजकुमार हंचाटे, कोठे यांची बहीण कुमुद अंकराम, अनिता मगर व महेश कोठे नगरसेवक होते. कुमुद अंकराम यांना भाजपने उमेदवारी दिली नाही, त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली. मात्र, आमदार देवेंद्र कोठे यांच्या सांगण्यावरून आत्या अंकराम यांनी उमेदवारी मागे घेतली. या प्रभागात भाजपकडून युवराज सरवदे, शारदा रामपुरे, मीनाक्षी कडगंची, अजय पोन्नम उमेदवार आहेत.
२) प्रभाग १२ : या प्रभागात विनायक कोंड्याल शिवसेनेकडून नगरसेवक होते. आता भाजपने त्यांनाच उमेदवारी दिल्याने त्यांच्याविरुद्ध भाजपच्या माजी नगरसेविका देवी झाडबुके यांचे सासरे काशिनाथ झाडबुके अपक्ष आहेत. माजी महापौर शशिकला बत्तुल यांच्याऐवजी भाजपने सारिका खजुरगी यांना संधी दिली आहे. याच प्रभागात भाजपचे उमेदवार सिद्धेश्वर कमटम यांच्याविरुद्ध भाजपचे माजी नगरसेवक डॉ. राजेश अनगिरे शिवसेनेकडून उमेदवार आहेत.
३) प्रभाग १३ : भाजपचे माजी नगरसेवक सुनील कामाठी यांचे निधन झाल्याने आता त्यांच्या पत्नी सुनीता कामाठी उमेदवार आहेत. या प्रभागात काँग्रेसचा एकही उमेदवार नाही. आघाडीत तीन जागा माकपला, एक जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष लढत आहे. प्रभागात राज्यातील सत्ताधारी शिवसेनेचे चार उमेदवार आहेत. विशेष बाब म्हणजे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची युती होऊनही ‘प्रभाग १३- ड’मधील सर्वसाधारण गटातून इम्रान पठाण व श्रीधर अरगोंडा यांच्यात मैत्रिपूर्ण लढत होत आहे.
४) प्रभाग १४ : या मुस्लिमबहूल प्रभागात २०१७ मध्ये शहाजीदाबानो शेख, वहिदाबानो शेख, तौफिक हत्तुरे व रियाज खरादी विजयी झाले होते. आता ‘एमआयएम’ने तौफिक हत्तुरे व वाहिदाबानो शेख यां पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. एमआयएम, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही उमेदवार मुस्लिम दिले आहेत. एमआयएमचे माजी नगरसेवक रियाज खरादी यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करूनही ते समाजवादी पक्षातून निवडणूक लढवीत आहेत. आडम मास्तरांच्या पत्नीऐवजी यंदा त्यांच्याच कुटुंबातील अनिता आडम निवडणूक लढवीत आहेत.
५) प्रभाग १५ : हा काँग्रेसचा बालेकिल्ला, शहराध्यक्ष चेतन नरोटे यांचा प्रभाग आहे. पण, प्रभागातील काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे, विनोद भोसले, वैष्णवी करगुळे यांचे पती अंबादास करगुळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे नरोटे आता एकेकाळचे सहकारी अंबादास करगुळे यांच्याविरोधात आहेत. दुसरीकडे माजी महापौर आरिफ शेख यांच्यासमोर काँग्रेसमधून भाजपवासी झालेले विनोद भोसले यांचे आव्हान आहे.
६) प्रभाग १६ : भाजपने माजी नगरसेवक संतोष भोसले, मिनाक्षी कंपली यांना उमेदवारी दिली नाही. प्रभागात राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे भाजपच्या तिकिटावर आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे माजी महापौर यू. एन. बेरिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामधून राष्ट्रवादीत प्रवेश करूनही समाजवादी पक्षाकडून अर्ज भरला. प्रभागात कोल्हेविरुद्ध बेरिया अशी लढत आहे. तसेच खासदार प्रणिती शिंदे यांच्या कट्टर समर्थक फिरदोस पटेल यांनी काँग्रेसने उमेदवारी जाहीर करूनही ‘एमआयएम’कडून उमेदवारी अर्ज भरला. काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या सूनबाई सीमा यलगुलवार या देखील निवडणूक लढवीत आहेत.
७) प्रभाग १७ : भाजपचे माजी नगरसेवक रवी कय्यावाले यांच्याविरुद्ध १३ उमेदवार आहेत. जुगनबाई आंबेवाले यांच्यावर भाजपने पुन्हा विश्वास दाखविला आहे. प्रभागात अनुसूचित महिला प्रवर्गातून शिवसेनेकडून लक्ष्मी माढेकर तर युतीतील राष्ट्रवादीच्या नूतन गायकवाड उमेदवार आहेत. या प्रभागात ‘एमआयएम’ची ताकद लक्षणीय आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस तीन तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा एक उमेदवार आहे.
--------------------------------------------------------------------
८) प्रभाग १८ : शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या सासूबाई तथा माजी महापौर श्रीकांचन यन्नम यांचा हा प्रभाग आहे. मागच्यावेळी येथून रियाज हुंडेकरी, मंगल पाताळे, शिवानंद पाटील व श्रीकांचन यन्नम नगरसेवक होते. यन्नम यांच्याविरोधात शिवसेनेच्या निर्मला पासंकटी एकमेव उमेदवार आहेत. माकपच्या ज्येष्ठ नेत्या नलिनी कलबुर्गी ‘सर्वसाधारण’मधून रिंगणात आहेत. काँग्रेसचे माजी नगरसेवक अनिल पल्ली यांचे चिरंजीव प्रशांत पल्ली भाजपकडून उभे आहेत. माजी नगरसेवक शिवानंद पाटील यांच्याविरुद्ध काँग्रेसचे आयाज आळंद, शिवसेनेचे सुनील निंबाळकर व मनसेचे विशाल गुजले आहेत.
९) प्रभाग २१ : ‘एमआयएम’चे तत्कालीन शहराध्यक्ष तौफिक शेख यांचा हा बालेकिल्ला. त्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रभागात पहिल्यांदाच संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे भाजपकडून निवडणूक लढवित आहेत. त्यांच्यासमोर काँग्रेसचे माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी यांच्यासह शिवसेनेचे अक्षय पकाले व तीन अपक्ष आहेत. प्रभागातून प्रशांत बडवे यांचे चिरंजीव सात्त्विक बडवे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर शिवसेनेचे भीमाशंकर म्हेत्रेंचे आव्हान आहे.
१०) प्रभाग २२ : काँग्रेसचे माजी महापौर संजय हेमगड्डी, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या पत्नी राजनंदा डोंगरे येथून उमेदवार आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी, ज्यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केला ते किसन जाधव देखील याच प्रभागातील आहेत. जाधवविरुद्ध काँग्रेसचे कुणाल गायकवाड, शिवसेनेचे नितीन गायकवाड, राष्ट्रवादीचे जुबेर शेख, एमआयएमचे ॲड. सिराज शेख, वंचित बहुजन विकास आघाडीचे रमेश सुतकर, जनहित सेवा पक्षाचे मनीष गायकवाड यांच्यासह पाच अपक्ष उमेदवार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.