महापालिका निवडणुकीला २०२३चा मुहूर्त?

नव्या निर्णयानुसार तीन आरक्षित जागा घटणार; प्रभागातील मतदार व लोकसंख्या दुपटीने वाढणार
Solapur Municipal Corporation
Solapur Municipal Corporationsakal

सोलापूर - राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे गेल्या वर्षभरापासून प्रभाग रचना, आरक्षण अन्‌ मतदार यादी यातच महापालिका निवडणूक प्रक्रिया अडकून राहिली आहे. नव्या सरकारच्या नव्या निर्णयामुळे प्रभागातील मतदारसंख्या पाच हजारांनी तर लोकसंख्या दहा हजारांनी वाढणार आहे. अन्‌ नव्याने वाढ झालेल्या तीन आरक्षित जागांसह ११ जागा घटणार आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या रणधुमाळीला आता २०२३ मध्येच मुहूर्त लागण्याचे संकेत आहेत.

सर्वच राजकीय पक्षांना गेल्या दोन वर्षांपासून महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. पावसाळी छत्र्यांप्रमाणे प्रभागांमध्ये इच्छुकांचे विविधांगाने राजकीय उत्सव सुरू झाले आहेत. राज्यातील महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे प्रभाग रचनेमध्ये होत नसलेले एकमत, ओबीसी आरक्षण अन्‌ आता राज्यातील बदललेले सरकार यामुळे वारंवार निवडणूक प्रक्रियेला ब्रेक लागल्याने वर्ष लोटला तरी निवडणूक काही लागेना. सर्वच पक्षांतील इच्छुकांची उत्सुकता ताणली जात आहे, मात्र राज्यातील सरकार आपल्या सत्तेचा पुरेपूर वापर करण्यासाठी आसुसलेले आहे.

सोयीच्या राजकारणासाठी निवडणूक आयोगाचा खेळखंडोबा सुरू आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने, यापूर्वी झालेली प्रभाग रचना ही नियमबाह्य असून जनगणनेशिवाय झालेली वाढीव सदस्यसंख्याही चुकीची असल्याचे सांगत, २०१७ च्या निवडणुकीचा चार सदस्यीय फॉर्म्यूला २०२२ च्या निवडणुकीत अमलात आणण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे निवडणूक आयोगाने अंतिम टप्प्यात आलेल्या निवडणूक प्रक्रियेला पुन्हा स्थगिती दिली. त्यामुळे नव्या सरकारच्या धोरणानुसार निवडणूक घ्यायची असेल तर पूर्वीची प्रभाग रचना, आरक्षण प्रक्रिया अन्‌ मतदार यादी नव्याने करावी लागणार आहे. यामध्ये प्रभागातील मतदार संख्येसह लोकसंख्यादेखील पाच ते दहा हजारांनी वाढणार आहे. नव्याने प्रक्रिया करण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. सप्टेंबर महिन्यात प्रशासकाचा सहा महिन्यांचा कालावधी संपुष्टात येत आहे. परंतु, निवडणूकच लांबणीवर पडल्याने प्रशासनाच्या कारभाराला आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.

२०१७ ची सदस्य संख्या

एकूण सदस्य संख्या : १०२

महिला सदस्य संख्या : ५१

सर्वसाधारण सदस्य संख्या : ५७

नागरिकांचा मागास प्रवर्ग : २८

अनुसूचित जाती सदस्य संख्या : १५

अनुसूचित जमाती सदस्य संख्या : २

२०१७ ची प्रभाग रचना

प्रभागातील सदस्य संख्या : ४

एकूण प्रभागांची संख्या : २६

चारसदस्यीय प्रभाग संख्या : २४

तीनसदस्यीय प्रभाग संख्या : २

प्रभागातील अधिकाधिक लोकसंख्या : ४१ हजार

प्रभागातील कमीतकमी लोकसंख्या : २७ हजार

२०२२ ची सदस्य संख्या

एकूण सदस्य संख्या : ११३

महिला सदस्य संख्या : ५७

सर्वसाधारण सदस्य संख्या : ६५

नागरिकांचा मागास प्रवर्ग : ३०

अनुसूचित सदस्य संख्या : १६

अनसूचित जमाती सदस्य संख्या : २

२०२२ ची प्रभाग रचना

प्रभागातील सदस्य संख्या : ३

एकूण प्रभागांची संख्या : ३८

तीनसदस्यीय प्रभाग संख्या : ३७

दोनसदस्यीय प्रभाग संख्या : १

प्रभागातील अधिकाधिक लोकसंख्या : २६ हजार

प्रभागातील कमीतकमी लोकसंख्या : १६ हजार

मतदार व लोकसंख्या दुपटीने वाढणार

२०१७ च्या निवडणुकीत चारसदस्यीय प्रभागांची रचना केली होती. एका प्रभागातील लोकसंख्या ही ४१ हजार ते ३५ हजारांपर्यंत होती. यामध्ये क्र. ६, २१, २२, २३, २४ या प्रभागांची लोकसंख्या ४१ हजाराच्या वर होती. छोटा प्रभाग विकासाच्यादृष्टीने सोयीचा राहील या उद्देशाने २०२२ च्या निवडणुकीसाठी तीनसदस्यीय प्रभाग रचना आखण्यात आली. अधिकाधिक २६ हजार तर कमीतकमी १६ हजार इतकी लोकसंख्या ठेवली होती. परंतु आता नव्या रचनेनुसार प्रभागातील लोकसंख्या आणि मतदारसंख्या दुपटीने वाढण्याची शक्यता आहे.

आरक्षित तीन जागा घटणार

महाविकास आघाडीने १०२ वरून सदस्य संख्या वाढवीत ११३ इतकी केली होती. या वाढीव ११ सदस्यांपैकी सर्वसाधारण ८, अनुसूचित जातीची १ आणि मागास प्रवर्गाच्या दोन अशा तीन आरक्षित ११ जागा वाढल्या होत्या. नव्या निर्णयामुळे या सर्वच जागा घटणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com