सोलापूर : मालवाहतूक वाहनांतून प्रवासी वाहतूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Trucks-image-

सोलापूर : मालवाहतूक वाहनांतून प्रवासी वाहतूक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संप बुधवारी नवव्या दिवशीही सुरूच असल्याने मालवाहतुकीच्या वाहनातून मोठ्या प्रमाणात प्रवास सुरू आहे. एसटीच्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

कुंभारी नजीक झालेल्या घटनेत मंगळवारी सकाळी ९ च्या सुमारास खासगी वाहनातून प्रवास करणाऱ्या पाच जणांचा मृत्यू झाला आहे. एसटी बंद असल्यामुळे मिळेल त्या वाहनांने प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. राज्य महामार्ग असलेल्या सोलापूर-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळच्या सुमारास प्रवासी मालवाहतूक करणाऱ्या वाहनातून अनेकांनी प्रवास केला. सध्याच्या घडीला मालवाहतुकीची वाहने प्रवासी वाहतुकीसाठी महत्त्वाची साधने बनली आहेत. अशा वाहनातून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

मागील आठ दिवसांपासून सोलापूर विभागातील ९ आगाराच्या एसटी बस बंद आहेत. तरीही शासनाने कोणताही सकारात्मक निर्णय न घेतल्याने संपूर्ण राज्यामध्ये कर्मचाऱ्यांनी संप सुरू ठेवला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन केल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बस आठ दिवसापासून बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र, दुसरीकडे आपल्या कामानिमित्त प्रवास करण्यासाठी प्रवासी मिळेल त्या वाहनांतून प्रवास करीत आहेत. खासगी वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन खाजगी वाहने व्यवसाय करीत आहेत. सुरक्षेची कोणतीही हमी नसल्याने प्रवाशांना एक प्रकारे जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे दिवाळीनिमित्त गावाकडे आलेल्या नागरिकांचे हाल होत आहेत.

दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आहेत. त्यामुळे ऑफिस, कार्यालय तसेच शाळा-महाविद्यालयाला जाण्यासाठी मिळेल त्या वाहनाने प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. सोलापूर-पुणे राष्टीय महामार्गावर मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना हात करून प्रवासी आपल्या निश्‍चित स्थळी पोहोचण्यासाठी मालवाहतूक गाडीतून प्रवास करताना दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थी, शाळा-महाविद्यालयीन तरुणांना, एसटीचा संप कधी संपतो याकडे नोकरदार वर्गाचे लक्ष लागून राहिले आहे. कारण खासगी वाहनातून सोय होत असली तरी आर्थिक भुर्दंड आणि जीव धोक्‍यात घालून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे संप मिटण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे.

हेही वाचा: राज्यातील ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर!

खासगी वाहनांवरील कारवाई थांबली

एसटी बंद असल्याने सकाळच्या सुमारास खासगी प्रवासी बस, खासगी गाड्या, तसेच वैयक्‍तिक भोडेत्वांवर मोठ्या प्रमाणावर खासगी वाहने धावत आहेत. मात्र, यावेळी प्रवाशांकडून जादा तिकीट दर आकारले जात आहे. त्यामुळे प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्‍त केली जात आहे. मात्र, दुसरीकडे उपप्रादेशिक कार्यालयाचे कर्मचारी अशा वाहनांनवर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाहीत. खासगी वाहनांवरील कारवाई पूर्णपणे थांबली असून आजपर्यंतची अनाधिकृत वाहतूक अचानक अधिकृत झाली आहे, असेच चित्र आहे.

पास असून एसटी नापास

राज्यातील शाळा, महाविद्यालये ता. ११ नोव्हेंबरपासून सुरु करण्यात आली आहेत. अनेक विद्यार्थी-विद्यार्थींना सवलतीत प्रवासासाठी पास काढला आहे. मात्र संप सुरु असल्याने त्यांना खासगी वाहनांनी ये-जा करावी लागत आहे. त्यांच्यांकडील पास चालत नसल्याने विद्यार्थ्यांची अवस्था बिकट झाली आहे. ‘पास, असूनही एसटी झाली नापास’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

loading image
go to top