सोलापूर : वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा पेच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur corporation

सोलापूर : वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा पेच

सोलापूर : शासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या दरवर्षी जून महिन्यात होत असतात. पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या दर दोन वर्षांनी तर महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, झेडपीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा कार्यकाळ किमान तीन वर्षांपर्यंत असतो. कोरोना काळात अनेकांच्या बदल्या सप्टेंबर-ऑक्टोबर २०२० मध्येच झाल्या. त्यामुळे त्या अधिकाऱ्यांच्या बदलीचा कार्यकाल जून की बदली झाल्याच्या दिवसापासून धरायचा, असा पेच राज्य सरकारपुढे आहे.

कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर अनेक जिल्ह्यांमधील परिस्थिती हाताबाहेर जात होती. अशावेळी राज्य सरकारने अनेक जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिस अधिकाऱ्यांच्या इतरत्र बदल्या केल्या होत्या. अधिकाऱ्यांच्या ठोस नियोजनामुळे कोरोनाला नियंत्रित करता आले. आता त्या अधिकाऱ्यांना बदल्यांचे वेध लागले असून अनेकांनी त्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचीही चर्चा आहे. दोन वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने जळगाव, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे यासह अनेक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिस अधीक्षक, पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त, झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पुढील महिन्यात बदल्या होतील. पण, काही अधिकाऱ्यांची बदली जूनऐवजी अन्य महिन्यांत झाल्याने ही बदल्यांची प्रक्रिया लांबणीवर पडेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. तरीही, हा पेच सोडविण्यासाठी जूनशिवाय अन्य महिन्यात बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदलीचा कालावधी जूनपासून ग्राह्य धरून तसा शासन निर्णय काढला जाण्याची शक्यता आहे, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

नवे पोलिस अधीक्षक, पोलिस आयुक्त कोण?

पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची साताऱ्याहून ऑक्टोबर २०२० मध्ये सोलापूर ग्रामीणला बदली झाली. जूनपासून बदलीचा कालावधी ग्राह्य धरल्यास पुढच्या महिन्यात त्यांची बदली होऊ शकते. दुसरीकडे, पोलिस आयुक्त हरीश बैजल मेअखेरीस सेवानिवृत्त होणार आहेत. सोलापूर शहर-ग्रामीणला नवे अधिकारी कोण येणार, यासंदर्भात तर्कवितर्क लढविले जात आहेत. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचाही कार्यकाळ पूर्ण होत असल्याने त्यांचीही बदली होऊ शकते.

बदल्यांसाठी वशिलेबाजी नाहीच

शासकीय सेवेतील अनेक अधिकाऱ्यांच्या विशेषत: पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. वास्तविक पाहता शहर-ग्रामीणच्या विकासासाठी अनेकजण चांगला अधिकारी जिल्ह्यात यावा, यासाठी प्रयत्न करतात. पण, अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून विरोधकांना आवाज उठविण्याचा मुद्दा मिळू नये, याची खबरदारी घेण्याच्या सूचना सत्ताधारी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी आपल्या मंत्र्यांना केल्याचीही चर्चा आहे. सध्या विरोधी भाजपने भ्रष्टाचाराविरोधात ‘पोलखोल’ यात्रा सुरू केली आहे. त्यामुळे खबरदारी घेतली जात असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

Web Title: Solapur Patch Transfer Senior Government Officials

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top