
सोलापूर : शाळेच्या सुरवातीला पुस्तकी शिक्षण नकोच
सोलापूर : कोरोनाच्या संकटातून बाहेर पडताना दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच १३ जून रोजी ऑफलाइन शाळा सुरु होणार आहेत. कोरोनामुळे शाळा बंद राहिल्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर झाला आहे. त्यामुळे शाळा सुरु झाल्यानंतर पहिल्या महिन्यात पुस्तकी शिक्षणाला सुरवात न करता कोरोनासंबंधीचे नियम, स्वच्छता, सदृढ आरोग्य आणि विद्यार्थ्यांच्या बौध्दिक क्षमता विकसीत करण्यावर भर द्यावा लागणार आहे. त्यासाठी शिक्षकांना ज्यादा तास घ्यावे लागतील, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
कोरोनाच्या काळात भरमसाठ शैक्षणिक शुल्क घेतलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा पूर्णपणे बंद राहिल्या. पण, जिल्हा परिषदेच्या वतीने पारावरील शाळा, गृहभेटीतून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्यात आले. तरीदेखील, ज्या मुलांकडे ॲन्ड्राईड मोबाइल नव्हते, ते विद्यार्थी शिक्षणात मागे राहिल्याचे चित्र आहे. वर्षानुवर्षे ऑफलाइन शिक्षण घेणाऱ्या मुलांना ऑनलाइन शिक्षण समजले नाही. पालकांचा इंग्रजी शाळांकडील कल आता कमी झाला असून सेमी इंग्रजी माध्यमांकडे पालकांचा ओढा वाढला आहे. दुसरीकडे मराठी शाळांमधील पटसंख्याही वाढली आहे. पण, ज्या विद्यार्थ्यांच्या मागील इयत्तेतील सर्व क्षमता विकसीत झाल्या नाहीत,
त्यांच्यासाठी शिक्षकांना ज्यादा तास घ्यावे लागतील, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली. शहर-ग्रामीणमधील सर्वच शाळांसाठी तो निकष बंधनकारक राहील, असेही अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषदेसह खासगी प्राथमिकच्या तीन हजार ७४६ तर शहरात २२१ शाळा आहेत. त्याअंतर्गत पहिली ते आठवीच्या वर्गात तीन लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळाबाह्य मुले कमी व्हावेत, पालकांचा ओढा जिल्हा परिषद व महापालिकेच्या शाळांमध्ये वाढावा, यासाठी शिक्षकांना अतिरिक्त काम करावे लागेल, असेही महापालिकेचे प्रशासनाधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी स्पष्ट केले.
कृतीतून शिक्षणावर अधिक भर
कोरोना काळात विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले. घरी बसून राहिलेल्या विद्यार्थ्यांचे वजन वाढले तर काहींना डोळ्याचे, कानाचे विकार जडले. त्यामुळे विद्यार्थ्यांना मैदानी खेळासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. कृतीयुक्त शिक्षण त्यांना दिले जाणार आहे. जेणेकरून त्यांच्या शारीरिक अडचणी दूर होऊन मुले शिक्षणात रमतील, हा हेतू आहे.
१० जूनला सीईओ घेतील बैठक
कोरोना काळात विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान ज्यादा तासातून भरून काढले जाणार आहे. शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढावी, यासाठी पहिल्या महिन्यात कशाप्रकारे अध्यापन करावे, यासबंधीचे नियोजन केले जाणार आहे. त्यासाठी १० जूनच्या दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुखांची बैठक होणार आहे. त्यावेळी जिल्हा प्रशिक्षण व संशोधनचे (डायट) अधिकारी देखील उपस्थित राहतील.
पहिली ते आठवीच्या शाळांची स्थिती
शहरातील शाळा
२२१
एकूण विद्यार्थी
९९,५७५
ग्रामीणमधील शाळा
३७४६
एकूण विद्यार्थी
२.०३ लाख
Web Title: Solapur School Reject Teaching Beginning
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..