Solapur : सिद्धाराम म्हेत्रेंच्या दुग्धाभिषेकाची ‘चर्चा पे चर्चा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Siddharam Mhetre

Solapur : सिद्धाराम म्हेत्रेंच्या दुग्धाभिषेकाची ‘चर्चा पे चर्चा’

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्याच्या सर्व मंडळामधील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा अंदाजे ३० कोटींचा निधी मिळवून दिल्याबद्दल कृतज्ञता म्हणून चपळगाव व कुरनूर येथील शेतकऱ्यांनी म्हेत्रे यांन दुग्धाभिषेक घातला. याची चर्चा अक्कलकोट तालुक्यासह जिल्ह्यात चांगलीच रंगली आहे, तर या दुग्धाभिषेकावर विरोधकांकडून कडवट टीका करण्यात येत आहे.

अक्कलकोट तालुक्यात ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली. परंतु, शासनाकडून केवळ किणी मंडळातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश होते. वास्तविक, संपूर्ण तालुक्यात खरीपाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. इतर मंडळामधील शेतकरी नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित राहणार होते. तथापि, ही बाब माजी मंत्री म्हेत्रे यांनी तत्काळ जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मांडली. तालुक्यातील सर्वच खरीप पिकांचे पंचनामे व्हावेत, यासाठी त्यांनी आग्रही भूमिका घेतली. एवढ्यावरच न थांबता श्री. म्हेत्रे यांनी तातडीने मुंबई येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेऊन अक्कलकोट तालुका व दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची १२५ टक्के रक्कम मिळावी यासाठी निवेदन सादर केले.

दरम्यान, याचेच फलित म्हणून शासनाकडून तालुक्याला किणी मंडलाव्यतिरिक्त तब्बल ३१ कोटींचा निधी मंजूर झाला. ऐन दिवाळीत शेतकऱ्यांना हा निधी मिळाल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. याचीच जाणीव ठेवून सोमवारी (ता. ८) आठवडा बाजाराच्या दिवशी चपळगाव आणि कुरनूर गावातील शेतकऱ्यांनी जवळजवळ १५१ लिटर दुधाने म्हेत्रे यांचा दुग्धाभिषेक घातला.

यावेळी अशपाक बळोरगी, सभापती प्रथमेश म्हेत्रे, मल्लिकार्जुन पाटील, सद्दाम शेरीकर, महेश जानकर, सलिम येळसंगी, शीतल म्हेत्रे, मल्लिकार्जुन काटगाव, बसवराज अळ्ळोळी, सिध्दार्थ गायकवाड, शिवप्पा कुंभार, रामू समाणे, वसंत देडे, दिलीप काजळे, बाबासाहेब पाटील, सायबू गायकवाड, कुरनूरचे सरपंच व्यंकटराव मोरे, काशिनाथ गोळे, राजशेखर लकाबशेट्टी आदी उपस्थित होते.

एक दिवसाचा मुख्यमंत्री असलेल्या अनिल कपूर याच्या नायक चित्रपटाची आठवण झाली; आयुष्याचे सार्थक झाले. शेतकऱ्यांसाठीचा लढा कायमच राहील. धन्य धन्य झाल्याचा फील आला. आजवरच्या राजकाणाती प्रवासात अनेक वेळा सत्कार झाले. पण दुग्धाभिषेकाचा सत्कर लाख मोलाचा वाटला.

- सिध्दाराम म्हेत्रे, माजी गृह राज्यमंत्री

सिद्धाराम म्हेत्रे यांनी आपल्या कार्यकाळात तालुक्याचा संपूर्ण विकास करण्यासाठी अनेक त्याग केले आहेत. कुरनूर धरण, एकरूख उपसा सिंचन योजना, मातोश्री-गोकूळ कारखान्याची निर्मिती यासह तालुक्याच्या संपूर्ण विकासासाठी म्हेत्रे यांनी प्रयत्न केले असून विरोधकांनी मात्र अजून एक वीटही रचलेली नाही.

- व्यंकट मोरे, सरपंच, कुरनुर

माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी दुष्काळग्रस्त अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी स्वतःची प्रॉपर्टी गहाण ठेवून धाडसाने साखर कारखाना उभा केला. या कारखान्याच्या माध्यमातून लाखो टन ऊस गाळप केल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःहून माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना दुग्धाभिषेक केलेला आहे.

- राजू चव्हाण, शेतकरी, चुंगी ता. अक्कलकोट