सोलापूर : सीना-भोगावती जोड कालव्यास लवकरच मंजुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीना-भोगावती जोड कालव्यास लवकरच मंजुरी

सोलापूर : सीना-भोगावती जोड कालव्यास लवकरच मंजुरी

सोलापूर (वाळूज) : सीना-भोगावती नदीजोड कालव्यास लवकरच मंजुरी मिळणार असून जोडकालवा व सीना नदीवर बोपले आणि शिरापूर (ता. मोहोळ) येथे बंधारे होण्यासाठी लवकरच जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या बरोबर पुणे येथे बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी ’सकाळ’ला दिली.

या बैठकीबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना आमदार माने यांनी पत्र दिले आहे. मोहोळ तालुक्‍यातील सीना-भोगावती नदी जोडकालवा व सीना नदीवर नवीन बंधारे बांधणे, तसेच मोहोळ तालुक्‍यातील विविध पाणी प्रश्नांवर ही बैठक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मोहोळ मतदारसंघातील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या सीना-भोगावती नदी जोड कालव्यास लवकरच मंजुरी मिळणार, अशी आशा शेतकऱ्यांना वाटत आहे. तसेच बोपले व शिरापूर या भागात सीना नदीवर बंधारे बांधण्यात येणार आहेत, अशी माहिती आमदार यशवंत माने यांनी दिली.

हेही वाचा: वानखेडेंच्या नावावर बार? क्रांती रेडकर मलिकांना म्हणाल्या, 'जबाबदार पदावर असूनही तुम्ही...'

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची बुधवारी (ता. १७) आमदार यशवंत माने यांनी माजी आमदार राजन पाटील यांच्या समवेत मुंबई येथे मंत्रालयात भेट घेतली. भेटीदरम्यान झालेल्या सकारात्मक चर्चेअंती लवकरच पुणे येथे बैठक आयोजित करून दोन्ही प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सूचना दिल्या आहेत, असेही यावेळी आमदार माने यांनी सांगितले.

गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून भोगावती नदी परिसरातील मोहोळ, बार्शी, माढा व उत्तर सोलापूर तालुक्‍यातील तीस ते चाळीस गावांतील हजारो शेतकऱ्यांची सीना-भोगावती नदी जोड कालवा करण्याची मागणी करत आहेत. हा जोडकालवा झाल्यास चार तालुक्‍यातील ११ हजार २५० एकर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. मात्र आजपर्यंत आंदोलनाला व मागणीला यश आले नाही. सीना-भोगावती जोडकालवा पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून वाळूज येथील दिवंगत सुशांत कादे यांच्या नेतृत्त्वाखाली लढा सुरु होता. नुकतेच कोविडमुळे त्यांचे निधन झाल्याने पाणी संघर्ष समितीच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांचे बंधू व प्रसिध्द स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. संदेश कादे यांच्या खांद्यावर आली आहे. त्यांनी माजी आमदार राजन पाटील व आमदार यशवंत माने यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा सुरु ठेवला आहे. पुणे येथे या प्रश्नांसंदर्भात जलसंपदामंत्र्या समवेत बैठक होत आहे. त्यामुळे या प्रश्नाला गती मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. यापूर्वी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे देगाव (वा) येथील उत्तरेश्वर आतकरे यांनीही या प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा केला आहे.

loading image
go to top