
सोलापूरच्या SMT चा खडतर प्रवास अजूनही सुरूच आहे
सोलापूर: मुंबईची ‘बेस्ट’ आणि पुण्याची ‘पीएमटी’ अडचणीतून बाहेर आली, पण सोलापूरच्या ‘एसएमटी’चा खडतर प्रवास अजूनही सुरूच आहे. कर्मचाऱ्यांच्या पगाराएवढे सोडा, डिझेलचा खर्चही निघत नसल्याने हा उपक्रम बंद होण्याच्या मार्गावर आहे. शहरातील पहिली ते दहावीतील मुलींना मोफत प्रवास देणारी ‘एसएमटी’ शहरात दिसतच नाही. आता त्या मुलींना पदरमोड करून खासगी वाहनांतून प्रवास करावा लागणार आहे. तरीही, त्याकडे ना परिवहन अधिकाऱ्यांचे लक्ष आहे ना महापालिका आयुक्तांचे, अशी स्थिती आहे.
शहरातील सर्वसामान्यांना स्वस्तात प्रवास करता यावा, खासगी वाहन चालकांकडून त्यांची लूट होऊ नये म्हणून महापालिकेच्या वतीने परिवहन उपक्रम सुरू करण्यात आला. अनेक वर्षे फायद्यात असलेला हा उपक्रम मागील काही वर्षांत तोट्यात आहे. एकेकाळी ९० हून अधिक बसगाड्या आणि एक हजार कर्मचारी सांभाळणारी ‘एसएमटी’ सध्या कधीतरी रस्त्यावर दिसते. शहरासह ग्रामीण भागाला सेवा देणाऱ्या बसगाड्या सध्या दुरुस्तीअभावी भांडारात धुळखात पडून आहेत. सध्या २० ते २२ बसगाड्या विविध मार्गांवर धावत असून दररोज ६५ हजारांपर्यंत उत्पन्न मिळत आहे. त्यातही अनेक बसगाड्या जुनाट झाल्याने दुपारनंतर बऱ्याच गाड्या धक्क्याला लावाव्या लागतात. परिवहनकडे सध्या २३५ कर्मचारी असून त्यातील काही चालक ५५ वर्षांवरील असल्याने ते आजारपणामुळे अनेकदा कामावर येतच नाहीत. खासगी वाहनांशी स्पर्धा करताना महापालिकेकडून सूक्ष्म नियोजन झालेच नाही. त्यामुळे हा उपक्रम गुंडाळून ठेवावा लागतो की काय, अशी स्थिती झाली आहे. अशा परिस्थितीत हा उपक्रम खासगी करण्याचे नियोजन केले जात आहे, हे विशेष.
‘एसएमटी’ची सेवा ‘या’ मार्गांवर
शहरातील भरमसाठ रिक्षांमुळे महापालिकेची ‘एसएमटी’ ग्रामीणमधील पितापूर, मंद्रूप, कासेगाव, बोरामणी, मुस्ती, चपळगाव या मार्गांवर धावत आहे. तर शहरातील विडी घरकुल या परिसरातच ही बस पाहायला मिळते. शहरातील उर्वरित भागात शक्यतो बस दिसतच नाही. शहरातील विविध शाळांमध्ये जाणाऱ्या पहिली ते दहावीपर्यंतच्या चार हजार मुलींना परिवहनच्या बसमधून मोफत प्रवासाची सोय आहे. पण, आता बस नसल्याने त्या मुलींच्या पालकांना पदरमोड करावी लागणार असून, शाळा सुरू होण्यापूर्वीच त्यांची चिंता वाढली आहे. त्या मुलींची सोय महापालिका प्रशासन कशाप्रकारे करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एसएमटीचे खासगीकरण खडतरच
महापालिकेच्या परिवहन उपक्रमाअंतर्गत अजूनही २३५ कर्मचारी आहेत. त्यातील जवळपास ५५ कर्मचारी महापालिकेकडे सध्या काम करीत आहेत. तर ३८ ते ४० कर्मचारी ५५ वर्षांवरील आहेत. तांत्रिक विभागातही बरेच कर्मचारी आहेत. अशा परिस्थितीत या उपक्रमाचे खासगीकरण करताना सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरील कर्मचाऱ्यांचे काय होणार, सध्या मार्गावर धावण्यासारख्या २५ गाड्या असून चालक-वाहकही अत्यल्प आहेत. इंधनाचा वाढलेला दर आणि कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर खर्चाचा ताळमेळ घातल्यास कंत्राटदाराला किमान ५० ते ५५ रुपये प्रतिकिलोमीटर दराने ठेका घ्यावा लागणार आहे. हे आर्थिक समीकरण कंत्राटदाराला परवडेल का, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे परिवहन उपक्रमाचे खासगीकरणही खडतरच आहे, असे जाणकारांचे मत आहे.
एसएमटीची सद्य:स्थिती
मार्गावरील बस
२२
एकूण कर्मचारी
१८०
दरमहा उत्पन्न
३० ते ३२ लाख
डिझेल, वेतन, दुरुस्तीसह खर्च
६५ लाख
दरमहा सरासरी भुर्दंड
३३ लाख
Web Title: Solapur Smt Tough Journey
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..