
सोलापूर : ST च्या उत्पन्न वाढीसाठी ‘प्रवासी मित्र’
सोलापूर: मागील सहा महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जागेवर थांबून असलेल्या लालपरीच्या चाकांनी पुन्हा गती घेतली आहे. संपामुळे ग्रामीण भागात एसटी न धावल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. मात्र कर्मचारी पुन्हा कामावर परतल्याने ग्रामीण भागातील व्यवहार सुरळीत झाले आहेत. मात्र एसटीला मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हे नुकसान भरुन काढण्यासाठी आणि जास्तीत-जास्त प्रवाशांनी एसटीने प्रवास करावा यासाठी शहरतील ४० ठिकाणी प्रवासी मित्र थांबणार आहेत.
राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. अखेर न्यायालयाच्या आदेशाने संप मागे घेतला. संपामुळे एसटी जागेवर थांबली होती. सोलापूरमधील ग्रामीण भागातील गावगाडा ठप्प झाला होता. प्रवाशांना खासगी वाहनांना अधिकचे पैसे देऊन प्रवास करावा लागला. त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांचे गणित बिघडले होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महामंडळाचे आर्थिक गणित चुकले आहे. एसटी आगारात थांबल्याने प्रवासी खाजगी वाहतूकीकडे वळले होते. खासगी वाहनांकडे वळलेल्या प्रवाशांना पुन्हा एसटीकडे वळविण्यासाठी प्रवासी मित्र संकल्पना राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रवासी गर्दी असलेल्या ठिकाणी जिल्हा वाहतूक नियंत्रक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना प्रवासी मित्र म्हणून तैनात करण्यात येणार आहे. प्रवासी मित्र मार्फत बसचे ठिकाण व याची माहिती तसेच प्रवाशांना बसमध्ये बसविण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे लालपरीला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल, अशी आशा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सहा महिन्यांच्या संपानंतर कर्मचारी कामावर रुजू झाले. दररोज दोन लाख किलोमीटरचा प्रवास होत आहे. 60 ते 70 लाख रुपयांचे उत्पन्न विभागाला मिळत आहे. एसटीपासून लांब गेलेल्या प्रवाशांना पुन्हा एसटीकडे वळविण्यासाठी प्रवासी मित्र योजना राबविण्यात येत आहे. पुन्हा कर्मचाऱ्यांच्या सोबतीने एसटीची सेवा सुरु झाली आहे.
- सुरेश लोणकर, विभागीय वाहतूक अधिकारी, सोलापूर
Web Title: Solapur St Income Pravasi Mitra
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..