Ukraine Russia: सोलापूरचे 19 जण रोमानियाला सुखरूप पोहचले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur Student In Ukraine

Ukraine Russia: सोलापूरचे 19 जण रोमानियाला सुखरूप पोहचले

करकंब: युक्रेन मधील डेनिप्रो येथे वैद्यकीय शिक्षण घेणारे सोलापूर जिल्ह्यातील एकोणीस विद्यार्थी तब्बल अकराशे किलोमीटर व बावीस तासाच्या बस प्रवास करून तेथील प्रमाण वेळेनुसार आज सकाळी सात वाजता रोमोनिया देशातील सिरेत या शहरात सुखरुप पोहचले. अतिशय भयावह अशा युद्धजन्य वातावरणातून सुखरूप बाहेर आल्यामुळे त्यांच्यासह त्यांचे पालक व नातेवाईकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. (Russia Ukraine War And India Student in Ukraine)

तपकिरी शेटफळ (ता.पंढरपूर) येथील विश्वास बोंगे याने रोमोनियात आल्या नंतर 'सकाळ'शी भ्रमणध्वनी वरून संवाद साधला. सुरुवातीला डेनिप्रो शहर युद्धझळांपासून लांब होते. पण मागील दोन दिवसात रशियाची आक्रमकता वाढल्याने कोणत्याही क्षणी काहीही घडू शकते अशी परिस्थिती होती. त्यामुळे लवकरात लवकर भारतात परतणे क्रमप्राप्त होते. पण त्यासाठी युक्रेनच्या सीमा ओलांडून शेजारील देशात जाणे आवश्यक होते. त्यासाठी येथील विद्यार्थ्यांचा आटापिटा चालू होता. मागील पाच-सहा दिवसापासुन बससाठी प्रयत्न करूनही व्यवस्था होत नव्हती.

त्यातच बंकर मध्ये घ्यावा लागलेला आश्रय आणि सातत्याने वाजणारे सायरन यामुळे प्रचंड दडपण आणि भीतीदायक वातावरण होते. रात्रीच्या वेळी तर झोपही लागत नव्हती. दुसरीकडे दिवसेंदिवस युध्दाचा ज्वर वाढत होता. सर्वांचे फोन आणि मेसेज चालू होते. काय बोलावे काही कळत नव्हते. शेवटी प्रयत्नानंतर काल (मंगळवारी) तीन बस मिळाल्या. त्याही शेवटच्या असल्याचे कळाले. त्यातील तिसऱ्या बसमध्ये शेवटी कशीबशी जागा मिळाली. बसचा बावीस तासांचा प्रवासही थरारक होता. कधी काय घडेल, काही सांगता येत नव्हते.

दर दहा मिनिटाला ठिकठिकाणच्या चेक पॉईंट वर बस चेक केल्या जायच्या. युक्रेनच्या सीमा ओलांडून रोमोनियात प्रवेश केला तो खरा सुटकेचा क्षण अविस्मरणीय असाच म्हणावा लागेल. इथे आल्यानंतर आता खूप रिलॅक्स वाटत असल्याचे विश्वास बोंगे याने 'सकाळ'ला सांगितले. तेथून भारतात येण्यासाठी विमानांची व्यवस्था केली जात आहे. यापूर्वीही तेथे आलेले अनेक भारतीयअसून सर्वांना टोकन देऊन त्यानुसार क्रमाने भारतात पाठविले जात आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आपल्या घरी येण्यास अजून तीन-चार दिवसांचा कालावधी लागू शकतो, असे विश्वासने सांगितले.

रोमोनिया पोलिसांची माणुसकी

रोमोनिया देशातील सिरेत या शहरात युक्रेनवरून आज आलेल्या 450 भारतीयांची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथील पोलिसांकडून सर्वांची अतिशय काळजी घेतली जात असून चहा, अल्पोपहार, जेवण, राहण्याची उत्तम सुविधा या सर्व सोयी अगदी मोफत पुरविल्या जात आहेत. याशिवाय मानसिक आधार देण्याचेही महत्वपूर्ण काम तेथील पोलीस करत आहेत. त्यामुळे गेल्या आठवडाभराच्या तंग वातावरणानंतर आता सर्वजण खूप रिलॅक्स झाले आहेत.

ज्योतिराम बोंगे (पालक) - रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून मागील सात-आठ दिवस अतिशय तणावात गेले. बातम्या पाहत असताना तर कालची रात्र काळरात्रच वाटत होती. मुलांना युक्रेनची सीमा ओलांडण्यासाठी स्वतः बसची व्यवस्था करावी लागत होती आणि त्यासाठी बाहेर पडता येत नव्हते. काल कशीतरी बसची व्यवस्था झाली आणि अगदी अंतिम क्षणी का असेना पण मुले सुखरूप युक्रेनच्या बाहेर पडली, याचे खूप समाधान आहे.

सोलापूर जिल्ह्यातील रोमोनियात सुखरूप पोहचलेले विद्यार्थी

वेदांत पाटील, विश्वास बोंगे, वैष्णव कोळी, अभिजित चव्हाण, निरंजन कळभरमे, प्रथमेश माने, सचिन कारंडे, शिवम सावंत, आकाश पवार, प्राजक्ता भोसले, प्राजक्ता घाडगे, साक्षी पाटील, संस्कृती माने, आयुशी बनसोड, प्रथमेश कांबळे, रितेश गवळी, श्रेयश सावळे, किंजल कांबळे, प्रबोधिनी कदम.